Navnath Bhaktisar Adhyay 19 is the nineteenth chapter of the book. Reading it is beneficial to attain salvation. The PDF download link is at the end of the article.
Navnath Bhaktisar Adhyay 19:
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी जगदगुरुराजा ॥ सर्वज्ञ विजयभोजा ॥ भवाब्धी भवसरिते काजा ॥ साधका नौका अससी तूं ॥१॥ हे पूर्णब्रह्मानंदकंदा ॥ पुढें बोलवीं भक्ती अतिमोदा ॥ तुझी लीला अगाधा ॥ भक्तिसारग्रंथातें ॥२॥ मागिले अध्यायीं वदविलें गहन ॥ गोपीचंदाचें उदार कथन ॥ बद्रिकाश्रमीं तप करुन ॥ तीर्थाटनीं निघाला ॥३॥ याउपरी ऐकिजे श्रोतीं ॥ सिंहावलोकनीं विश्रांती ॥ गोरक्ष कानिफाचे युक्ती ॥ स्त्रीराज्यांत जातसे ॥४॥ मार्गी चालतां मुक्कामोमुक्काम ॥ सदा श्रीगुरुचें आठवी नाम ॥ ग्रामांत करुनि भिक्षाटन ॥ पुढें मार्ग क्रमीतसे ॥५॥ ऐसिया स्थिती गौडबंगाल ॥ सांडूनि सांडिला बंगालकौल ॥ पुढें जात स्त्रीराज्यांत वहिला ॥ सीमेपर्यंत पातला ॥६॥ परी विचारी स्वमनांत ॥ श्रीगुरुराज आहेत तेथ ॥ राज्यवैभव बहु सामर्थ्य ॥ संपत्तीचे मिरवतसे ॥७॥ ऐसें वैभवमानी सुखप्रकरणीं ॥ मातें ओळखील कैसा कोणी ॥ श्रीमंतापुढें हीनदीन ॥ मान्यत्वातें मिरवेना ॥८॥ जेवीं अर्कापुढें खद्योत ॥ हीन दीन अति दिसत ॥ तेवीं मज कंगालवंताते ॥ कोण तेथें ओळखतील ॥९॥ मेरुपुढें मशकस्थिती ॥ कोणें वर्णावी कवण अर्थी ॥ कीं पुढें बैसल्या वाचस्पती ॥ मैंद वल्गना मिरवीना ॥१०॥ कीं हिरातेजपडिपाडा ॥ गार ठेवूनि पुढां ॥ परीसपालटा देतां दगडा ॥ योग्यायोग्य साजेना ॥११॥ सुवर्ण मिरवे राशी सोळा ॥ तेथें दगडाचा पाड केतुला ॥ तेवीं मातें संपत्ती मिरवला ॥ ओळखील कैसा तो ॥१२॥ असो याउपरी दुसरे अर्थी ॥ मम नाम कळतां मच्छिंद्राप्रती ॥ परम द्वाड लागेल चित्तीं ॥ सुखसंपत्ती भोगितां ॥१३॥ जैसें जेवितां षड्रस अन्न ॥ तैं कडुवट सेवी कोण ॥ तेवीं मच्छिंद्र संपत्तीचें टाकून ॥ जाईल कैसा वैरागी ॥१४॥ यापरी आणि अर्था ॥ मम नाम श्रीगुरुलागीं कळतां ॥ नेणों कल्पना वरुन चित्ता ॥ वर्तेल घाता माझिया ॥१५॥ मग तयाच्या सवें विद्यारळी ॥ करावी आपण बांधूनि कळी ॥ हें तों गोड येणें काळीं ॥ मजप्रती भासेना ॥१६॥ज्या स्वामीचे वंदितों चरण ॥ तयासीं विद्येची रळी खेळेन ॥ हें योग्य मातें नव्हे जाण ॥ अपकीर्ति ब्रह्मांडभरी ॥१७॥ ऐसे तर्कवितर्क करितां ॥ श्रीगोरक्ष मार्गी रमतां ॥ तों वेश्याकटक देखिलें तत्त्वतां ॥ स्त्रीराज्यांत जाती त्या ॥१८॥ तों सकळ वेश्यांची मुख्य कामिनी ॥ गुणभरिता कलिंगानाम्नीं ॥ तिचें स्वरुप वर्णितां वाणी ॥ रतिपति आतळेना ॥१९॥ जिचें पाहतां मुखकमळ ॥ शशितेजाहूनि अति निर्मळ ॥ परम लज्जित चपळा केवळ ॥ होऊनि ढगीं रिघताती ॥२०॥ जिचा नेत्रकटाक्षबाण ॥ तपस्व्यांचें वेधीत मन ॥ मग विषयें लंपट अपार जाण ॥ कवण अर्थी वर्णावे ॥२१॥ ऐसियेपरी सुलक्षण दारा ॥ चातुर्यकलिका गुणगंभीरा ॥ जिचे नाम साजोतरा ॥ कीं हिरा गारा मिरवती ॥२२॥ जिचे सुस्वर विपुल गायन ॥ ऐकतां खालती गंधर्व करिती मान ॥ अप्सरा परम लज्जित होऊन ॥ सेवा इच्छिती जियेची ॥२३॥ ऐशापरी ती कलिंगदारा ॥ जात स्त्रीदेशांत अवसरा ॥ तैं अवचित तीतें गोरक्ष उदारा ॥ देखता झाला निजदृष्टीं ॥२४॥ मग तो जवळा योगद्रुम ॥ जाऊनि पुसे तियेचें नाम ॥ येरी म्हणे कलिंगा उत्तम ॥ नाम असे या देहा ॥२५॥ येरु म्हणे कवणार्थी ॥ जातां कोणत्या ग्रामाप्रती ॥ कलिंगा म्हणे स्त्रीदेशाप्रती ॥ जाणें आहे आमुतें ॥२६॥ राव मैनाकिनी पद्मिनी ॥ सकळ स्त्रियां देशस्वामिनी ॥ तियेतें नृत्यकळा दावूनी ॥ वश्य करणें आहे जी ॥२७॥ ती राजपद्मिनी वश्य होतां ॥ अपार देईल आमुतें वित्ता ॥ यापरी कामना योजूनि चित्ता ॥ गमन करितों आम्ही कीं ॥२८॥ ऐसा वृत्तांत ऐकूनि युवतीं ॥ हदयी विचारी योगपती ॥ कीं इचीच शुद्ध धरुनि संगती ॥ प्रविष्ट व्हावें त्या स्थानीं ॥२९॥ मग सहजस्थितीनें गमना ॥ आव्हानूनि दृष्टीं राजसदना ॥ गुप्तवेषें श्रीगुरुकामना ॥ अवगमूनि घ्यावी तों ॥३०॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ बोलता झाला तिये युवती ॥ म्हणे मी येतों तुमच्या संगतीं ॥ न्याल तरी कीं कृपेनें ॥३१॥ येरी म्हणे नरेंद्रोत्तमा ॥ येऊं पाहसी संगतीं आम्हां ॥ तरी कुशळपणीं काय तुम्हां ॥ भोंवरिली विद्या जे ॥३२॥ येरु म्हणे करुनि गायन ॥ तुम्हांसवें चातुर्य मानून ॥ आणि मृदंगवाद्य वाजवीत ॥ कुशळपणें नेटका ॥३३॥ येरी म्हणे गाणें वाजविणें ॥ येतसे चातुर्यवाणें ॥ तरी प्रथमारंभीं आम्हां दाविणें ॥ कैसे रीतीं कुशळत्व ॥३४॥ येरु म्हणे जी काय उशीर ॥ आतांचि पहावा चमत्कार ॥ हातकंकणा आदर्शव्यवहार ॥ कामया पाहिजे दृष्टीतें ॥३५॥ कीं स्पर्शतां शुद्ध अमरपण ॥ होय न होय केलिया पान ॥ कीं स्पर्शिल्या परिसोन ॥ न होय भ्रांती मिरवेल काय ॥३६॥ तरी आतां या ठायीं ॥ मम विद्येची परीक्षा घ्यावी ॥ ऐसें ऐकतांचि कलिंगा महीं ॥ सदनाहूनि उतरली ॥३७॥ महींतळीं घालूनि आसन ॥ सारंगी देत आणून ॥ म्हणे नवरसे कुशळत्वपण ॥ कळा दावी कोणती ॥३८॥ ऐसी ऐकून तियेची गोष्टी ॥ करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ गंधर्वप्रयोग होटीं ॥ जल्पूनि भाळीं चर्चीतसे ॥३९॥ चर्चूनि दाही दिशा प्रेरीतसे ॥ आणि चतुर्थवाद्यातें स्पर्शीतसे ॥ ऐसें झालिया हुंकार देतसे ॥ गावें वाजवावें म्हणूनियां ॥४०॥ तरी कामनीं तरु पाषाण ॥ जल्पती गंधर्वासारखें गायन ॥ तंतवितंत सुस्वरी वादन ॥ वाजवी वाद्य चतुर्थ हो ॥४१॥ आपुलें आपण वाद्य वाजवीती ॥ पाषाण तरु गायन करिती ॥ हें पाहूनि कलिंगा युवती ॥ आश्चर्य करी मानसीं ॥४२॥ स्वमुखीं ओपूनि मध्यमांगुळी ती ॥ विस्मय करी आपुल्या पोटीं ॥ चित्ती म्हणे हा नरधूर्जटी ॥ ईश्वरतुल्य भासतसे ॥४३॥ जो पाषाणतरुहातीं गायन ॥ करवीत गंधर्वां सरी आपण ॥ तयालागीं स्वतां गायन ॥ अशक्य काय करावया ॥४४॥ जो पाषाणी पिवळेपण ॥ करुं जाणे लोहाचें सुवर्ण ॥ तयालागीं परिसमणी ॥ करावया अशक्य म्हणावें कीं ॥४५॥ जेणें बुरट गौतमीकांसेखालीं ॥ सर्व पदार्थी मही उद्धरिली ॥ त्यातें कामधेनु निर्माया भली ॥ परम अशक्यता न बोलावी ॥४६॥ कीं कोणत्याही वृक्षाखालीं ॥ कामना पुरवी सकळी ॥ ते कल्पतरुमेळीं ॥ आनायासें शोभतसे ॥४७॥ तन्न्यायें वृक्षपाषाणीं ॥ आणिली ज्यानें गंधर्वमांडणी ॥ तो स्वतः सिद्ध कुशलपणीं ॥ गाणार नाहीं कां बोलावें ॥४८॥ तरी आतां असो कैसें ॥ आपणचि रहावें याचे संगतीस ॥ ऐसा विचार करुनि स्वचित्तास ॥ बोलती झाली विव्हळा ॥४९॥ म्हणे महाराजा सदगुणाकरिता ॥ मी दीन किंकर अनाथा ॥ ऐसा काम उदेला चित्ता ॥ तरी सिद्धार्थ आव्हानीं ॥५०॥
अगाध वर्णनाची सविताराशी ॥ दैवें उदेली मम तमगुणासी ॥ तरी संज्ञा जे बोलिलासी ॥ तोंचि सिद्ध आव्हानीं ॥५१॥ तरी महाराजा विद्यार्णवा ॥ जगीं मिरवसी कोणत्या भावा ॥ ऐसें पुसतां गोरक्ष जीवा ॥ परम कल्पना योजीतसे ॥५२॥ चित्तीं म्हणे नामाभिधान ॥ प्रविष्ट न करावें इजकारण ॥ गुप्त ठेविल्यास कार्य साधन ॥ घडूनि येईल पुढारां ॥५३॥ ऐसा विचार करुनी ॥ म्हणे ऐके शुभाननी ॥ पूर्वंडा मम देहालागुनी ॥ जगामाजी मिरवितसे ॥५४॥ येरी म्हणे पूर्वडराया ॥ अर्थकामना कोण हदया ॥ असेल तैसी वदूनियां ॥ सुखालागी हेलावें ॥५५॥ येरु म्हणे वो शुभाननी ॥ विषयघनाची बोलती कडसणी ॥ परी कांहीं कामना नसे मनीं ॥ अज्ञान असे या अर्थी ॥५६॥ एक वेळ उदरापुरती ॥ समया देई कां आहुती ॥ याविरहित अर्थ चित्तीं ॥ इच्छा नसे कांहीच ॥५७॥ येरी ऐकोनि ऐसें वचन ॥ अवश्य करी प्रेमें भाषण ॥ म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण ॥ अर्थ पुरेल हा तुमचा ॥५८॥ परी एक आहे मम बोलणें ॥ स्त्रीराज्यांत आपण जाणें ॥ तेथें पुरुषाचें आगमन ॥ नाहीं त्या देशांत ॥५९॥ येरु म्हणे कवण अर्थी ॥ आगमन नसे तया देशाप्रती ॥ येरी म्हणे मरुतसुती ॥ भुभुःकारें स्त्रिया होती ॥६०॥ उर्ध्वरेती वायुनंदन ॥ रेत पडे भुभुःकारवचनें ॥ गरोदर होती तेणेंकरुन ॥ सकळ स्त्रिया त्या देशीं ॥६१॥ त्याची भुभुःकारें करुन ॥ पुरुषगर्भात होय पतन ॥ तेणेंकरुन तयांची मरण ॥ होतसे जाण महाराजा ॥६२॥ तरी तुझें जाणें उदेलें चित्तीं ॥ परी तूतें होईल कैसी गती ॥ या संशयाची भ्रांती ॥ मनीं घोटाळे माझिया ॥६३॥ येरु म्हणे ऐक युवती ॥ काय करील आम्हां मारुती ॥ प्रळयकाळींची मूध्नीं हरती ॥ लोळवीन महीतें ॥६४॥ अगे तीव्रतपाचा तपोजेठी ॥ जेणें सविता गिळोनि ठेविला पोटीं ॥ तेथें दीपाची हळहळ मोठी ॥ मानील काय तो पुरुष ॥६५॥ सकळ मही जो माथां वाहे ॥ त्यातें पर्वताचें भय काय ॥ अब्धी गिळितां शरण रिघावें ॥ काय वेगें थिल्लारा ॥६६॥ तरी आतां शुभाननी ॥ हा संशय तूं न आणीं मनीं ॥ ऐसें गोरक्ष तीतें बोलोनी ॥ ते स्थानाहोनि उठला ॥६७॥ मग ती कलिंगा बैसवूनि रथीं ॥ आपण झाले पुढें सारथी ॥ दोन्ही बाग्दोरे धरुनि हातीं ॥ धुरा वेष्टूनियां बैसलासे ॥६८॥ परी प्रथमारंभीं तो धूर्जटी ॥ करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ वज्रास्त्र मंत्रहोटी ॥ अपारशक्ती जल्पला ॥६९॥ तया मागें स्पर्शमंत्रा ॥ जल्पोनियां निजवक्त्रा ॥ तेही मिरवे सबळ अस्त्रा ॥ महीलागीं महाराजा ॥७०॥ यावरी तिसरें मोहनास्त्र ॥ विराजलें अति पवित्र ॥ उपरी चवथें नागास्त्र ॥ सीमेवरी तें प्रेरिलें ॥७१॥ ऐसे चतुर्थास्त्र प्रेरुन ॥ चालता झाला गोरक्ष त्वरेनें ॥ सीमा उल्लंघूनि एक योजन ॥ स्त्रीदेशांत मिसळला ॥७२॥ चिनापट्टण उत्तम ग्राम ॥ तेथें झालासे मुक्काम ॥ तंव लोटूनि गेला अवघा दिन ॥ महीं निशा दाटली ॥७३॥ परी दिनासमान रात्री ॥ चंद्रतेजें मिरवली होती ॥ सकळी भोजनें सारुनि निगुतीं ॥ पहुडलीं शयनीं आपुल्याला ॥७४॥ निशा लोटली एक प्रहर ॥ तों रात्री निवळली महीवर ॥ सकळ लोपूनि अंधकार ॥ दिशा उजेडें उजळली ॥७५॥ ते दिनींची म्हणूं नये रात्री ॥ कीं उदया आली माया भगवती ॥ चंद्रपोत घेऊनि हाती ॥ सहजमती क्रीडतसे ॥७६॥ कीं ते रात्र नव्हे जडितपदक ॥ हेमतगटी अवनी देख ॥ त्यावरी नक्षत्रें अन्य माणिक ॥ मध्यें हिराबिंदु शोभे जैसा ॥७७॥ कीं ते रात्र नव्हे भद्रकाळी ॥ शृंगारनक्षत्रें मुक्तमाळी ॥ चंद्रबिजवरा लेवूनि माळीं ॥ महीलागीं क्रीडातसे ॥७८॥ ऐसियेपरी सुलक्षण राती ॥ उजेड दावी महीवरती ॥ तो येरीकडे गमन मारुती ॥ सेतूहूनि करीतसे ॥७९॥ मार्गी जातां सहजस्थितीं ॥ येवोनि पोंचला सीमेवरती ॥ तों वज्रास्त्र हदयाप्रती ॥ येवोनियां आदळलें ॥८०॥ परी वज्रशरीरी मारुती ॥ वज्रप्रहारें पडला क्षितीं ॥ मूर्च्छा दाटोनि हदयाप्रती ॥ विगतगति पडलासे ॥८१॥ यावरी स्पर्श करी झगटीं ॥ लिप्त केला महीपाठीं ॥ त्यावरी मोहनास्त्र हदयपुटीं ॥ जाऊनियां संचरलें ॥८२॥ त्यावरी नागास्त्रनागपती ॥ सहस्त्रफणी प्रत्यक्षमूर्ती ॥ उदय पावतां पदहस्तीं ॥ गुंडाळूनिया बैसला ॥८३॥ चतुर्थास्त्राचें पडतां वेष्टन ॥ मग कासावीस होतसे वायुनंदन ॥ अति तळमळे उडायाकारण ॥ परी तेजास्त्र उठों नेदी ॥८४॥ घडोघडी मूर्च्छा येतां ॥ नेत्र भोवंडी वांती देतां ॥ त्यावरी विखार वेष्टितां ॥ तेणें होत कासाविसी ॥८५॥ मोहनास्त्राचा अति प्रसर ॥ मोहूनि घेतलें सकळ शरीर ॥ मी कोण कोणत्या कार्यावर ॥ आलों हेंही कळेना ॥८६॥ ऐसा निचेष्टित महीवरती ॥ पडला असे मारुती ॥ एक प्रहर लोटल्यावरती ॥ प्राण निघूं पाहतसे ॥८७॥ नेत्र झाले श्वेतवर्णी ॥ मुखीं लोटलें आरक्त पाणी ॥ तें लोटलें सकळ अवनीं ॥ भिजूनि लोट लोटतसे ॥८८॥ ऐसा समय तया होतां ॥ मग विचार करी आपुल्या चित्ता ॥ ऐसिया संकटीं प्राण आतां ॥ वांचत नाहीं सहसाही ॥८९॥ तरी माझा काळ आला ॥ आतां स्मरावें श्रीरामाला ॥ ऐसा विचार करुनि स्वचित्ताला ॥ आठविलें श्रीरामातें ॥९०॥ हे दयार्णव कुळभूषणा ॥ सीतापते रघुनंदना ॥ दशग्रीवांतका भक्तदुःखमोचना ॥ धांव पाव वेगेंसी ॥९१॥ हे करुणानिधे ताटिकांतका ॥ मुनिमनोरंजना रघुकुळटिळका ॥ अयोध्याधीशा प्रतापार्का ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९२॥ हे शिवमानसरंजना ॥ चापधारका तापहरणा ॥ शरयूतीरविहारा आनंदसदना ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९३॥ हे श्रीराम श्यामतनुधारका ॥ एकवचनीं व्रतदायका ॥ एकपत्नीबाणनायका ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९४॥ हे पंकजनेत्रा कोमलगात्रा ॥ बिभीषणाप्रिया कोमलपात्रा ॥ परमप्रिय कपिकुळगोत्रा ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९५॥ हे किष्किंधाधिपवालिनिर्दलना ॥ भक्तप्रियकरा भयमोंचना ॥ विदेहजामाता जगपाळणा ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९६॥ हे विश्वामित्रमखसिद्धिकारका ॥ खरदूषणादिदैत्यांतका ॥ जलधिजलपाषाणतारका ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९७॥ हे अहिमहि दानवहारिता ॥ शतमुखखंडी वैदेहीरता ॥ मंगळधारणा कुशळवंता ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९८॥ हे अर्णवविहारा मारीचदमना ॥ जटायुप्रिया मोक्षगहना ॥ शिवचापभंगा मंगळधामा ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९९॥ हे दयार्णव राम करुणाकरु ॥ मित्रकुळध्वज कीर्तिधारु ॥ ऐसें असूनि संकटपारु ॥ सुखशयनीं निजला अससी ॥१००॥
तरी आतां धांव वेगीं ॥ तव दूत या संकटप्रसंगीं ॥ मुक्त होऊं दे महीलागी ॥ शरणागत तूं म्हणावितोसी ॥१॥ ऐशी स्तुती वागुत्तर ॥ करीत अति वायुकुमर ॥ ते वाग्बाण श्रवणद्वार ॥ रिघते झाले रामाचें ॥२॥ जाणूनि परम संकटमात ॥ धांवोनि आला श्रीरघुनाथ ॥ मारुतीचें संकट पाहूनि अत्यंत ॥ परम चित्तीं कळवळला ॥३॥ कीं एकांत पाडसावांचूनि हरिणी ॥ हिंडे सैरावैरा रानीं ॥ तन्न्यायें मोक्षदानी ॥ हदयामाजी कळवळला ॥४॥ जैसी वत्सालागी गाय ॥ काननीं हंबरडा ॥ फोडी मोहें ॥ त्याचिप्रमाणे रघुराय ॥ हदयामाजी कळवळला ॥५॥ जळवेगळा पडतां मीन ॥ अति तळमळोनि सोडी प्राण ॥ तन्न्यायें रघुनंदन ॥ हदयामाजी कळवळला ॥६॥ किंवा बाळ मातेचें चुकार होतां ॥ आरंबळती तीं उभयतां ॥ तन्न्यायें भक्त निःशक्त होतां ॥ हदयामाजी कळवळला ॥७॥ मग मनोवेगातें मागें सारुन ॥ प्रत्यक्ष आला लगबगें ॥ धांवून ॥ तों विकळ होऊनि भक्तजन ॥ अहा अहा म्हणतसे ॥८॥ मग तापनिवारण चाप करीं ॥ शर संजून बाप कैवारी ॥ पाकशासनास्त्र अवधारी ॥ वज्रास्त्र निवटावया ॥९॥ प्रेरितांचि वातास्त्र ॥ प्रगट झाला सहस्त्रनेत्र ॥ वज्रास्त्र कवळूनि पवित्र ॥ जाता झाला अमरपुरीं ॥११०॥ यावरी विभक्तास्त्र जल्पून ॥ स्पर्शास्त्र केलें निवारण ॥ यावरी फणी सहस्त्रनयन्ज ॥ हस्तपदीं गुंडाळला ॥११॥ तयासाठीं क्षीराब्धिवासी ॥ लक्ष्मीनारायण वेगेंसीं ॥ तैं प्रत्यक्षस्वरुपें उरगेंसीं ॥ पाहता वैनतेय झालासे ॥१२॥ नमूनि म्हणे अहा अनंता ॥ तूं प्रिय असती माझे चित्ता ॥ याचि नीतीं वायुसुता ॥ संबोखीत आहेसी ॥१३॥ तरी आतां मम सखय ॥ मुक्त करीं अंजनीहदया ॥ ऐसें ऐकूनि आराधिया ॥ मोहाब्धि उचंबळला ॥१४॥ मग स्वदेहपुच्छ काढून ॥ मुक्त केले हस्तचरण ॥ काढूनि घेतलें अस्त्रमोहन ॥ प्रत्यक्ष विष्णु होऊनियां ॥१५॥ असो नागस्त्रीं उरगपती ॥ प्रेमें नमूनि अब्धिजापती ॥ जाता झाला स्वस्थानाप्रती ॥ मही धारण करावया ॥१६॥ येरीकडे अंजनीनंदन ॥ सावध होऊनि बैसला जाण ॥ हदयी आठवूनि रामगुण ॥ स्वस्थ झाला तेघवां ॥१७॥ दृष्टीं करितां चहूंकडे ॥ तों रामस्वामी देखिला पुढें ॥ आनंदोनी मग प्रेमें उडे ॥ चरणकमळ नमावया ॥१८॥ वंदूनि श्रीरामाचे चरण ॥ म्हणे महाराजा वांचविला प्राण ॥ वेधलें अस्त्र अति दुर्गम ॥ देखिलें नाहीं कधीं हो ॥१९॥ अस्त्र नव्हे हें परम काळ ॥ महाप्रळयींचें उतरलें सबळ ॥ आजि माझा अंतकाळ ॥ ओढावला होता महाराजा ॥१२०॥ परी तूं माझी माय सघन ॥ लगबगीनें आलीस धांवून ॥ म्हणूनि वांचला माझा प्राण ॥ प्रळयास्त्रामाझारीं ॥२१॥ तरी तुझिया उपकारा ॥ उत्तीर्णता न होय मज पामरा ॥ ऐसें वदोनि वागूत्तरा ॥ चरणांवरी लोळतसे ॥२२॥ अति कनवाळू सीतापती ॥ सप्रेम हदयीं धरिला मारुती ॥ म्हणें तुजसाठीं बा या क्षिती ॥ तीन वेळां आलों मी ॥२३॥ तेव्हां चतुर्थ अस्त्रबंधन ॥ मुक्त झालें तुजकारण ॥ परी असो तव शत्रु कोण ॥ वेगें वद मम वत्सा ॥२४॥ येरु म्हणे महाराजा ॥ अकल्पित लाभ संकट चोजा ॥ शत्रु येथें कवण माझा ॥ प्राप्त झाला असे कीं ॥२५॥ तरी आतां प्रस्तुतकाळीं ॥ क्षत्रिय नसे कोणी बळी ॥ परी नाथपंथी अस्त्रफळी ॥ मिरवीतसे महाराजा ॥२६॥ तरी महाराजा नवांतील एक ॥ आला असेल प्रतापदायक ॥ तयाचा प्रताप जो अर्क ॥ असे अजिंक्य सर्वांसी ॥२७॥ ऐसें ऐकूनि मारुतीवचन ॥ म्हणे राम नाथपंथी भक्त जाण ॥ तयांसी रळी हे वायुनंदन ॥ करुं नये सहसाही ॥२८॥ ते भक्त माझे आवडीचे असती ॥ तयांसी रळी न करी मारुती ॥ आपण आपुल्या विक्षेपवृत्ती ॥ वाढवूं नये सर्वज्ञा ॥२९॥ ऐसी नीति रघुवीर ॥ अंजनीसुता बोलोनि उत्तर ॥ हदयांत पाहे जनकजावर ॥ नाथ कोणता नवांतुनी ॥१३०॥ तों सहज दृष्टी अंतरीं करितां ॥ चित्त गुंतलें गोरखसुता ॥ मग मारुतीसी म्हणे वो प्रतापवंता ॥ गोरक्षनाथ असे हा ॥३१॥ असे जो हरिनारायण ॥ तयाचा अवतार गोरक्ष जाण ॥ या उपरी बले मारुति वचन ॥ चला जाऊं दर्शना तयाच्या ॥३२॥ या सीमेपासूनि एक योजन ॥ तेणें रचूनि हें संधान ॥ प्रतापी आहे गौरनंदन ॥ स्त्रीराज्यांत जाते झाले ॥३३॥ तया नाथाची घेतां भेटीं ॥ एक अर्थ आहे आमुचे पोटीं ॥ तो साधूनि घेईन त्यांत शेवटीं ॥ तरी कृपाजेठी चलावें ॥३४॥ राम म्हणे वो अर्थ कोण ॥ तो मातें करी निवेदन ॥ मग सकळ कथा अंजनीनंदन ॥ मच्छिंद्राची बदलासे ॥३५॥ मैनाकिनीचें तपोवचन ॥ मच्छिंद्र पाठविला म्हणोन ॥ तरी गोरक्ष आतां जाऊन ॥ येईल घेऊन मच्छिंद्रा ॥३६॥ तरी त्यासी अमृतवाणी ॥ बोलूनि गोंवावा दृढचरणीं ॥ मग तो गोरक्ष मच्छिंद्र लागूनि ॥ नेणार नाहीं कदाही ॥३७॥ ऐसा विचार सुचवी रामातें ॥ मग बोलता झाला सीतानाथ ॥ म्हणे बा तुझा पुरवावया अर्थ ॥ चाल गोरक्षा भेटावया ॥३८॥ युक्तीप्रयुक्ती बोलूनि वचन ॥ परमादरें तोषवून ॥ इतुका अर्थ घेऊं मागून ॥ तुजसाठीं कपींद्रा ॥३९॥ ऐसें वदूनि रघुनाथ ॥ मग चालते झाले उभयतां ॥ मध्यरात्रीचा समय होतां ॥ चिनापट्टम ग्रामा पोंचले ॥१४०॥ तंव त्या ग्रामीं सुखशयनीं ॥ पहुडले होते सुखपणीं ॥ स्वस्वरुपीं अंतःकरणीं ॥ हेलावतसे ब्रह्मांड ॥४१॥ येरीकडे रघुनाथ ॥ आणिक द्वितीय अंजनीसुत ॥ ग्रामानिकट येता त्वरित ॥ स्वरुपातें पालटती ॥४२॥ शुद्ध करुनि याचकपण ॥ भावें आले उत्तम ब्राह्मण ॥ नमन करिता गौरनंदन ॥ तया ठायीं पालटले ॥४३॥ तंव तो साधक गोरक्षनाथ ॥ बैसला होता निवांत ॥ बाचे अंशघन सदगुरुनाथ ॥ प्रेमच्छंदें डुल्लतसे ॥४४॥ जैसा जळामाजी मीन ॥ तळपत आहे स्वच्छंदें करुन ॥ तन्न्यायें गोरक्षनंदन ॥ श्रीगुरुभजनीं डोलतसे ॥४५॥ तों येरीकडे उभयतां ॥ प्रत्यक्ष जाऊनि तेथ ॥ आदेश म्हणूनि वंदिला नाथ ॥ निकट जाऊनि बैसले ॥४६॥ बोलती बैसतांचि वचन ॥ आम्ही षड्रशास्त्री ब्राह्मण ॥ तुम्ही नाथ परिपूर्ण ॥ महीवरी असतां ॥४७॥ योगियांमाजी शिरोमणी ॥ जितेंद्रिय सदा दमनी ॥ विरक्तांत पूर्णपणीं ॥ मिरविसी महाराजा ॥४८॥ धैर्याब्धीचें बुद्धिजळ ॥ मिरविसी विवेकपात्रीं सबळ ॥ परघात तो वडवानळ ॥ शांतोदरीं सांठविसी ॥४९॥ मित्रशत्रुद्वितीयतटी ॥ सदैवकृपासरितेचा पूर लोटी ॥ क्षेमालिंगनअर्थीं भेटी ॥ वर्तविसी महाराजा ॥१५०॥
तरी सच्चिदानंद तेजाकारु ॥ कीं वहनादि चराचरु ॥ एक पाहणें जंगमादरु ॥ दटाविसी महाराजा ॥५१॥ तूं ऐसा औदार्यदाता ॥ अपूर्व मिरविसी धनवंता ॥ तरी महाराजा आमुच्या अर्था ॥ साधिला तो पुरवीं कां ॥५२॥ गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा ॥ कोण कामना वेधली तुम्हां ॥ तरी सरिताकार्यउगमा ॥ प्रसिद्धपणीं मिरवावें ॥५३॥ येरु म्हणती जी योगशीला ॥ वरदपात्री ओपूं बोला ॥ मग आमुची सरिता विपुला ॥ आनंद जळीं दाटेल ॥५४॥ तरी भाष देऊनि आतां ॥ तोषवीं कां आमुचे चित्ता ॥ भाष्य दिधल्यावरी अर्था ॥ दर्शवूं तूतें महाराजा ॥५५॥ ऐसी ऐकोनि तयांची वाणी ॥ तो गोरक्ष विचार करी मनीं ॥ कीं इतुका गौप्य मेदिनीं ॥ कोण आहे मजपाशीं ॥५६॥ शिंगी सारंगी कुबडी फावडी ॥ मुद्रा शैली कंथा घोंगडी ॥ पात्र भोपळा संपदा एवढी ॥ आम्हांपाशीं विराजे ॥५७॥ याविरहित आणिक दुसरा ॥ अर्थ न राहिली आमुच्या आश्रा ॥ परी यानें कल्पिलें काय अंतरा ॥ हें तों कांहीं कळेना ॥५८॥ यापरी आणिक विचार चित्तीं ॥ कीं अवसर लोटला मध्यरात्रीं ॥ त्यांतही स्त्रीदेशाप्रती ॥ पुरुष आला हें कैसें ॥५९॥ तरी हे मानव सहसा नसती ॥ स्वर्गसुखाचे पात्र असती ॥ शुक्र कीं वरुण गभस्ती ॥ वाचस्पति पातला ॥१६०॥ कीं मंगळ किंवा विरिंची सुंदर ॥ कीं गण किंवा गंधर्व साचार ॥ कीं यक्ष रक्ष अश्विनीकुमर ॥ कीं तपोलोकादि पातले ॥६१॥ नातरी व्हावया आगमन ॥ मानवा नसेही साधन ॥ तरी हे देवचि निश्वयवचन ॥ मानवी कृत्य नसेचि ॥६२॥ ऐसें भासूनि दृढ चित्तांत ॥ आणि विचारी हदयांत ॥ कवण कामना आहे यांतें ॥ शोध करुं याचा ॥६३॥ म्हणूनी अंतरदृष्टी अंतःकरणीं ॥ करुनि विचार शोधी मुनी ॥ परी कांहींएक अर्थ तों तरणी ॥ आश्रयातें लागेना ॥६४॥ मग म्हणे असो कैसें ॥ आपण चालिलों ज्या कार्यास ॥ तितुकें भिन्न करुनि यास ॥ मागेल तेंचि आदरुं ॥६५॥ ऐसा विचार करुनि मनीं ॥ बोलतां झाला प्रसिद्धपणीं ॥ म्हणे महाराजा भूदेवतरणी ॥ तुम्ही सहसा नोहेती ॥६६॥ काय प्राप्ती द्विजवरा ॥ चालूनि येईल येथवरा ॥ काळकृत्तांत सीमेवरा ॥ चतुर्थ अस्त्र विराजती ॥६७॥ प्रतापार्क वायुकुमर ॥ ते रश्मी तसे भुभुःकार ॥ त्यावरी प्रेरिला वैश्वानर ॥ चतुर्थास्त्र प्रतापी ॥६८॥ ऐशिया संकटीं भूदेवराया ॥ कोण रेवाण येईल उपाया ॥ शिवहलातें प्राशिलिया ॥ वाचेल ऐसें वाटेना ॥६९॥ कीं दहन आकाशीं कवळितां ॥ तेथें पतंग मिरवी आपुली वीर्यता ॥ कीं मशक मेरुतें वाहूनि तोली वरता ॥ जात थिल्लरीं बुडवावया ॥१७०॥ तेवीं येथें यावया कारण ॥ कदा न पावे मनुष्या गमन ॥ तरी महाराजा प्रज्ञावान ॥ कोण तुम्ही तें सांगा ॥७१॥ ऐसें बोलूनि माथा चरणीं ॥ ठेविता झाला सलीलपणीं ॥ मग एकमेकांतें विलोकुनी ॥ हास्यवदन करिताती ॥७२॥ याउपरी बोले रघुनंदन ॥ आतां यातें ठेवणें भिन्न ॥ हें योग्य मातें न ये दिसून ॥ स्वपंकजा दावावया ॥७३॥ ऐसें वदतां रघुपती ॥ मान तुकावी प्राज्ञमूर्ती ॥ मग प्रकट करुनि स्वरुपप्राप्ती ॥ नाथ हदयीं कवळिला ॥७४॥ म्हणे वत्सा ऐक वचन ॥ कामें वेधला वायुनंदन ॥ कीं मच्छिंद्रयतीलागून ॥ नेऊं नये स्वदेशीं ॥७५॥ मैनाकिनी नृपदारा ॥ परम आचरली तपाचारा ॥ वचनीं गोंवूनि वायुकुमरा ॥ नाथ मच्छिंद्रातें मागीतलें ॥७६॥ तरी यशाची उभवूनि कोटी ॥ प्रेरिला आहे मच्छिंद्रजेठी ॥ तरी हा अर्थ मारुतीचे पोटीं ॥ पूर्णपणीं मिरवला ॥७७॥ याविरहित मागणें तुजसी ॥ कांही नाहीं तपोराशी ॥ तरी तूं जाऊनि तया भेटीसी ॥ श्रीनाथासी नेऊं नको ॥७८॥ ऐसें ऐकूनि लाघवी वचन ॥ बोलता झाला गौरीनंदन ॥ हे महाराजा प्रज्ञावान ॥ सत्य वचन बोलतसां ॥७९॥ परी पहा जी प्रज्ञावानराशी ॥ आम्ही म्हणवितों योगाभ्यासी ॥ तरी हें अनुचित कर्म आम्हांसी ॥ प्रपंच करु साजिरा ॥१८०॥ तरी इतुकें काम करुनि भिन्न ॥ मागाल तरी देईन प्राण ॥ परी या देशीं मच्छिंद्र जाण ॥ ठेवणार नाहीं सहसाही ॥८१॥ भूवरी आकाश अवघें पडो ॥ मेरुमांदार उलथोनि पडो ॥ कीं अवघी मही रसातळीं बुडो ॥ परी मी न ठेवीं गुरुवर्या ॥८२॥ यावरी बोले रघुनंदन ॥ इतुकें आमुचें करीं मान्य ॥ गोरक्ष म्हणे पितरांकारण ॥ घडूनि आल्या घडेना ॥८३॥ तरी शांतिमांदार रघुनंदन ॥ हस्तकीं धरिला वायुनंदन ॥ म्हणे बा सकळ प्रताप गुणसंपन्न ॥ करशील कंदन निश्चयें ॥८४॥ ऐसें बोलतां गौरनंदन ॥ मारुतीसी क्रोध आला दारुण ॥ रामासी म्हणे करीन कंदन ॥ शब्दभ्रष्ट आतांचि ॥८५॥ परी इतुका अनर्थ कासयासाठीं ॥ लघुकार्यातें आटाआटी ॥ तुज या वचनाची वागवटी ॥ फिटूनि गेली महाराजा ॥८६॥ आतां प्रारब्धयोग कैसा ॥ घडूनि येई तयाच्या लेशा ॥ परी त्या आपुल्या भाषा ॥ सत्य करुनि शेवटविलें ॥८७॥ ऐशा युक्तीप्रयुक्तीकरुन ॥ शांत केला वायुनंदन ॥ मग गोरक्षा हदयीं धरुन ॥ रघुनंदन चालिला ॥८८॥ गोरक्षें चरणीं घालूनि मिठी ॥ म्हणे महाराजा अस्त्रें चावटी ॥ तूतें केली असे पोटीं ॥ क्षेमाब्धींत सांठविला ॥८९॥ ऐसें विनवूनि वाणी रसाळ ॥ बोळविला प्रतापशीळ ॥ अस्त्रा दशरथबाळ ॥ स्वस्थानासी पातला ॥१९०॥ याउपरी पुढिले अध्यायीं कथन ॥ शृंगमुगुट पाहील वायुनंदन ॥ मैनाकिनी राज्यभाषण ॥ गुरुसूचना करील तो ॥९१॥ ती कथा परम सुधारस सुंदर ॥ श्रोत्यांसी सांगेल धुंडीकुमर ॥ नरहरिवंशी संतकिंकर ॥ मालूवरी विराजला ॥९२॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकोनविंशोध्याय गोड हा ॥१९३॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार एकोनविंशोध्याय समाप्त ॥
Download Navnath Bhaktisar Adhyay 19 PDF: