Navnath Bhaktisar Adhyay 14 | PDF Download

By Rahul | Last updated on January 17, 2026

Navnath Bhaktisar Adhyay 14 is the fourteenth chapter of the book. Reading this Adhyay will help you to get out of jail. The PDF Download link is at the end of the article.

Navnath Bhaktisar Adhyay 14:

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी पंढरीनाथा ॥ समचरणीं भक्ततापशमिता ॥ कटीं कर नासाग्रीं दृष्टी ठेविता ॥ होसी रंजिता मुनिमानसा ॥१॥ ऐसा स्वामी तूं करुणाकार ॥ तरी तूं बोलवीं भक्तिसार ॥ मागिले अध्यायीं कथानुसार ॥ परम कृपें वदविला ॥२॥ त्या कृपेचा बोध सबळ ॥ ब्रह्म उदधि पावला मेळ ॥ पात्रा मैनावती सबळ ॥ सरिताओंघीं दाटली ॥३॥ ॐ नमो ब्रह्मार्णवीं दाटली परी ॥ ऐक्यरुप झाली नारी ॥ मोहें पुत्राचें परिवारीं ॥ गुंतलीसे जननी ते ॥४॥ मनासी म्हणे अहा कैसें ॥ त्रिलोचनरायाचें जाहले जैसें ॥ त्याचि नीतीं होईल तैसें ॥ मम सुताचें काय करुं ॥५॥ जंव जंव पाहे त्यातें दृष्टीं ॥ तंव तंव वियोग वाटे पोटीं ॥ हदयी कवळूनि जठरवेष्टी ॥ होत असे मोहानें ॥६॥ अहा पुत्राचें चांगुलपण ॥ दिसे जैसा प्रत्यक्ष मदन ॥ परी काय करावें चांगुलपण ॥ भस्म होईल स्मशानीं ॥७॥ उत्कृष्टपणें करोनि कष्ट ॥ धाम उभाविलें अति श्रेष्ठ ॥ परी वन्हिबळें लागल्य काष्ठ ॥ तेवीं असे काळाग्नी ॥८॥ पहा पल्लवपत्रझाड ॥ अति विशाळ लावला पाड ॥ परी गाभारी वेष्टितां भिरुड ॥ उशाशीं काळ बैसला ॥९॥ तन्न्यायें दिसूनि येत ॥ वायां जाईल ऐसा सुत ॥ कीं कद्रूलागीं चोखट अमृत ॥ फिकरपणे मिरविले ॥१०॥ कीं यत्नेंकरुनि कचें दुर्घट ॥ संजीवनीचा केला पाठ ॥ परी देवयानीचा शाप उल्हाट ॥ यत्र व्यर्थ तो झाला ॥११॥ कीं सुंदर जाया कर्मे जारिणी ॥ परी पतिभयाच धाक मनीं ॥ तेवीं तो उशाशीं काळ बैसोनि ॥ सकळ जनां मिरवला ॥१२॥ कीं कुसुमशेज मृदुलाकार ॥ परी उसां घालूनि निजे विखार ॥ ते सुखनद्रेचा व्यापार ॥ सुखा लाहे केउता ॥१३॥ तन्न्यायें झालें येथ ॥ राजवैभव अपरिमित ॥ परी काळचक्राची सबळ बात ॥ भ्रमण करीत असे पैं ॥१४॥ ऐसी सदासर्वकाळ ॥ चित्तीं वाहे माय तळमळ ॥ परी सुतासी बोध कराया बळ ॥ अर्थ कांही चालेना ॥१५॥ तंव कोणी ऐके दिवशीं ॥ शीतकाळ मावमासीं ॥ उपरी सहपरिचारिकेंसीं उष्ण घेत बैसलीसे ॥१६॥ ते संधींत गोपीचंद ॥ चौकीविभागीं सकळ स्त्रीवृंद ॥ वेष्टूनि स्नान कराया सिद्ध ॥ चंदनचौकीं बैसला ॥१७॥ चंदनचौकी परी ते कैशी ॥ हेमतगंटी रत्न जैशीं ॥ जडावकोंदणी नक्षत्रांसीं ॥ राजवृंदीं चमकतसे ॥१८॥ सकळ काढूनि अंगींचे भूषण ॥ वरी विराजे राजनंदन ॥ उष्ण उदकीं करीत दंतधावन ॥ चौकीवरी बैसला ॥१९॥ तों सौधउपरी मैनावती ॥ झाली स्वसुतातें पाहती ॥ देखिला जैसा पूर्ण गभस्ती ॥ तेजामाजी डवरला ॥२०॥ राजसेवकाचें भोवतें वेष्टन ॥ परिचारिका वाहती जीवन ॥ परी त्या मंडळांत नृपनंदन ॥ चांगुलपर्णी मिरवतसे ॥२१॥ जैसा अपार पाहतां स्वनंदन ॥ मोहें आलें उदरवेष्टन ॥ तेणें लोटलें अपार जीवन ॥ चक्षूंतूनि झराटले ॥२३॥ परी ते बुंद अकस्मात ॥ मोहें घ्राणाचे उदभव व्यक्त ॥ गोपीचंद चातकातें ॥ स्पर्शावया धावले हो ॥२४॥ म्हणाल बुंद चक्षूदकीं ॥ नोहे उरते सत्कर्मवाकीं ॥ उत्तम फळांवें लक्षूनि सेकी ॥ व्यक्त जलें ते अंगासी ॥२५॥ बुंद नव्हती ते चिंतामणी ॥ हरुष केला भवकाचणी ॥ कीं कृतांतभयातें संजीवनी ॥ भूपशरीरा आदळले ॥२६॥ कीं अर्के पीडित भारी ॥ नृपजन वेष्टला नगरी ॥ तैं ते उतरले घन मनहरी ॥ बुंदवेश धरुनियां ॥२७॥ कीं काळक्षुधेचा पेटला अनळ ॥ तेणें शरीर झालें विकळ ॥ ते संधींत होऊनि कृपाळू ॥ कामधेनु उतरली ॥२८॥ कीं दरिद्राचें अतिवेष्टन ॥ तैसा येथें मिरविला कुबेर येऊन ॥ तन्न्याय सुबुंद घन ॥ रावहदयीं आदळले ॥२९॥ शरीरीं होतां बुंद लिप्त ॥ परी उदभवस्थिती लागली त्यांत ॥ म्हणूनि ऊर्ध्व करुनि मूर्धातें ॥ नभालागीं विलोकीं ॥३०॥ हदयीं होऊनि राव शंकित ॥ म्हणे बुंद कैंचा उदभवला येथ ॥ तरी अंबर झालें असेल व्यक्त ॥ घनमंडळ आगळें ॥३१॥ म्हणूनि ऊर्ध्व करुनि दृष्टी ॥ पाहता झाला नभापोटीं ॥ परी ते निर्मळपणें वृष्टी ॥ झाली कोठूनि म्हणतसे ॥३२॥ ऐसा विचार करितां चित्तीं ॥ दृष्टिगोचरी संभविती ॥ तों रुदन करितां मैनावती ॥ निजदृष्टीं देखिली ॥३३॥ करीत होता दंतधावन ॥ तैसाचि उठला नृपनंदन ॥ उपरी त्वरा वेगीं चढून ॥ मातेपाशीं पातला ॥३४॥ जातांचि पदी ठेवूनिया माथा ॥ उभा जोडूनि हस्तां ॥ म्हणे सांग जी कवण अर्था ॥ उचंबळलीस जननीये ॥३५॥ मजसारखा तूतें सुत ॥ राज्याधीश महीं व्यक्त ॥ ऐसा असूनि दुःखपर्वत ॥ कोठूनि उदेला तंव चित्तीं ॥३६॥ पाहें पाहें प्रताप आगळा ॥ न वर्णवे बळ बळियांकित महीपाळा ॥ मिरवती दर्पकंदर्प केवळा ॥ करभारातें योजिती ॥३७॥ ऐसी असतां बळसंपत्ती ॥ बोललें कुणी दुःखसरितीं ॥ तरी मम कोपाचा दाहक गभस्ती ॥ सांवरेल कोणातें ॥३८॥ जेणें पाहिलें असेल नयनीं ॥ उगीच तीव्र दृष्टी करोनि ॥ तरी तयाचे क्षणें चक्षु काढोनि ॥ तव करीं माये ओपीन गे ॥३९॥ किंवा दाविलें असें बोटी ॥ तरी तींच बोटें काढीन शेवटीं ॥ तरी कवण अर्थ उदेला पोटीं ॥ रुदन कराया जननीये ॥४०॥ अष्टविंशति स्त्रीमंडळ ॥ कीं त्यांनीं ओपिलें कडुवट फळ ॥ तरी शिक्षा करुनि तयां सबळ ॥ मोक्षपंथा मिरवीन ॥४१॥ किंवा माझिये दृष्टी सेवेशीं ॥ उदया पावला अंतर शेषीं ॥ म्हणूनि उदय शोकानिशी ॥ दर्शविली त्वां मातें ॥४२॥ तरी कोणता कवण अर्थ ॥ माते वदे प्रांजळवत ॥ कामनीं वेधक असेल चित्त ॥ तोचि वेध निवटीन मी ॥४३॥ म्हणसील कार्य आहे थोर ॥ करुं न शके सुत पामर ॥ तरी हा देह वेंचूनि समग्र ॥ अर्थ तुझा पुरवीन मी ॥४४॥ जरीं ऐशिया दृष्टीं ॥ अंतर पडेल काय पोटीं ॥ तरी धिक्कार असो मज शेवटीं ॥ पुत्रधर्म मिरवावया ॥४५॥ मग श्वान सूकर काय थोडीं ॥ अवतार मिरविती द्वारीं पवाडी ॥ याचि नीति तया प्रौढीं ॥ निर्माण झालों मी एक ॥४६॥ अहा पुत्रधर्म मग कैसा ॥ माता पिता दुखलेशा ॥ पाहूनि चित्तीं परी हरुषा ॥ भूमार तो नर एक ॥४७॥ आपण मिरवे राणिवा प्रकरणीं ॥ मातापिता दैन्यवाणीं ॥ तयाचे भारें सकळ मेदिनी ॥ विव्हळ दुःखे होतसे ॥४८॥ कांतेलागी शृंगार व्यक्त ॥ मातेसी वसन नेसावया भ्रांत ॥ तयाचे भारीं धरा समस्त ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥४९॥ कांतेसी नेसावया वस्त्रें भरजरी ॥ माता ग्रंथीं चीर सावरी ॥ तयाचे भारें सकळ धरित्री ॥ विव्हळ दुःखें होतसे ॥५०॥

कांतेसी इच्छा समान देणें ॥ मातेसीं खावया न मिळे अन्न ॥ तयाचे भारें पृथ्वी सधन ॥ विव्हळ दुःखे होतसे ॥५१॥ कांतेसी बसावया उंच शासन ॥ मातेसी कष्टवी दासीसमान ॥ तयाचे भारें धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५२॥ रंभेसमान कांता ठेवी ॥ भूतासमान माता मिरवी ॥ तयाचे भारें धरादेवी विव्हळ दुःखी होतसे ॥५३॥ जन्म घेतला जियेचे पोटीं ॥ तीते म्हणे परम करंटी ॥ तयाचे भारें धरा हिंपुटीं ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५४॥ कांता सर्व सुखाचे मेळीं ॥ माता दुःखें अश्रु ढाळी ॥ तयाचे भारें धरा विव्हळी ॥ आणि दुःखी होतसे ॥५५॥ कांतेलागीं मृदु भाषण ॥ मातेसी हदयी खोंची बाण ॥ तयाचे भारें धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५६॥ आपण मिरवे राणिवासरसा ॥ पितया काळा मातंग जैसा ॥ तयांचे भारें धरा क्लेशा ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५७॥ आपण कंठी कुड्या पडुडी ॥ पित्याशिरीं बत्या जोडी ॥ तयाचे मारें धरा मुख मुरडी ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५८॥ आपण भक्षी सदा सुरस अन्न ॥ पितर मागती भिक्षा कदन्न ॥ तयाचे भारें ॥ धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५९॥ तरी ऐसिये पुत्र सृष्टीं ॥ गळावेत गर्भीहून शेवटीं ॥ तन्न्यास अर्थ पोटीं ॥ माझा न धरी जननीये ॥६०॥ जे तुज वेधक मनकामना ॥ तयासाठीं वेचीन प्राणा ॥ परी माये वो तव वासना ॥ पूर्ण करीन निश्वयेसी ॥६१॥ ऐसी बोलता स्वसुत वार्ता ॥ प्रेमान्धि उचंबळला चित्ता ॥ मग हितार्थरत्न द्यावया हाता ॥ वाग्लहरी उचंबळे ॥६२॥ म्हणे बारे ऐक वचन ॥ प्रेम उदयाचळीं तूं दिव्यरत्न ॥ उदय पावलासी चंडकिरण ॥ शत्रुतम निवटावया ॥६३॥ तया ठायीं अंधकार ॥ मज पीडा वा काय करणार ॥ परिस लाधल्या वसतिस दरिद्र ॥ स्वप्नामाजी नांदेना कीं ॥६४॥ बा रे तव प्रताप दर्प ॥ पादरज झाले धूप ॥ ऐसें असतां कोप कंदर्प ॥ मातें कोण विवरील ॥६५॥ बा रे तीव्र प्रतापी स्थावर केसरी ॥ तयाचे लेकुरा वारण मारी ॥ हा विपर्यास कवणेपरी ॥ मिरवूं आहे जगातें ॥६६॥ राया नरेंद्रा तुझी मी माता ॥ मातें कोण होय गांजिता ॥ परी चिंत्ता उदरी मोहव्यथा ॥ शोकतरु उदवभवला ॥६७॥ बा रे तव स्वरुप पूर्ण अर्क ॥ पाहतां मातें उदेला शोक ॥ म्हणशील जरी अर्थदायक ॥ कवणापरी उदेला तो ॥६८॥ बा रे तव पिता तव समान ॥ स्वरुप उदेलें अर्कप्रमाण ॥ परी काळ अस्ताचळीं जाऊन ॥ गुप्त झाला पुरुष तो ॥६९॥ अहा अपार तो स्वरुपाब्धी ॥ अंतीं वेष्टी वडवानळसंधीं ॥ पडतां बा रे विशाळ बुद्धी ॥ भस्म झाला क्षणांतरी ॥७०॥ अस्थी जळाल्या काष्ठासमान ॥ लोभ दाहिलें जेउतें तृण ॥ मांसस्नेहाचें होऊनि शोषण ॥ स्वरुपातें लोपला तो ॥७१॥ तंव त्या भयाची हुडहुडी मोठी ॥ बा रे मज उदेली पोटीं ॥ तुझें स्वरुप पाहतां दृष्टीं ॥ भयातें उठी उठावे ॥७२॥ बा रे कृतांत महीं विखार ॥ धुमधुशीत वारंवार ॥ टपूनि बैसला जैसा मांजर ॥ मूषकातें उचलावया ॥७३॥ जैसा व्याघ्र जपे गाई ॥ कीं मीन वेंची बगळा प्रवाहीं ॥ तैसें जगातें तन्न्यायीं ॥ कृत्तांत आहारीं नटलासे ॥७४॥ तरी तो व्याघ्र ऐसा सबळ ॥ जिंकूनि योजावा पिंजरीं मेळ ॥ बा रे तैं भयाच वडवानळ ॥ मग स्पर्शणार नाहीं देहातें ॥७५॥ बा रे विखार डंखी दुःख ॥ तोंचि वेंचिल्या सकळ सुख ॥ कंटकीं धरिल्यास सकळ वृश्विक ॥ वेदनेतें मिरवेना ॥७६॥ ऐसेपरी रचूनि युक्ती ॥ सकळ हरावा कृत्तांत गती ॥ व्यर्थ शरीराची माती ॥ करुं नये जन्मल्यानें ॥७७॥ आपण आपुले पहावें हित ॥ सारासार नरदेहांत ॥ पाहें वश्य करुनि रघुनाथ ॥ चिरंजीव झाला बिभीपण ॥७८॥ पाहें नारद वैष्णव कैसा ॥ विष्णु पाराधी नरवेषा ॥ तो श्रीगुरु वरदेषा ॥ अमरपणीं मिरविला ॥७९॥ त्याचि नारदासी कृपाधन ॥ बोलला श्रीव्यास महीकारण ॥ तेणें पिकलें ब्रह्मपण ॥ शुक महाराज तिसरा ॥८०॥ त्याचा कौशिक अनुगृहीत ॥ तेणें करोनि शरणागत ॥ कृष्णयाज्ञवल्की तारुनि निश्वित ॥ तेणें तारिला रामानुज ॥८१॥ ऐसा प्रकाश सांप्रदाय मिरवून ॥ ते पुरुष झाले ब्रह्मसनातन ॥ तेवीं तूं बाळा माझा नंदन ॥ जगामाजी मिरवीं कां ॥८२॥ ऐसें बोधितां मैनावती ॥ संपली येथूनि तिची उक्ति ॥ परी श्रोते कवि ते संप्रदाय पुसती ॥ सांगा म्हणती चातुर्य ॥८३॥ ऐसा प्रश्न कवि पाहून ॥ सांगे संप्रदाय पूर्ण ॥ रामानुजापासून ॥ योगिया संत पैं झाला ॥८४॥ तयापासूनि मुकुंदराज ॥ मुकुंदराजाचा जैत्पाल भोज ॥ जैत्पालाचा धर्मानुज ॥ बोधल्यादिक पैं त्याचे ॥८५॥ यापरी द्वितीय संप्रदायी ॥ माता सुतातें लोटी बोधप्रवाहीं ॥ उमेनें आराधोनि शिवगोसावी ॥ चैतन्यसंप्रदायीं मिरवला ॥८६॥ त्यानें बोधिला कपिलमानी ॥ आणि दुसरा राघवचैतन्यस्वामी ॥ राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी ॥ तयाचा केशवचैतन्य ॥८७॥ केशवाचा बाबाचैतन्य ॥ श्रीतुकाराम त्याचा धन्य धन्य ॥ हा चैतन्यसंप्रदाय उत्तम मान्य ॥ संतगणीं मिरवितो ॥८८॥ यापरी तिसरा संप्रदाय ॥ महाश्रेष्ठ म्हणती स्वरुपमय ॥ तरी प्रथम बोधिला कमलोद्भव ॥ हंसरुपें श्रीविष्णूनें ॥८९॥ ते विधीचे सकळ हित ॥ अत्रीनें घेतले सकळ पंथ ॥ अत्रीपासूनि झाले दत्त ॥ तयापासूनि नाथ सकळ ॥९०॥ यापरी सांप्रदाय पाहें ॥ चवथा नंद महीतें आहे ॥ सूर्यापासूनि याज्ञवल्की पाहे ॥ ब्रह्मवेत्ता मिरविला ॥९१॥ तयापासूनि सहजानंद ॥ सहजानंदाचा कूर्म अवतार प्रसिद्ध ॥ कूर्मानें उपदेशिला ब्रह्मानंद ॥ ब्रह्मानंदाचा योगानंद कीं ॥९२॥ योगानंदाचा चिदानंद ॥ जगीं मिरवत आहे प्रसिद्ध ॥ तरी तुवां गोपीचंद ॥ हित करुनि घेई कां ॥९३॥ तेणेंकरुनि अमरपणी ॥ जगीं मिरविसी महाप्राज्ञी ॥ यास्तव बा रे माझे नयनीं ॥ अश्रू लोटले तुजलागी ॥९४॥ याउपरी बोले नृपनाथ ॥ बोलसी माते सत्यार्थ ॥ परी प्रस्तुतकाळीं ऐसा नाथ ॥ कोण मिळेल कोठूनि होईल जननीये ॥९६॥ ऐसी ऐकूनि तयाची मात ॥ माता बोलती झाली त्यातें ॥ बा रे तैसाचि आपुले गांवांत ॥ जालिंदरनाथ मिरवला ॥९७॥ स्वरुप सांप्रदाय परिपूर्ण ॥ तूतें करील ब्रह्मसनातन ॥ तरी तूं कायावाचामनें करुन ॥ शरण जाई तयासी ॥९८॥ बा रे तुझें वैभव थोर ॥ राजकारणी कारभार ॥ परी मायिक सकळ विस्तार ॥ लया जाईल बाळका ॥९९॥ तरी तनमनधनप्राण ॥ शरण रिघावें तयाकारण ॥ आपुलें हित अमरपण ॥ जगामाजी मिरवीं कां ॥१००॥

ऐसें ऐकोनि मातेचें वचन ॥ बोलता झाला त्रिलोचननंदन ॥ म्हणे माते तयासी शरण ॥ जालिया योग्यता फिरावें ॥१॥ सकळ टाकूनि सुखसंपत्ति ॥ राजवैभव दारासुती ॥ आप्तवर्गादि सोयरेजाती ॥ टाकूनि योग कैसा करावा कीं ॥२॥ द्वादशवरुषें मातें ॥ भोगूं दे सकळ वैभवातें ॥ मग शरण रिघूनि त्यातें ॥ योगालागी कशीन कीं ॥३॥ कशीन तरी परी कैसा ॥ मिरवीन ब्रह्मांडांत ठसा ॥ कीं उत्तानपादराजसुतापरी ॥ शिका जगामाजी मिरवीन ॥४॥ माता म्हणे बाळा परियेसीं ॥ पळ घडी भरंवसा नाहीं देहासी ॥ तेथे संवत्सर म्हणतां द्वादशो ॥ देखिले कोणी बाळका ॥५॥ चित्त वित्त आणि जीवित्व आपुलें ॥ अचळ नोहे अशाश्वत ठेलें ॥ क्षणैक काय होईल न कळे ॥ क्षणभंगुर वर्ततसे ॥६॥ बा रे उदकावरील बुडबुडा ॥ कोण पाहील अशाश्वत चाडा ॥ वंध्यापुत्रें घेतला वाडा ॥ मृगजळा केवीं तृषातें ॥७॥ तेवीं वारे सहजीस्थतीं ॥ बोलतां न ये अशाश्वती ॥ स्वप्नप्रवाहीं इंद्रपदासी ॥ भोगीत खरे न मानावें ॥८॥ तन्न्याय अभासपर ॥ सकळ मिरवतसे चराचर ॥ त्यांतूनि कोणीएक रणशूर ॥ शाश्वतपदा मिरवितसे ॥९॥ शुक दत्तात्रेय कपिलमुनी ॥ व्यास वसिष्ठाची मांडणी ॥ प्रल्हादादिक भागवतधर्मी ॥ ऐसे कोणी निवडिले ॥११०॥ नाहींतरी होताती थोडीं ॥ सकळ बांधिली प्रपंचबेडीं ॥ परी यमरायाच्या रक्षकवाडी ॥ एकसरां कोंडिलीं ॥११॥ म्हणूनि बा रे सांगतें तुज ॥ शाश्वत नोहे काळ समस्त ॥ कोणे घडी घडेल केउत ॥ अक्कलकळा कळेना ॥१२॥ ऐसा बोध माता करितां ॥ लुमावंती तयाची कांता ॥ गुप्तवेषें श्रवण करितां ॥ हाय हाय म्हणतसे ॥१३॥ म्हणे माता नोहे पापिणी ॥ पुत्रासी योजिती पुत्रकाचणी ॥ ऐसी राज्यविभवमांडणी ॥ जोग देऊं म्हणतसे ॥१४॥ तरी राज्यासी आली विवशी ॥ उपाय काय करावा यासी ॥ रामासारिखा पुत्र वनवासीं ॥ कैकेयीनें धाडिला ॥१५॥ स्वभ्रताराचा घेतला प्राण ॥ चतुर्थपुत्रा लाविलें रानोरान ॥ तन्न्याय आम्हांकारणें ॥ देव क्षोभला वाटतसे ॥१६॥ दुष्ट स्वप्न दृष्टीं येतां ॥ तकीं मानिती विनाश चित्ता ॥ म्हणतां प्रवेशली दुःखव्यथा ॥ तरी देव क्षोभतात ॥१७॥ दासदासी आपुले हाती ॥ आज्ञेमाजी सकळ वर्तती ॥ ते अवज्ञा करोनि उत्तर देती ॥ तरी देव क्षोभला जाणावें ॥१८॥ सहज ठेविलें धनमांदुस ॥ पुढें काढूं जातां कार्यास ॥ तें न सांपडे ठेविल्यास ॥ तरी देवक्षोम जाणिजे ॥१९॥ सभेस्थानीं सत्यार्थगोष्टी ॥ करितां अनृत वाटे चावटी ॥ लोक बैसती चेष्टेपाठी ॥ तरी देवक्षोभ जाणिजें ॥१२०॥ आपुलें धन लोकांवरी सांचे ॥ तें मागूं जातां स्वयें वाचे ॥ ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचें ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२१॥ आपुली विद्या तीव्रशस्त्र ॥ शत्रुकाननीं विनाशपात्र ॥ ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥२२॥ नसतां वांकुडे पाऊल कांहीं ॥ नागाविला जाय राजप्रवाहीं ॥ नसत्या कळीं बैसल्या ठायीं ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२३॥ आपुला शत्रु प्रतापापुढें ॥ मिरवी जैसा अति बापुढें ॥ त्या शरण रिघतां आपुल्या चाडें ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२४॥ लोकां उपकार केला विशेष ॥ तेचि लोक मानिती आपुला त्रास ॥ पाहूं नका म्हणती मुखास ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२५॥ नसता अधिमधीं उत्तरा ॥ नसतीच विघ्ने येती घरा ॥ तेंचि करणें परिहारा ॥ देवक्षोभ जाणिजे ॥२६॥ गृहीचें मनुष्य मुष्टींत सकळ ॥ असूनि वाढे गृहांत कळ ॥ आपुले न चाले कांहींच बळ ॥ तरी देंवक्षोभ जाणिजे ॥२७॥ तरी हेचि नीति उपदेश ॥ माता करीत आहे पुत्रास ॥ तरी बरवें नोहे हा विनाश ॥ जगामाजी मिरवेल ॥२८॥ तरी ह्या द्वंद्वसुखाची कहाणी ॥ पेटेल महावडवानळ वन्ही ॥ राजवैभव हें अब्धिपाणी ॥ भस्म करील निश्वयें ॥२९॥ ऐसा विचार करुनि मानसीं ॥ लुमावंती प्रवेशे स्वसदनासी ॥ येरीकडे मैनावतीसी ॥ उत्तर देंत नरेंद्र ॥१३०॥ म्हणे माय वो तव कामनीं ॥ ऐसेंचि आहे वेधक मनीं ॥ तंव त्या स्वामीची करणी ॥ निजदृष्टी पाहीन वो ॥३१॥ माझें मजलागीं हित ॥ तें द्यावया असेल सामर्थ्य ॥ शोध शोधितां भक्तिपंथ ॥ सहज दृष्टीं पडेल वो ॥३२॥ मग मी सोडूनि सकळांस ॥ तनधनमन ओपीन त्यास ॥ तूं येथून वाईट चित्तास ॥ सहसा न मानीं जननीये ॥३३॥ ऐसें वदोनि समाधानीं ॥ नृप गेला स्नानालागोनी ॥ येरीकडे अंतःपुरसदनीं ॥ काय करी लुमावंती ॥३४॥ परम आवडत्या स्त्रिया पांचसात ॥ तयांच्या आज्ञेंत नृपनाथ ॥ पट्टराणिया प्रीतिवंत ॥ सदा सर्वदा वर्तती ॥३५॥ तयांसी पाठवूनि परिचारिका ॥ बोलाविल्या सद्विवेका ॥ त्यांत लुमावंती मुख्य नायिका ॥ पट्टराणी रायाची ॥३६॥ वेगें मांडूनि कनकासन ॥ बैसविल्या प्रीतींकरुन ॥ तांबूलदि पुढें ठेवून वृत्तांत सांगे रायाचा ॥३७॥ बाई वो बाई विपरीत करणी ॥ मैनावती राजजननी ॥ विक्षेप पेटला तियेचे मनीं ॥ काय सांगू तुम्हातें ॥३८॥ कोण गावांत आला हेला ॥ जालिंदर ऐसें म्हणती त्याला ॥ त्याचा अनुग्रह देऊनियां रायाला ॥ जोग देऊं म्हणतसे ॥३९॥ ऐसें वैर भोगवी माता सुत ॥ निश्वय करुनि केला घटपटीत ॥ रायासी बोधितां श्रवणीं मात ॥ सकळ झाली वो बाई ॥१४०॥ मग राजवैभव सकळ नासलें ॥ स्तंभ भंगल्या सदन पडिलें ॥ मुळींचि अर्कालागीं गिळिलें ॥ मग अंधकार सर्वस्वीं ॥४१॥ मग आपण अष्टविंशती सती ॥ असूनि काय करावी माती ॥ परचक्र येऊन सकळ संपत्ति ॥ विनाशातें पावे हो ॥४२॥ परी येउते अर्थाअर्थी ॥ कैसी करावी ती युक्ती ॥ सांगावी आधीं योजूनि सबळ मतीं ॥ केलिया कारण मोडावे ॥४३॥ अगे वन्ही म्हणूं नये लहान ॥ तो क्षणें जाळील सकळ सदन ॥ तरी त्यातें करुनि सिंचन ॥ विझवूनियां टाकावा ॥४४॥ उशा घातला विखार ॥ मग सुखनिद्रा केवीं येणार ॥ विप भेदूनि गेल्या जठर ॥ जीवित्व काय वांचेल ॥४५॥ तरी प्रथमचि सारासार ॥ करुनि मोडावा सकळ प्रकार ॥ ऐसी बुद्धि रचूनि सार ॥ सुखसंपत्ति भोगा कीं ॥४६॥ ऐसी ऐकूनि तियेची उक्ती ॥ मग तर्कवितर्क करिती त्या युवती ॥ नानाबुद्धि विलाप दाविती ॥ परी निश्वय न घडे कोणाचा ॥४७॥ यापरी विशाळबुद्धी युवती ॥ विचार काढी लुमावंती ॥ की येअर्थी दिसे एक मजप्रती ॥ सुढाळपणीं नेटका ॥४८॥ आपुल्या गावांत जालिंदर ॥ जोगी आहे वैराग्यपर ॥ तरी तयाचा अपाय करुनि थोर ॥ निर्दाळावा सर्वस्वीं ॥४९॥ निर्दाळावा तरी कैसे रीतीं ॥ तयाच्या भक्तीसी मैनावती ॥ आहे तरी राजयाप्रती ॥ निवेदावें कुडे भावें ॥१५०॥

तरी तो तुमचा वसवसा ॥ ग्रीवे मिरवितसे भयार्थ फांसा ॥ म्हणूनि युक्ति रचिली मानसा ॥ गाढपणीं ऐकावी कीं ॥५१॥ निवेदावें तरी कैसें ॥ काम न आवरे मैनावतीस ॥ म्हणूनि चित्तीं उदास ॥ जालिंदर भोगितसे ॥ ॥५२॥ जालिंदराचा अनुग्रह देऊन ॥ जोगी करावा राजियाकारण ॥ मग करुनि पाठवावा तीर्थाटन ॥ अथवा तपाचे कारणीं ॥५३॥ मग तो गेलिया दूर देशीं ॥ गृहीं आणूनि जालिंदरासी ॥ बैसवोनि राज्यासनासी ॥ सकळ सुखा भोगावें ॥५४॥ ऐसें सांगूनि सकळ रायातें ॥ उदय करावा कोपानळातें ॥ मग सहजविधि जालिंदरनाथ ॥ भस्म होईल त्यामाजी ॥५५॥ जैसे विषय अति गोड ॥ गोडचि म्हणूनि करावा पुड ॥ मग तें मिरवे शत्रुचाड ॥ द्वंद्वसुख वाटावया ॥५६॥ ऐसा विचार करुनी गोमटा ॥ जात्या झाल्या त्या बरवंटा ॥ येरी सांगे राजपटा ॥ गोपीचंद मिरवला ॥५७॥ राजकारणीं अपार वार्ता ॥ रागरंग कुशळता ॥ मानरंजनीं नृपनाथा ॥ दिवस लोटूनि पैं गेला ॥५८॥ मग निशाउदय तममांडणी ॥ तेही प्रहर गेली यामिनी ॥ मग पाकशाळेंत भोजन करुनी ॥ अंतःपूरीं संचरला ॥५९॥ संचरला परी लुमावंती ॥ तिच्याचि गेला सदनाप्रती ॥ तिने पाहुनी राजाधिपती ॥ कनकासनी बैसविला ॥१६०॥ उचलोनि परमभक्तीं मांदार ॥ बैसला आहे मंचकावर ॥ गौरवूनि षोडशोपचार ॥ प्रेमडोहीं बुडविला ॥६१॥ मग तो राव होऊनि निर्मर ॥ रतिसुखाचा करुनि आदर ॥ यावरी गजगामिनी जोडूनि कर ॥ बोलती झाली रायातें ॥६२॥ हे महाराज प्रतापतरणी ॥ एक वार्ता ऐकली कानीं ॥ परी वदतां भय कीं मनीं ॥ संचरत आहे महाराजा ॥६३॥ जरी न बोलावें ठेवूनी गुप्त ॥ तरी महाअनर्थाचा पर्वत दिसत ॥ वदूं तंव तरी भयांत ॥ चित्त गुंडाळा घेतसे ॥६४॥ ऐसा उभय पाहतां अर्थ ॥ भ्रांतीमाजी पडलें चित्त ॥ तरी सुखशब्दाचा सरुनि वात ॥ वार्ता अवघड महाराजा ॥६५॥ ऐसें ऐकूनि राव बोलत ॥ म्हणे सकळ सोडूनि भयातें ॥ निर्विकार कवण अर्थ ॥ असेल तैसें कळविजे ॥६६॥ येरी म्हणे द्याल भाष्य ॥ तरी चित्त सोडील भयदरीस ॥ मग खरें खोटें बरें रत्नास ॥ तुम्हांलागीं अर्पिन तें ॥६७॥ ऐसें वचन नृप ऐकतां ॥ मग करतलभाष्य झाला देंता ॥ म्हणे मम दर्पभयाची व्यथा ॥ सोडूनि वार्ता बोल कीं ॥६८॥ येरी म्हणे जी एक कुडें ॥ मातेनें रचिलें तुम्हांपुढें ॥ जालिंदर योगी विषयपांडें ॥ वश्य केला आहे की ॥६९॥ परी तुमचा भयाचा संदर्प ॥ अंगी विरला विषयकंदर्प ॥ तेणेंकरुनि बुद्धी कुरुप ॥ तिनें वरिली आहे जी ॥१७०॥ तुम्हांसी अनुग्रह देऊनि त्याचा ॥ वेष द्यावा योगीयाचा ॥ मग तीर्थाटनीं योग तुमचा ॥ बोळवावें तुम्हांते ॥७१॥ तुम्ही गेलिया तपाकारण ॥ दूरदेशी विदेशाकारण ॥ मग जालिंदराप्रती आणून ॥ राज्यासनीं ओपावा ॥७२॥ ऐसें प्रकरणीं सहजस्थिती ॥ श्रुत मात झालें आम्हांप्रती ॥ परी आमुचे सौमाग्यनीतीं ॥ भाग्यार्क दिव्य जाहले ॥७३॥ आमचें कुंकुम होतें अचळ ॥ म्हणोनि दृष्टीं आले ऐसे फळ ॥ यापरी तुम्हा नृपाळ ॥ वाईट बरें विलोका ॥७४॥ ऐसी ऐकोनि तियेची वार्ता ॥ उज्बळला क्रोधनळाच्या माथां ॥ मग अनर्थानळाच्या शाखा दावितां ॥ भयंकररुपी जाहलासे ॥७५॥ मग तो क्रोध न वदवे वाणी ॥ प्रत्यक्ष आला वडवानळ अग्नी ॥ नाथ जालिंदर समुद्रपाथी ॥ प्राशावया क्षोभला ॥७६॥ मग तो उठोनि तैसेचि गतीं ॥ बाहेर जाय तो नृपती ॥ मंत्री बोलावूनि सेवकांहातीं ॥ जालिंदरा पाहों चला ॥७७॥ शीघ्र आणोनि कामाठ्यांसी ॥ गर्ती योजिली कूपासरसी ॥ नाथ जालिंदर ते उद्देशीं ॥ तयामाजी लोटिला ॥७८॥ अश्वलीद न गणती ॥ तेथें सर्वत्र पडली होती ॥ ती लोटूनि गर्तेवरती ॥ नाथजती बुजविला ॥७९॥ ऐसें गुप्त करोनि प्रकरण ॥ राव सेवी आपुलें स्थान ॥ परी सेवकां ठेविले सांगोन ॥ मात बोलूं नका ही ॥१८०॥ जरी होतां मुखलंपट ॥ मम श्रोत्रीं आलिया नीट ॥ त्याचें करीन सपाट ॥ यमलोकीं मिरवीन कीं ॥८१॥ ऐसी ऐकूनि भयंकर वार्ता ॥ दर्पासिंह तो योजूनि माथां ॥ रागेला परी सेवकाचित्ता ॥ धुसधुसी मिरवीतसे ॥८२॥ इतुके प्रकरणीं मध्ययामिनी ॥ झाली म्हणूनि नेणती जनीं ॥ अर्कोदयीं पाहिला स्वामी ॥ म्हणती उठोनि गेला असे ॥८३॥ एक म्हणती त्याचें येथें काय ॥ स्वइच्छे बसावें वाटेल तेथ ॥ हा ग्राम नव्हे आणिक राय ॥ ग्रामवस्तीं विराजला ॥८४॥ ऐशी बहुतांची बहुत वाणी ॥ प्रविष्ट झाली जगालागोनी ॥ कीं जालिंदर गेला येथूनी ॥ महीं भ्रमण करावया ॥८५॥ ऐसी वार्ता नगरलोकीं ॥ उठली ऐकूनि परिचारिकी ॥ त्या जाऊनि साद्विवेकी ॥ मैनावतीसी सांगती ॥८६॥ कीं महाराज आपुला गुरु ॥ वस्तुफळाचा कल्पतरु ॥ उठोनि गेला कोठें दुरु ॥ महीं भ्रमण करावया ॥८७॥ ऐसें ऐकोनि मैनावती ॥ असंतोषली परम चित्तीं ॥ म्हणे मम सुताचे दैवाप्रती ॥ लाभ नाहीं आतुडला ॥८८॥ ऐसें म्हणोनि संकोचित ॥ नेत्रीं प्रेमाश्रु ढाळीत ॥ येरीकडे जालिंदरनाथ ॥ कैसे स्थितीं राहिला ॥८९॥ तरी अवश्य भविष्य जाणणार ॥ आणि मैनावतीचा लोभ अपार ॥ आणि शत्रुमित्र पाहणार ॥ एकरुपीं समत्वें ॥१९०॥ नातरी परम प्रतापी वासरमणी ॥ क्षणें टाकील ब्रह्मांड जाळोनि ॥ तो भद्र ज्याची विपर्यासकरणी ॥ तुष्ट कैसा राहिला ॥९१॥ जो द्वंद्वातीत मूर्तिमंत ॥ दंभरहित स्वरुपीं मिरवत ॥ ममता निःसंग विरहित ॥ कार्याकार्य जाणोनी ॥९२॥ असो गर्तेमाजी यतिनाथ ॥ वज्रासनातें घालोनि खालतें ॥ आकाशास्त्र प्रेरुनि भोंवतें ॥ स्वस्थचित्तीं बैसला ॥९३॥ आकाशास्त्र असतां भोंवतें ॥ लीद मिरवे सभोंवतें ॥ यापरी आकाशास्त्र माथां ॥ वज्रास्त्र स्थापिलें ॥९४॥ तेणेंकरोनि अधरस्थळी ॥ लीद मिरविली आहे शिरीं ॥ येरीकडे अंतःपुरीं ॥ जनवार्ता समजली ॥९५॥ नाथ जालिंदर गेला निघोन ॥ मग सकळ स्त्रियांचें झाले समाधान ॥ बरें झालें म्हणती निधान ॥ येऊनि पहुडल्या सेजेसी ॥९६॥ यापरी पुढें सुरस ॥ धुंडीसुत सांगेल श्रोतियांस ॥ तरी सर्व श्रोतीं टाकूनि आळस ॥ अवधान द्यावें पुढारां ॥९७॥ मालू धुंडी नरहरी वंशीं ॥ कथा वदेल नवरसी ॥ परी वारंवार श्रोत्यांसी ॥ कृपा अवधान मागतसे ॥९८॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥१९९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

Navnath Bhaktisar Adhyay 14 PDF Download:

Loading Viewer...

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.