Navnath Bhaktisar Adhyay 17

By Rahul | Last updated on February 1, 2021

Navnath Bhaktisar Adhyay 17 is the seventeenth chapter of the book. Reading this gives Yoga Siddhi to the reader.

Navnath Bhaktisar Adhyay 17:

श्रीगणेशाय ॥ नमः जयजयाजी वैकुंठाधीशा ॥ अलक्ष अगोचरा आदिपुरुषा ॥ पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा ॥ सनातना आदिमूर्ते ॥१॥ ऐसा स्वामी पंढरीअधीश ॥ बैसूनि मालूचे कवित्वपृष्ठीस ॥ भक्तिसारसुधारस ॥ निर्माण केला ग्रंथासी ॥२॥ तरी मागिले अध्यायीं कथन ॥ आनिफा पातला हेळापट्टण ॥ गोपीचंदाची भेटी घेऊन ॥ मैनावतीसी भेटला ॥३॥ तरी सिंहावलोकनीं तत्त्वतां ॥ मैनावती भेटूनि नाथा ॥ सकळ वृत्तांत सांगूनि सुता ॥ समाधानीं मिरविलें ॥४॥ असो गोपीचंद दुसरे दिनीं ॥ नाथाग्रहें शिबिरीं जाऊनि ॥ मौळी ठेवूनि नाथाचे चरणीं ॥ उभा राहिला सन्मुख ॥५॥ कानिफा पाहूनि राव दृष्टीं ॥ बोलता झाला स्ववाग्वटी ॥ श्रीजालिंदर महीपोटी ॥ कोठे घातला तो सांग पां ॥६॥ येरु म्हणे महाराजा ॥ ठाव दावितो चला ओजा ॥ तेव्हां म्हणे शिष्य माझा ॥ घेऊनि जावें सांगाती ॥७॥ ऐसी कानिफा बोलतां मात ॥ अवश्य म्हणे नृपनाथ ॥ मग सच्छिष्य घेऊनि सांगात ॥ तया ठायीं पातला ॥८॥ ठाव दाखवूनि सच्छिष्यासी ॥ पुन्हां आले शिबिरासी ॥ शिष्य म्हणती त्या ठायासी ॥ पाहूनि आलों महाराजा ॥९॥ मग रायासी म्हणे कानिफानाथ ॥ जालिंदर काढाया कोणती रीत ॥ येरु म्हणे तुम्ही समर्थ ॥ सकळ जाणते सर्वस्वीं ॥१०॥ बाळें आग्रहें करुं जाती ॥ परी तयांचा निर्णय कैशा रीतीं ॥ करावा हें तों नेणती निश्वतीं ॥ सर्व संगोपी माता ती ॥११॥ तेवीं माता पिता गुरु ॥ त्राता मारिता सर्वपारु ॥ तरी कैसे रीती हा विचारु ॥ आव्हानिजे महाराजा ॥१२॥ ऐसें बोलतां नृपनाथ ॥ मग बोलतां झाला गजकर्णसुत ॥ तुझे रक्षावया जीवित ॥ विचार माझा ऐकिजे ॥१३॥ कनक रौप्य ताम्रवर्ण ॥ पितळ लोहधातु पूर्ण ॥ पांच पुतळे करुनि आण ॥ तुजसमान हे राया ॥१४॥ ऐसी आज्ञा करितांचि नाथ ॥ प्रेरिले रायें ग्रामांत दूत ॥ हेमकार लोहकारासहित ॥ ताम्रकारका आणिलें ॥१५॥ जे परम कुशल अति निगुती ॥ लक्षूनि सोडिले हेराप्रती ॥ धातु ओपूनि तयांचे हातीं ॥ पुतळ्यांतें योजिलें ॥१६॥ मग ते आपुले धीकोटी ॥ पुतळे रचिती मेणावरती ॥ नाथालागीं दावूनि दृष्टी ॥ रसयंत्रीं ओतिले ॥१७॥ पाहोनि दिन अति सुदिन ॥ मग नृपासह पुतळे घेवोन ॥ पाहता झाला गुरुस्थान ॥ विशाळबुद्धी कानिफा ॥१८॥ गरतीकांठीं आपण बैसोन ॥ पुतळा ठेवोनि हेमवर्ण ॥ राजाहातीं कुदळ देवोन ॥ घाव घालीं म्हणतसे ॥१९॥ घाव घालितां परी लगबगां ॥ पुसतां स्वामी नांव सांगा ॥ सांगितल्यावरी अति वेगा ॥ गरतीबाहेर निघे कीं ॥२०॥ ऐसें सांगोनि प्रथम रायातें ॥ मग कुदळी दिधली हातातें ॥ उपरी चिरंजीवप्रयोगातें ॥ भाळीं चर्चिली विभूती ॥२१॥ पुतळा ठेवोनि मध्यगरतीं ॥ मागें उभा राहिला नृपती ॥ लवकर घाव घाली क्षितीं ॥ आंतूनि पुसे महाराज ॥२२॥ कोणी येवोनि घालिती घाव ॥ वेगीं वदे कां तयाचें नांव ॥ नृप म्हणे मी राणीव ॥ गोपीचंद असें कीं ॥२३॥ रायें सांगतांचि नाम ॥ निघाला होता गरतींतून ॥ श्रीजालिंदराचें शापवचन ॥ कणकप्रतिमे झगटले ॥२४॥ तीव्रशाप वैश्वानर ॥ व्यापिलें कनकपुतळ्याचें शरीर ॥ क्षण न लागतां महीवर ॥ भस्म होवोनि पडियेलें ॥२५॥ भस्म होतां कनकप्रतिमा ॥ दुसरा ठेविला उगमा ॥ तयाही मागें नरेंद्रोत्तमा ॥ पुन्हां गरतीं स्थापिलें ॥२६॥ रौप्यवर्णी पुतळ्यामागें ॥ राव उभा केला वेगें ॥ पुन्हा विचारिलें सिद्धियोगें ॥ कोण आहेस म्हणवोनि ॥२७॥ पुन्हां सांगे नृप नांव ॥ गरतीबाहेर वेगीं धांव ॥ जालिंदरशापगौरव ॥ जळ जळ खाक होवो कीं ॥२८॥ ऐसें वदतां शापोत्तर ॥ पुतळा पेटला वैश्वानरें ॥ तोही होवोनि भस्मपर ॥ महीलागीं मिरवला ॥२९॥ मग तिसरा लोहपुतळा पूर्ण ॥ तोही झाला शापें भस्म ॥ चवथा पांचवा गति दुर्गम ॥ त्याचिपरी पावला ॥३०॥ यावरी त्या नृपनाथा ॥ श्रीकानिफा झाला सांगता ॥ मातें वदोनि नाम सर्वथा ॥ नाथाप्रती सांगावें ॥३१॥ अवश्य म्हणोनि गौडपाळ ॥ लवकरी भेदी अति सबळ ॥ तो नाद ऐकूनि तपी केवळ ॥ विचार करीत मानसीं ॥३२॥ माझा क्रोध वडवानळ ॥ जाळूनि टाकील ब्रह्मांड समग्र ॥ तेथें वांचला त्रिलोचनकुमर ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३३॥ कृतांताचे दाढेआंत ॥ सांपडलिया सुटोनि जात ॥ न शिवे वैश्वानर मृत्य ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३४॥ महातक्षकानें दंश करुन ॥ वांचवूं शके कोणी प्राण ॥ केंवीं वांचला नृपनंदन ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३५॥ परम संकट पाहोनी ॥ प्राण उदित घेत हिरकणी ॥ तो वांचूनि मिरवे जनीं ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३६॥ उरग खगेंद्रा हातीं लागतां ॥ परी न मरे भक्षण करितां ॥ तेवीं झालें नृपनाथा ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३७॥ कीं मूषक सांपडल्या मुखांत ॥ त्यातें कदा न ये मृत्य ॥ तेवीं वांचला हा नृपनाथ ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३८॥ सहज उभा पर्वतानिकटी ॥ कडा तुटोनि पडला माथीं ॥ त्यांत वांचला ऐसें म्हणती ॥ हेंचि आश्चर्य वाटतसे ॥३९॥ ऐसा विचार मनांत ॥ करिता झाला जालिंदरनाथ ॥ चित्तीं म्हणे त्या भगवंत ॥ साह्य झाला रक्षणीं ॥४०॥ तरी आतां असो ऐसें ॥ वांचल्या अमर करुं त्यास ॥ ऐसें विचारुनि चित्तास ॥ मनीं गांठी दृढ धरिली ॥४१॥ येरीकडे कानिफनाथ ॥ हुंकार नृपासी देत ॥ तंव उभा स्वकरीं व्यक्त ॥ लवकरी मही भेदीतसे ॥४२॥ लवकरी घाव कानीं उठतां ॥ श्रीजालिंदर होय पुसता ॥ कोण आहेस अद्यापपर्यंत ॥ घाव घालिसी महीतें ॥४३॥ ऐकतां श्रीगुरुवचन ॥ रायाआधीं गजकर्णनंदन ॥ सांगूनि आपुलें नामाभिधान ॥ गोपीचंदाचें सांगतसे ॥४४॥ म्हणे महाराजा तपोजेठी ॥ मी बाळक कानिफा महीपाठी ॥ पहावया चरण दृष्टीं ॥ बहुत भुकेले चक्षू ते ॥४५॥ म्हणवोनि गोपीचंद नृपनाथ ॥ तुम्हां काढावया उदित ॥ ऐसी ऐकोनि सच्छिष्यमात ॥ म्हणे अद्यापि नृप वांचला ॥४६॥ तरी आतां चिरंजीव ॥ असो अर्कअवघी ठेव ॥ अमरकांती सदैव भाव ॥ जगामाजी मिरवो कां ॥४७॥ ऐसें वदोनि जालिंदरनाथ ॥ निजचक्षूनें पहावया सुत ॥ बोलता झाला अति तळमळत ॥ म्हणे महीतें विदारीं ॥४८॥ ऐसी आज्ञा होतांचि तेथें ॥ मग काढिते झाले वरील लिदीतें ॥ तंव ते मृत्तिका दशवर्षात ॥ महीव्यक्त झालीसे ॥४९॥ मग कामाठी लावूनि नृपती ॥ उकरिता झाला मही ती ॥ वरील प्रहार वज्रापती ॥ जावोनियां भेदलासे ॥५०॥

मग तो नाद ऐकूनि नाथ ॥ म्हणे आतां बसा स्वस्थ ॥ मग जल्पोनि शक्रास्त्र ॥ वज्रास्त्रातें काढिलें ॥५१॥ मग नाथ आणि गजकर्णनंदन ॥ पाहते झाले उभयवदन ॥ मग चित्तीं मोहाचें अपार जीवन ॥ चक्षुद्वारें लोटलें ॥५२॥ मग गरतीबाहेर येवोनि नाथ ॥ प्रेमें आलिंगला सुत ॥ म्हणे बा प्रसंगें होतासी येथ ॥ म्हणवोनि नृपनाथ वांचला ॥५३॥ परी गरतीबाहेर येतांचि नाथ ॥ चरणीं लोटला नृपनाथ ॥ मग त्यातें कवळोनि धरीत ॥ मौळीं हात ठेवीतसे ॥५४॥ म्हणे बाळा प्रळयाग्नी ॥ त्यांत निघालासी वांचुनी ॥ आतां जोंवरी शशितरणीं ॥ तोंवरी मिरवें महीतें ॥५५॥ यावरी त्रिलोचनकामिनी ॥ मैनावती लोटली चरणीं ॥ नेत्रीं अश्रुपात आणोनी ॥ स्वामीलागी बोलतसे ॥५६॥ म्हणे महाराजा एकादश वर्षात ॥ मातें लोटली महातभरात ॥ माझा अर्क गुरुनाथ ॥ अस्ताचळीं पातलासे ॥५७॥ मित्रकुमुदिनी दीनवाणी ॥ हुरहुर पाहे जैसी तरणी ॥ कीं मम बाळकाची जननी ॥ गेली कोठें कळेना ॥५८॥ कीं मम वत्साची गाउली ॥ कोणे रानीं दूर गेली ॥ समूळ वत्साची आशा सांडिली ॥ तिकडेचि गुंतली कैसोनि ॥५९॥ कां मम चकोराचा उड्डगणपती ॥ कैसा पावला अस्तगती ॥ कीं मज चातकाचे अर्थी ॥ ओस घन पडियेला ॥६०॥ सदा वाटे हुरहुर जीवा ॥ कीं लोभ्याचा चुकला द्रव्यठेवा ॥ कीं अंधाची शक्ती काठी टेकावा ॥ कोणें हरोनि नेलीसे ॥६१॥ ऐसे एकादश संवत्सर ॥ मास गेले महाविकार ॥ ऐसें बोलोनि नेत्रीं पूर ॥ अश्रुघन वर्षतसे ॥६२॥ मग तियेसी हदयीं धरोनि नाथ ॥ स्वकरें नेत्राश्रु पुसीत ॥ तीन्ही बाळकें धरोनि यथार्थ ॥ माय हेलवे त्यामाजी ॥६३॥ गोपीचंदाचें मुख कुरवाळून ॥ बोलता झाला अग्निनंदन ॥ बा रे तुझें काय मन ॥ इच्छीतसे मज सांगा ॥६४॥ राजवैभवा भोगावें ॥ कीं आत्मीं समयोग्यते मिरवावें ॥ कोणतें तुझें मनीं भावे ॥ तैसा योग घडेल बा ॥६५॥ अश्वाश्वत शाश्वत दोन पद ॥ राज्य वैराग्य मार्गभेद ॥ तरी तुज आवडे तोचि वृंद ॥ स्वीकारीं कां बाळका ॥६६॥ म्यां तूतें केलें अमरपणीं ॥ परी तैसें नाहीं राजमांडणी ॥ अनेक आलें अभ्र दाटोनी ॥ मृगजळासमान तें ॥६७॥ बा रे संपत्ती अमरां कैसी ॥ तेही आटेल काळवेळेसीं ॥ दिसतें तितुकें वैभवासी ॥ नाशिवंत आहे बा रे ॥६८॥ बा रे पूर्वी राज्य सांडून ॥ कित्येक बैसले योग्यांत येवोन ॥ परी तो योग सोडून ॥ राज्यवैभवा नातळला ॥६९॥ पाहें गाधिसुताचे वैभव ॥ महीलागीं केवढें नांव ॥ परी तो सोडूनि सकळ वैभव ॥ योगक्रिया आचरला ॥७०॥ उत्तानपाद महीवरती ॥ काय न्यून असे संपत्ती ॥ परी सुताची कामशक्ती ॥ वेगें जनीं दाटलीसे ॥७१॥ तस्मात् अशाश्वत ओळखून ॥ बा ते झाले सनातन ॥ तरी आतां केउतें मन ॥ इच्छितें तें मज सांगें ॥७२॥ गोपीचंद विचार करी मनांत ॥ राज्यवैभवीं सामर्थ्य गळित ॥ अहा योगी जालिंदरनाथ ॥ चिरंजीव मिरवतसे ॥७३॥ आज एकादश वर्षेपर्यंत ॥ गरतगलित पचला योगीनाथ ॥ जेणें यम शरणागत ॥ पायांतळीं लोळतसे ॥७४॥ जेणें कृत्तांत निर्बळ केला ॥ तो राज्य मेळवूनि खळ ठेला ॥ हेमकर्णे अशक्त झाला ॥ परीस लोहाकारणें ॥७५॥ सुरभी त्रैलोक्यकामना ॥ पूर्ण करील क्षुधार्तवचना ॥ ती स्वपोटा रानोंराना ॥ शोधील काय तृणातें ॥७६॥ ब्रह्मांडावरी जयाची सत्ता ॥ तो कोणे अर्थी दरिद्रता ॥ भोगील मनें ॥ ऐसा पश्चात्ताप दारुण ॥ चित्तामाजी डवरला ॥७८॥ मग म्हणे गुरुमहाराज ॥ इंधनीं अग्नि होतां सज्ज ॥ तेवीं विधानचि तैसे विराजे ॥ पावका स्पर्श झालिया ॥७९॥ तरी आतां सरतें पुरतें ॥ आपुल्यासमान करा मातें ॥ आळीभृंगन्यायमतें ॥ करुनि मिरवें महीसी ॥८०॥ ऐकोनि दृढोत्तर वचन ॥ श्रीगुरु स्वकरातें उचलोन ॥ पृष्ठी थापटी वाचे वचन ॥ गाजी गाजी म्हणतसे ॥८१॥ मग वरदहस्त स्पर्शोनि मौळी ॥ सकळ देहातें कृपें न्याहाळी ॥ कर्णी ओपूनि मंत्रावळी ॥ स्वनाथ मार्गी मिरवला ॥८२॥ ऐसें होता अंग लिप्त ॥ मग दिसून आलें अशाश्वत ॥ काया माया दृश्य पदार्थ ॥ विनय चित्तीं मिरवले ॥८३॥ मग वटतरुचें दुग्ध काढून ॥ जटा वळी राजनंदन ॥ त्रिसट कौपीन परिधानून ॥ कर्णी मुद्रा परिधानी ॥८४॥ शैली कंथा परिधानूनी ॥ शिंगीनाद गाजवी भुवनीं ॥ कुबडी फावडी कवळूनि पाणी ॥ नाथपणीं मिरविला ॥८५॥ भस्मझोळी कवळूनि कक्षेंत ॥ आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ ॥ हातीं कवळूनि नाथनाथ ॥ जगामाजी मिरवला ॥८६॥ परी हा वृत्तांत सकळ गांवांत ॥ अंतःपुरादिकीं झाला श्रुत ॥ श्रुत होतांचि अपरिमित ॥ शोकसिंधू उचंबळला ॥८७॥ एकचि झाला हाहाकार ॥ रुदन करितां लोटला पूर ॥ स्त्रिया धरणीसी टाकिती शरीर ॥ मुखीं मृत्तिका घालिती ॥८८॥ मैनावतीसी शिव्या देत ॥ म्हणती हिनेचि केला सर्वस्वीं घात ॥ अहा अहा नृपनाथ ॥ महीं कोठें पहावा ॥८९॥ आठवूनि रायाचें विशाळ गुण ॥ भूमीवरी लोळती रुदन करुन ॥ मूर्छागत होऊनि प्राण ॥ सोडूं पाहती रुदनांत ॥९०॥ अहा हें राज्यवैभव ॥ कैसी आली विवशी माव ॥ अहा सुखाचा सकळ अर्णव ॥ वडवानळें प्राशिला ॥९१॥ अहा रायाचें बोलणें कैसें ॥ कधीं दुखविलें नाहीं मानस ॥ आमुचे वाटेल जें इच्छेस ॥ राव पुरवी आवडीनें ॥९२॥ एक म्हणे सांगू काय ॥ रायें वेष्टिलें चित्त मोहें ॥ म्लानवदन पाहोनि राय ॥ हदयी कवळी मोहाने ॥९३॥ म्हणे बाई मुखातें कुरवाळून ॥ परम प्रीतीनें घेत चुंबन ॥ अति स्नेहानें अर्थ पुरवून ॥ मनोरथ पुरवी माझें गे ॥९४॥ ऐसें म्हणूनि आरंबळत ॥ एकसरां शब्द करीत ॥ एक म्हणे वो बाई मात ॥ काय परी सांगूं रायाची ॥९५॥ अगे वत्सालागीं जैशी गाय ॥ क्षणिक विसंबूं कदा न पावे ॥ तेवीं क्षणक्षणां येऊनि राय ॥ वदन पाहे माझें गें ॥९६॥ एक म्हणे अर्थ पोटीं ॥ किती सांगू राजदृष्टी ॥ वांकुडा केश कबरीथाटी ॥ पडतां सावरी हस्तानें ॥९७॥ अगे कुंकुमरेषा वांकडी होत ॥ ती सांवरी नृपनाथ ॥ मायेहूनि अधिक आतिथ्य ॥ माझें करीत होता गे ॥९८॥ ऐसें म्हणूनि धरणी अंग ॥ धडाडूनि टाकिती सुभाग्य ॥ म्हणती विधात्या बरवा भांग ॥ निजभाळीं रेखिला की ॥९९॥ मस्तक धरणीवरी आपटिती ॥ धडाधडां हस्तें हदय पिटिती ॥ महीं गडबडूनि पुन्हां उठती ॥ पुन्हां सांडिती शरीरातें ॥१००॥

म्हणती राया तुजविण ॥ आतां कोण करील संगोपन ॥ आतां आमुचे सकळ प्राण ॥ परत्र देशांत जातील हो ॥१॥ ऐसे म्हणूनि आरंबळती ॥ अट्टाहासे हदय पिटिती ॥ मृत्तिका घेऊनि मुखीं घालिती ॥ केश तोडिती तटातटां ॥२॥ म्हणती अहा राया तीन वेळ ॥ शय्येहूनि उठूनि पाजिसी जळ ॥ ऐसा कनवाळू असूनि निर्मळ ॥ सोडूनि कैसा जासी रे ॥३॥ अहा राया शयनीं निजता ॥ उदर चापसी आपुल्या हाता ॥ रिक्त लागतां उठोनि तत्त्वतां ॥ भोजन घालीत होतासी ॥४॥ ऐसा कनवाळू तूं मनीं ॥ आतां कैसा जासी सोडूनि ॥ ऐसें म्हणोनि शरीर धरणीं ॥ धडाडूनि टाकिलें ॥५॥ म्हणे रायाचें स्वरुप ॥ पहातांचि पुरतसे कंदर्प ॥ तरी त्या स्वरुपाचा झाला लोप ॥ कोठें पाहूं महाराजा ॥६॥ एक म्हणे नोहे भर्ता ॥ प्रत्यक्ष होती आमुची माता ॥ कैसी सांडूनि जात आतां ॥ निढळवाणी पाडसा ॥७॥ एक म्हणे माझी हरिणी ॥ कैसी पाडसा जात सोडूनी ॥ एक म्हणे माझी कूर्मिणी ॥ कृपादृष्टी आवगतली ॥८॥ एक म्हणे मज मीनाचें जळ ॥ कैसे आटलें अब्धीचें जळ ॥ दुःखार्काची झळाळ ॥ साहवेना वो माये ॥९॥ एक म्हणे माउली माझी ॥ स्नेहाचा पान्हा पाजी ॥ वियोगकाननीं चुकर आजी ॥ कैसी झाली दैवानें ॥११०॥ एक म्हणे आमुची पक्षिणी ॥ अंडजासमान पाळिलें धरणी ॥ आतां चंचुस्नेहें करोनी ॥ कोण ओपील ग्रासातें ॥११॥ एक म्हणे मज चातकाकारण ॥ भरतां नोहे गे अंबुदस्थान ॥ परम स्नेहाचें पाजितां जीवन ॥ आजि ओस कैसा झाला गे ॥१२॥ ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ एकमेकींचे गळां पडती ॥ रडती पडती पुन्हां उठती ॥ आरंबळती आक्रोशें ॥१३॥ ऐसा आकांत अंतःपुरांत ॥ येरीकडे जालिंदरनाथ ॥ राया गोपीचंदा सांगत ॥ तपालागीं जाई कां ॥१४॥ परी राया ऐक मात ॥ सुरत्नपणाचा पाहों हेत ॥ तुझ्या स्त्रिया अठरा शत ॥ भिक्षा मागे तयांपासी ॥१५॥ आलक्ष आदेश निरंजन ॥ ऐसा सवाल मुखें वदोन ॥ अंतःपुरांत संचार करोन ॥ भिक्षा मागें बाळका तूं ॥१६॥ शिंगीनाद वाजवूनि हातीं ॥ भिक्षा दे माई ॥ वदोनि उक्ती ॥ ऐशापरी भेटोनि युवती ॥ तपालागीं जाई कां ॥१७॥ मग अवश्य म्हणोनि नृपनाथ ॥ संचार करी अंतःपुरांत ॥ अलक्ष निरंजन मुखे वदत ॥ माई भिक्षा दे म्हणतसे ॥१८॥ तें पाहूनि त्या युवती ॥ महाशोकाब्धींत उडी घालिती ॥ एकचि कोल्हाळ झाला क्षितीं ॥ नाद ब्रह्मांडीं आदळतसे ॥१९॥ एक हातें तोडिती केशांतें ॥ एक मृत्तिका घालिती मुखांत ॥ एक म्हणे दाही दिशा ओस दिसत ॥ दाही विभाग झाल्यानें ॥१२०॥ एक धुळींत लोळती ॥ एक उठूनि पुन्हां पडती ॥ एक हदय पिटोनि हस्तीं ॥ आदळिती मस्तकें ॥२१॥ एक पाहोनि रायाचें स्वरुप ॥ म्हणती अहाहा कैसा भूप ॥ सवितारुपी झाला दीप खद्योतपणी दिसतसे ॥२२॥ अहाहा राव वैभवार्णव ॥ कैसा दिसतो दीनभाव ॥ कीं मेरुमांदार सोडूनि सर्व ॥ मशक दृष्टीं ठसावला ॥२३॥ अहा राय हस्तेंकरुन ॥ अपार याचकां वांटी धन ॥ आतां कक्षेंत झोळी घालून ॥ मागे कण घरोघरीं ॥२४॥ ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ धरणीवरी अंग टाकिती ॥ पुन्हां उठोनि अवलोकिती ॥ म्हणती अहा काय झालें ॥२५॥ असो नृप तो अंतःपुरांगणीं ॥ आदेश निरंजन वदे वाणी ॥ मुख्य नायिका लोमावती राणी ॥ रायापासीं पातली ॥२६॥ मुखचंद्र गळे बोलूनी ॥ नयनी अश्रु अपार जीवनीं ॥ रायालागीं पाळा घालूनी ॥ वेष्टुनियां बोलती त्या ॥२७॥ तिचे मागें चंपिका कारंती ॥ उठोनि येतात मागें समस्तीं ॥ राजस्त्रिया अट्टहास करिती ॥ धांव घेती मागें लगबगां ॥२८॥ म्हणती राया असो कैसे ॥ घडूनि आले ईश्वरसत्तेसें ॥ परी येथेंचि राहूनी पूर्ण योगास ॥ संपादिजे महाराजा ॥२९॥ आम्हां दरिद्रियांचें स्वरुपमांदुस ॥ लोपवूं नका सहसा महीस ॥ आम्ही तुम्हांविण दिसतों ओस ॥ प्राणाविण शरीर जैसे ॥१३०॥ हे राया आम्ही स्त्रिया कोटी ॥ परम अंध महींपाठीं ॥ तरी आमुची सबळ काठी ॥ टेंका हरूं नका जी ॥३१॥ तरी येथोंचि योग आचरावा ॥ आम्ही न छळूं विषयभावा ॥ परी तव स्वरुपाचचि ठेवा ॥ पाहूनि तो शांत करुं कीं ॥३२॥ जैसें जीर्ण कडतर ॥ परी म्हणाया वैभवी थोर छत्र ॥ तेवीं तव आश्रयीं सर्व पवित्र ॥ वैभवमंडण आम्हांसी ॥३३॥ तरी मानेल तेथें पर्णकुटिका ॥ बांधूनि देऊं जडितहाटका ॥ आम्ही बारा सोळा शत बायका ॥ सेवा करुं आदरानें ॥३४॥ सुवर्णे शिंगीं देऊं मढवून ॥ आणि रत्नबिकी शैल्य परिधानून ॥ कनकचिरी कंथा घालून ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३५॥ मुक्तरत्नें हिरे माणिक ॥ संगीत करुनि हाटकीं देख ॥ त्यातें भूषणमुद्रा अलौलिक ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३६॥ लोड तिवासे मंचक सुगम ॥ गादी तोषक अति गुल्म ॥ तरी भस्म सन्निधीकरुन ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३७॥ भिक्षातुकडे सूक्ष्म कठिण ॥ त्यजूनि सेवीं षड्रसान्न ॥ घृत दुग्ध दधि सेवीं पक्कान्न ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥३८॥ एकट सेवीं त्यजीं कानन ॥ दासदासी सेवकजन ॥ सेवा करितां षोडशोपचारान ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥३९॥ चुवा चंदन अर्गजासुवास ॥ मार्जन करुं तव देहास ॥ तरी धिक्कारुनि तृणासनास ॥ सुखसंपन्न भोगावें ॥१४०॥ हत्ती घोडे शिबिका सदन ॥ टाकूनि कराल तीर्थाटण ॥ परी चालाल तें दुःख त्यजून ॥ सुखसंपन्न भोगावें ॥४१॥ महाल चौकट संगीत रंगीत ॥ ते सांडूनि विपिनीं पडाल दुःखित ॥ तरी तें त्यजूनि रहा येथ ॥ हे सुखसंपन्न भोगावें ॥४२॥ छत्र चामरें प्रजा अंकित ॥ त्यजूनि फिराल अरण्यांत ॥ एकटपणीं त्यजूनि रहा येथ ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४३॥ मृगाक्षा खंजीर पदमनयनी ॥ पद चुरती कोमल पाणी ॥ तरी तृणांकुरशयन त्यजूनी ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४४॥ चंद्राननी गजगामिनी ॥ बोलती संवाद रसाळ वाणी ॥ तरी यांचा त्याग करोनी ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४५॥ ऐशा स्त्रिया संवादती ॥ परी कोप चढला तयाच्या चित्तीं ॥ दूर हो लंडी म्हणोनि उक्ती ॥ धिक्कारीत तयांतें ॥४६॥ परी त्या मोहें वेष्टूनि बोलत ॥ राया एकटें पडावें अरण्यांत ॥ तुम्हांसवें बातचीत ॥ कोण करील महाराजा ॥४७॥ येरी म्हणे अरण्यपोटीं ॥ सिंगी सारंगी करील गोष्टी ॥ स्त्रिया म्हणती आसनदृष्टी ॥ वपन कैंचें हो तेथें ॥४८॥ राव म्हणे मही आसन ॥ अंबरासारखें असे ओढवण ॥ स्त्रिया म्हणती शयनीं कोण ॥ निजेल तुमच्या सांगातीं ॥४९॥ येरी म्हणे कुबडी फावडी ॥ शयन करितील दोन्ही थडी ॥ स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी ॥ कोण निवारी सांगावें ॥१५०॥

येरी म्हणे अचळ धुनी ॥ पेटवा घेईल पंचाग्नी ॥ ते सबळ शीतनिवारणीं ॥ होतील योग साधावया ॥५१॥ स्त्रिया म्हणती अलौलिक ॥ तेथें कोठें परिचारक लोक ॥ राज्यासनीं पदार्थ कवतुक ॥ देत होते आणूनियां ॥५२॥ येरी म्हणे व्याघ्रांबर ॥ आसन विराजूं वज्रापर ॥ मग धांव घेती नारीनर ॥ कौतुकपदार्थ मिरवावया ॥५३॥ स्त्रिया म्हणती मोहव्यक्त ॥ कोणतीं असतीं मायावंत ॥ माय बाप भगिनी सुत ॥ अरण्यांत कैंची हीं ॥५४॥ येरी म्हणे विश्वरुप ॥ घरघर आई घरघर बाप ॥ इष्टमित्र भगिनी गोतरुप ॥ शिष्य साधक मिरवती ॥५५॥स्त्रिया म्हणतीं षड्रसादि अन्न ॥ विपिनीं मिळतील कोठून ॥ येरी म्हणे जीं फळें सुगम ॥ षड्रसादि असती तीं ॥५६॥ स्त्रिया म्हणती वेंचाया साधन ॥ विपिनीं मिळेल जी कोठून ॥ येरी म्हणे ब्रह्मरुपानें ॥ घेऊं देऊं वेव्हारासी ॥५७॥ स्त्रिया म्हणती फाटल्या कौपीन ॥ पुनः मिळेल ती कोठून ॥ येरु म्हणे इंद्रियदमन ॥ विषयीं कांसोटी घालूं कीं ॥५८॥ स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा ॥ ते कोठूनि मिळेल जी समर्था ॥ येरु म्हणे योग आचरतां ॥ दिव्य कंथा होईल ॥५९॥ स्त्रिया म्हणती सिंगी सारंगा ॥ फुटूनि गेलिया प्रसंगी ॥ मग गोष्टी करावयाची तरंगी ॥ कोण आहे तुम्हांपाशी ॥१६०॥ येरी म्हणे सगुण निर्गुण ॥ शिंगी सारंगी असती दोन ॥ आगमानिगमाचे तंतू ओंवून ॥ सुखसंवाद करीन मी ॥६१॥स्त्रिया म्हणती कुबडी फावडी ॥ जीर्ण झालिया लागती देशोधडी ॥ मग सुखशयनीं निद्रापहुडी ॥ कोण सांगेन करील जी ॥६२॥ येरी म्हणे खेचरी भूचरी उभय ॥ आदेय विदेह प्रकाश स्वरुपमय ॥ वाम दक्षिण घेऊनि तन्मय ॥ डोळां लावीन निरंजनीं ॥६३॥ स्त्रिया म्हणती शैल्य तुटून ॥ गेल्या पुन्हां आणाल कोठून ॥ येरी म्हणे मोक्षयुक्तिसमान ॥ शैल्यभूषण मिरवीन गे ॥६४॥ स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका ॥ हरपोनि गेल्या नरपाळका ॥ मग काय करशील वनीं देखा ॥ नाथपंथी मिरवावया ॥६५॥ येरु म्हणे वो खेचरी भूचरी ॥ लुप्तमुद्रा कर्णद्वारीं ॥ अलक्ष चाचरी अगोचरी ॥ लेवविल्या गुरुनाथें ॥६६॥ ऐसें बोलतां उत्तरोत्तर ॥ म्हणे माई भिक्षा देई सत्वर ॥ तंव त्या धांवती धरावया कर ॥ कंठीं मिठी घालावया ॥६७॥ ऐसें चांचल्यगुणयुक्त ॥ दृष्टीं पाहूनियां नृपनाथ ॥ कुबडी फावडी उगारीत ॥ दूर होई लंडी म्हणतसे ॥६८॥ तें गुप्त पाहोनि मैनावती ॥ सिद्धार्थ अन्न घेऊनि हातीं ॥ शीघ्र येऊनि पुत्राप्रती ॥ म्हणे भिक्षा घे नाथा ॥६९॥ मग भिक्षा घेऊनि झोळीं ॥ मातेपदीं अर्पी मौळी ॥ मग तेथूनि निघूनि तये वेळीं ॥ नाथापाशीं पातला ॥१७०॥ मग जो झाला स्त्रियांत वेव्हार ॥ तो सकळ सांगितला वागुत्तर ॥ मैनावती येऊनि तत्पर ॥ तीही वदे वृत्तांतासी ॥७१॥ असो उभयतांचा वृत्तांत ऐकून ॥ मान तुकावी अग्निनंदन ॥ मग तीन रात्री रायासी ठेवून ॥ बहुतां अर्थी उपदेशिला ॥७२॥ मग लोमावतीचा उदरव्यक्त ॥ गोपीचंदाचा होता सुत ॥ मुक्तचंद नाम त्याचें ॥ राज्यासनीं वाहिला ॥७३॥ स्वयें जालिंदरें कौतुक ॥ राज्यपटीं केला अभिषेक ॥ मंत्री प्रजा सेवक लोक ॥ तयाहातीं ओपिलें ॥७४॥ राया गोपीचंदा सांगे वचन ॥ बा रे पाहें बद्रिकाश्रम ॥ बद्रिकेदारालागीं नमून ॥ तपालागीं तूं बैसें कां ॥७५॥ लोहकंटकीं चरणांगुष्ठ ॥ देऊनि तपाचें दावीं कष्ट ॥ द्वादश वरुषें नेम स्पष्ट ॥ एकाग्रीं रक्षावा ॥७६॥ ऐसें सांगूनि तयातें ॥ मग प्रजा लोकादि समस्तें ॥ निघाले रायासी बोळवायातें ॥ कानिफासुद्धां जालिंदर ॥७७॥ परी प्रजेचे लोक शोक करिती ॥ राया गोपीचंदाचे गुण आठविती ॥ नेत्रीं ढाळूनि अश्रुपातीं ॥ रुदन करिती अट्टहास्यें ॥७८॥ म्हणती अहा सांगों कायी ॥ नृप नव्हे होती आमुची आई ॥ वक्षाखाली सकळ मही ॥ संबोधीतसे महाराजा ॥७९॥ ऐसे वर्णूनि तयाचे गुण ॥ आक्रंदती प्रजाजन ॥ परी आतां पुरे करा विघ्न ॥ शोकमांदार खोंचला ॥१८०॥ तृणपाषाणादि तरु ॥ पक्षी पशु जाती अपारु ॥ राया नृपाकरितां समग्र ॥ शोकाकुलित मिरवले ॥८१॥ मग एक कोस बोळवून ॥ समस्त आणिले अग्निनंदनें ॥ जेथील तेथे संबोखून ॥ आश्वासीत सकळांसी ॥८२॥ परी राया जातां ठायीं ठायीं ॥ धांवूनि पाहतां उंच मही ॥ म्हणती सोडूनि गेलीस आई ॥ कधी भेटसी माघारां ॥८३॥ घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करुन ॥ पहाती रायाचें वदन ॥ कोणी मागें जाती धांवून ॥ वदन पाहूनि येताती ॥८४॥ ऐसा राजा जातां दोन कोश ॥ मग सकळ मिरवले एक निराश ॥ मग मागें उलटूनि संभारास ॥ ग्रामामाजी संचरले ॥८५॥ राजसदनीं येऊनि समस्त ॥ सकळ बैसले दीनवंत ॥ जैसें शरीर प्राणरहित ॥ एकसरां मिरवले ॥८६॥ मग श्रीजालिंदर राजसदनीं ॥ मुक्तचंदा विराजूनि राज्यासनीं ॥ मंत्रियातें पाचारुनी ॥ वस्त्रेंभूषणें आणविलीं ॥८७॥ मग जैसें महत्त्व पाहून ॥ तयालागीं भूषणें देऊन ॥ प्रेमें गौरवूनि प्रजाजन ॥ बोळविले स्वस्थाना ॥८८॥ याउपरी अंतःपुरीं जाऊन ॥ सर्व स्त्रियांचें केलें समाधान ॥ मैनावतीचे करीं ओपून ॥ समाधानीं मिरविलें ॥८९॥ मुक्तचंद ओपूनि तियेचे करीं ॥ म्हणे हा गोपीचंदचि मानीं ॥ हा शिलार्थ तयाचे परी ॥ मनोरथ पुरवील तुमचे ॥१९०॥ ऐसे करोनि समधान ॥ राज्यासनीं पुन्हां येऊनि ॥ मुक्तचंदाचे हस्तेंकरुन ॥ याचकां धन वांटिले ॥९१॥ जालिंदर कानिफा कटकासहित ॥ षण्मास राहिले पट्टणांत ॥ अर्थाअर्थी सकळ अर्थ ॥ निजदृष्टीं पाहती ॥९२॥ श्रीजालिंदराचा प्रताप सघन ॥ कोण करुं पाहती विघ्न ॥ येरीकडे गोपीचंदरत्न ॥ भगिनीग्रामा चालिला ॥९३॥ तेथें कथा होईल अपूर्व ॥ ते पुढील अध्यायीं ऐका सर्व ॥ अवधानपात्रीं घन भाव ॥ कथा स्वीकार श्रोते हो ॥९४॥ नरहरीवंशीं धुंडीसुत ॥ मालू संतांचा शरणागत ॥ तयाचे रसनेस धरुनि हेत ॥ अवधान पात्रीं मिरवावें ॥९५॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत चतुर ॥ सप्तदशाध्याय गोड हा ॥१९६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥१७॥ ओव्या ॥१९६॥ ॥ नवनाथभक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त ॥

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.