Navnath Bhaktisar Adhyay 31

By Rahul | Last updated on February 3, 2021

Navnath Bhaktisar Adhyay 31 is the thirty-first chapter of the book. Reading it saves the reader from ill effects of Shabari Mantra.

Navnath Bhaktisar Adhyay 31:

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी जगत्पाळका ॥ जगत्पते वैकुंठनायका ॥ जगत्सृजका यदुकुळटिळका ॥ भक्तसखा तूं होसी ॥१॥ निखिलजीवन निर्विकारा ॥ विवेकरत्नवैरागरा ॥ शुद्धसत्त्वगुणगंभीरा ॥ रुक्मिणीवरदा दीनबधो ॥२॥ हे कृपार्णवा पंढरीनाथा ॥ पुढें बोलवीं भक्तिसारग्रंथा ॥ मागिले अध्यायीं अनाथनाथा ॥ जन्म चौरंगीचा करविला ॥३॥ करविला परी त्याचें कथन ॥ राहिलें तें ग्रंथीं लेखन ॥ आतां करवीं जगज्जीवन ॥ पुढें वैखरी बैसूनियां ॥४॥ तरी गताध्यायीं सापत्नमाता ॥ लोटली तातें कामसरिता ॥ परी कृष्णागर प्राज्ञिक सुता ॥ बळेंचि नेलें पाचारुनी ॥५॥ करुनि जननीचा धिक्कारु ॥ सदना गेला होता कृष्णागरु ॥ येरी सखी जीवापारु ॥ पाचारिली होता कीं ॥६॥ तिये सांगूनि सकल वृत्तांत ॥ प्राणघातासी झाली होती उदित ॥ परी ती सखी प्रज्ञावंत ॥ देत मसलते तियेसी ॥७॥ म्हणे बाई वो भुजावंती ॥ ईश्वरकरणी प्रारब्धगती ॥ जैसे असेल तैसी पुढती ॥ घडून येईल भिऊं नको ॥८॥ परी तूतें सांगेन हित कांहीं ॥ तैसेचि धरुनि जीवीं ॥ नको कष्ट मानूं आपुले देहीं ॥ शयन शयनीं करी आतां ॥९॥ शयन शयनीं केलिया पूर्ण ॥ राव येईल पारधीहून ॥ आल्या सेवील तुझें सदन ॥ परी तूं उठू नको कीं ॥१०॥ मग तो राव पुसेल तूतें ॥ तंव तूं सोंग दावीं शोकाकुलतें ॥ रुदन करुनि वदें रायातें ॥ प्राणरहित होय मी ॥११॥ आतां काय ठेवूनि प्राण ॥ झाला नाहीं अबूरक्षण ॥ ऐसें बोलतां राव वचन ॥ पुढें तुजशीं पुसेल ॥१२॥ पुसतां वदे कीं प्रांजळवंत ॥ कृष्णागर तुमचा सुत ॥ कामुक होऊनि मम सदनांत ॥ स्पर्शावया धांवला ॥१३॥ धांवला परी यत्नेकरुन ॥ बळें दिधला मागें लोटून ॥ ऐसें होतां अनुचित प्राण ॥ कैसा ठेवूं महाराजा ॥१४॥ ऐशा परी आराधूनि युक्तीं ॥ क्रोंध उपजवीं रायचित्तीं ॥ क्रोधवश झालिया राय नृपती ॥ कलहें मुला सोडील कीं ॥१५॥ मग तो कदा ना म्हणे सुत ॥ त्वरें करील प्राणरहित ॥ मग तूं सदनीं आनंदभरित ॥ सुखलाभातें सेवीं कां ॥१६॥ अंगीं विपतरुचा कोंब चांग ॥ खुडूनि टाकिल्यानें मार्ग ॥ मग विषाचा शरीरीं लाग ॥ कोठूनि होईल जननीये ॥१७॥ आधीं ठेचिल्या उरगमुख ॥ मग कैंचें मिरवेल विषदुःख ॥ कंटकी धरिल्या वृश्चिक ॥ वेदनेतें मिरवेना ॥१८॥ कीं वन्हि असतां धूम्रा कार ॥ वरी सांडावे लगबगे नीर ॥ मग धांव सदनापर ॥ घेत नाहीं जननीये ॥१९॥ तरी कृष्णागराचा वसवसा ॥ तव हदयी मिरवे स्वबाळफांसा ॥ तरी राया सांगूनि ऐशिया लेशा ॥ दुःखसरिता लोटवीं ॥२०॥ तरी त्या उदकाचे आधीं वळण ॥ दुःखसरिते बांधावे बंधन ॥ बंधन बांधिल्या सजीवपणें ॥ सुखे पुढें मिरवीं कां ॥२१॥ ऐसी सांगूनि ती युवती ॥ गेली आपुल्या सदनाप्रती ॥ येरीकडे भुजावंती ॥ कनकमंचकीं पहुडली ॥२२॥ त्यजूनि अन्नोदक स्नान ॥ कैंचे श्रृंगार कुंकुमलेण ॥ सर्व उपचारांतें त्यजून ॥ विन्मुख तई पहुडली ॥२३॥ तों येरुकडे शशांगर ॥ पारधी खेळूनि काननभर ॥ चिंताब्धीची फोडूनि लहर ॥ सदना तदा जातसे ॥२४॥ नाना गजरें यंत्रस्थित ॥ चमूअब्धीचा लोट लोटीत ॥ क्षेत्रपातीं पूर्ण भरित ॥ चमृतोयें तेधवां ॥२५॥ यावरी राव तो पूर्ण ज्ञानी ॥ संचार करी आपुले सदनीं ॥ दृष्टीसमोर न देखितां राणी ॥ परिचारिके विचारीतसे ॥२६॥ म्हणे कोठे आहे भुजावंती ॥ सन्मुख कां न आली पारधीप्रती ॥ आजि चुकुर होऊनि चित्तीं ॥ निंबलोणा नातळली ते ॥२७॥ रायातें बोलती परिचारिका ॥ हे महाराजा सद्विवेका ॥ आजि राणी कवण दुःखा ॥ दुखावली कळेना ॥२८॥ तेणेंकरुनि शयनापाटी ॥ निजली आहे होऊनि कष्टी ॥ होतांचि शब्द कर्णपुटी ॥ सदनामाजी संचरला ॥२९॥ तों ती मंचकीं भुजावती ॥ राव देखूनि बोले युक्तीं ॥ म्हणे कां हो कवण अर्थी ॥ शयन केलें जिवलगे ॥३०॥ परी तई उत्तरा न देती ॥ कांहींच न बोले रायाप्रती ॥ जीवन आणूनि नेत्रपातीं ॥ अश्रु ढाळी ढळढळां ॥३१॥ तें पाहुनियां राव दयाळ ॥ चिंत्तीं दाटला मोहें केवळ ॥ मंचकीं बैसे उतावेळ ॥ हदयीं धरीं कांतेतें ॥३२॥ अश्रुधारा नेत्रपातीं ॥ राव पुसी स्वयें हस्तीं ॥ चुंबन घेऊनि लालननीतीं ॥ अंकावरी बैसवीतसे ॥३३॥ अंकीं बैसवोनि स्वदारारत्न ॥ हेम जडावया करी यत्न ॥ राव कोंदणी हाटकप्रयत्न ॥ अर्थरत्ना जोडीतसे ॥३४॥ म्हणे सुखसरिते ॥ कोठूनि भेदलें गढोळ चित्तीं ॥ दुःखघनाचा वर्षाव अमित ॥ कोणें केला तो सांग ॥३५॥ मी राव महीचा भूप ॥ मी बोलणारा दर्पसर्प ॥ ऐशा व्याघ्राचा करोनि लोप ॥ दिधलें माप दुःखाचें ॥३६॥ तरी ती कवण पुरुष नारी ॥ तूतें अन्य झाली भारी ॥ तरी मातें बोलूनि वैखरी ॥ निमित्तमात्र दावीं कां ॥३७॥ अगे सहज दिठवा होते ॥ दावीन त्यातें अर्कसुत ॥ या बोलाची सहज भ्रांत ॥ मानूं नको जिवलगे ॥३८॥ अगे प्रिय तूं मातें अससी ॥ कोण गांजील उद्देशीं ॥ हरिबाळातें जंबुकलेशी ॥ दुःखदरी मिरवेना ॥३९॥ अगे मशकाचेनि पाडा ॥ धडके उतरे गिरीचा कडा ॥ कीं रामरक्षे भूतवडा ॥ रक्षणिया बैसतसे ॥४०॥ तेवीं तूं माझी पट्टराणी ॥ कोण घालूं शके काचणी ॥ नाम दर्शवीं प्रांजळपणीं ॥ मग ऊर्वी न ठेवीं तयातें ॥४१॥ ऐसें ऐकतां राववचन ॥ हदयीं तोषली अर्थार्थी सघन ॥ म्हणे महाराजा तव नंदन ॥ भ्रष्टबुद्धी व्यापिला ॥४२॥ आपण गेलिया पारधीसी ॥ एकांत पाहूनि मम उद्देशीं ॥ येथें येऊनि स्मरलेशी ॥ हस्त माझा धरियेला ॥४३॥ धरिला परी निर्दयवंतें ॥ कामें ओढिता झाला हस्त ॥ म्हणे चालावें एकांतांत ॥ सुखसंवाद भोगावा ॥४४॥ मग म्यां पाहूनि कामिकवृत्ती ॥ हात आंसडूनि घेतला निगुतीं ॥ भयार्थ मानूनि आपुले चित्तीं ॥ सदनामाजी पावलें ॥४५॥ पळता कोणे झाली अवस्था ॥ उलथूनि पडलें महीवरती ॥ परी म्यां धरुनि तैशीच शक्ती ॥ आड कवाड पैं केलें ॥४६॥ मग तो छलबलत्वहीन ॥ होऊनि पाहे आपुलें सदन ॥ तस्मात् आतां आपुला प्राण ॥ ठेवीत नाहीं महाराजा ॥४७॥ भलतैसिया गरळांत ॥ घेऊनि करीन प्राण मुक्त ॥ परी धैर्य वरिलें तुम्हांकरितां ॥ तुमचा मुखेंदु पहावा ॥४८॥ मज वाटलें पारधीचें कानन ॥ अति तीव्र कर्कश भयाण ॥ त्यातूनि तुम्ही जीवंतपणें ॥ कैसे याल वाटलें ॥४९॥ ऐसेपरी धुसधुशीत ॥ संचार होतां हदयांत ॥ म्हणोनि महाराजा येथपर्यंत ॥ प्राण देहीं रक्षियेले ॥५०॥ आतां याचि बोलापाठीं ॥ मी चकोर देहीं चंचुपुटीं ॥ तव आननेंदूचे जीवन शेवटी ॥ लक्षूनि तुष्ट झालें असें ॥५१॥ ऐसें बोलतां भुजावंती ॥ परम क्रोधावला नृपती ॥ परी क्रोध नव्हे क्षितीं ॥ वडवानलचि पेटला ॥५२॥ वडवानल तरी कैसा ॥ शिखा मिरवी अंबरलेशा ॥ सुतरत्नालागीं कैसा ॥ ग्रासूं पाहे क्षणांत ॥५३॥ मग तैसाचि येऊनि सदनाबाह्ये ॥ आरक्त नेत्रीं भंवता पाहे ॥ म्हणे कोणी तरी येथे आहे ॥ पुढें यावें माझिया ॥५४॥ तंव ते भृत्य धांवत येती ॥ भृत्य नव्हे ते कृत्तांत दिसती ॥ राव वरुनि क्रोधरीती ॥ स्वतां त्यांतें लोटीतसे ॥५५॥ म्हणे भृत्य हो याचि पावलीं ॥ जाऊनि मम सुताची करा होळी ॥ अथवा बंधन करुनि हस्तवेली ॥ खंडोनियां टाकाव्या ॥५६॥ ऐसें बोले नृपनाथ ॥ दूत धांवती वाताकृत ॥ सदन वेढूनि राजसुत ॥ मृत्युमहीं नेलासे ॥५७॥ परी ते सेवक ज्ञानखाणी ॥ पुनः जाती राजांगणी ॥ म्हणती महाराजा मृत्युभुवनीं ॥ कृष्णागरु पैं नेला ॥५८॥ राव क्रोधें तयां पहात ॥ म्हणे हस्तपादांते करा खंडित ॥ पुनः येवोनि सांगत ॥ धांवधांवोनि रायातें ॥५९॥ तरी रायाचा कोपानळ ॥ कदा न होय शीतळ ॥ पुनः पाहोनि दूतमेळ ॥ तीच आज्ञा आज्ञापा ॥६०॥ परी ते भृत्य देहस्थितीं ॥ म्हणती हा स्वामी राजसुत ॥ यासी वधितां काय अनर्थ ॥ कैसा होईल कळेना ॥६१॥ ऐसे संदेहें भयस्थित ॥ पुनः जाती राजांगणांत ॥ परी तो राव अति संतप्त ॥ तीच आज्ञा आज्ञापी ॥६२॥ मग ते दूत निष्ठुरपणी ॥ चौरंग आणिती कनककोंदणीं ॥ तयालागी बैसवोनी ॥ कार्यावर्ती वहिवटले ॥६३॥ शुद्ध चर्हाूटें बांधोनि हस्त ॥ तदा नेत कृष्णागरातें ॥ म्हणती बंधसिद्ध केले हस्त ॥ खंडविखंड करावया ॥६४॥ परी कृष्णागर चव्हाटां नेला ॥ हा वृत्तांत सकळ ग्रामांत कळला ॥ मग चुंगारचुंगार मेळा ॥ विलोकावया धांवती ॥६५॥ येरीकडे येरीकडे राजांगणी ॥ मिळाले थोर प्राज्ञीं ॥ परी नृपतीचा क्रोधाचि पाहुनी ॥ बोलो न शकती कदाचित ॥६६॥ तरी वृत्तीचा क्रोधानळ ॥ लोकबोलाचें सुभद्रजळ ॥ प्राशनें भेणें उतावेळ ॥ धांव मागें घेतसे ॥६७॥ येरीकडे चव्हटेंशी ॥ कनकचौरंगी राजसुतासी ॥ दूर्ती बैसवोनि हस्तपादांसी ॥ योजिते झाले छेदावया ॥६८॥ शस्त्र करुनियां नग्न त्वरित ॥ एकें घायाळ केले हस्त ॥ तैसेचि झाले चरण व्यक्त ॥ भग्न होऊनि पडियेला ॥६९॥ एकचि आकांत वर्तला तेथें ॥ कोणी कोणा न विचारी जेथे ॥ पाहूनि सकळ संग्रामातें ॥ भयभीत संपूर्ण ॥७०॥ उपरी योजूनि पद निगुतीं ॥ तीक्ष्णधारा शस्त्रें हाणिती ॥ तीहीं एका घायें क्षिती पदकमलीं पडियेली ॥७१॥ मग रुधिराचा भडभडाट ॥ महीं लोटला अपार लोट ॥ जेवीं युवतिकुंकुममळवट ॥ तेवीं धारा शोभली ॥७२॥ परी राव तो कृष्णागर ॥ मूर्च्छेनें व्यापूनि तीव्र ॥ कनकासनीं चौरंगावर ॥ उलथोनियां पडियेला ॥७३॥ प्राण होऊनि कासावीस ॥ मुखावरी दाटला फेस ॥ उपरी कोरड पडली मुखास ॥ श्वेतनयन पैं केले ॥७४॥ मग तें दुःख पाहूनि लोक ॥ दुःखानें करिती महाशोक ॥ अहा कृष्णागरासारखें माणिक ॥ व्यर्थ राये भंगिले ॥७५॥ एक म्हणती म्हातारपणीं ॥ राव चळला आहे प्राज्ञी ॥ ऐसा पुत्र लावण्यखाणी ॥ नष्ट केला पदवीचा ॥७६॥ तरी राजा परम भ्रष्ट ॥ झाला आहे निर्दय नष्ट ॥ आतां येथें राहतां उत्कृष्ट ॥ योग्य काहीं दिसेना ॥७७॥ सहज प्रपंचाचे पाउलीं ॥ पडतसे आड पाउली ॥ परी रायें हदयीं क्षमा न केली ॥ घात करील कधीं तो ॥७८॥ अहा एकुलता एक बाळ ॥ त्यावरि पाखडिला क्रोधानळ ॥ मग प्रजान्याया कैसा शीतळ ॥ वृद्ध राव राहील हा ॥७९॥ एक म्हणे राजनीती ॥ तैशीच आहे सर्व क्षितीं ॥ गृहीं दाविली क्रोधसंपत्ती ॥ धाक पडेल प्रजेतें ॥८०॥ एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर ॥ कुबुद्धि धरिली मातेवर ॥ तैं शिक्षा पावला साक्षात्कार ॥ राया दोष न लागेचि ॥८१॥ गौपीडक व्याघ्रे असला ॥ तरी कां मारुं नये त्याला ॥ तरी रायानें धर्म पाळिला ॥ लोभ धरिला नाहीं की ॥८२॥ वृश्चिक होतां दृष्टिव्यक्त ॥ तरी कां करुं नये प्राणांत ॥ दुष्ट आहे कीं धुसधुसीत ॥ मारु नये कीं त्याला ॥८३॥ ऐशा नानापरी युक्तीं ॥ तर्कवितर्क जग बोलती ॥ अपार मेळा चवाठ्याप्रती ॥ मिळाला असे लोकांचा ॥८४॥ त्यांत सहजासहज गमन ॥ गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण ॥ करीत आले चव्हाटेंकारणें ॥ तो अपार मेळा देखिला ॥८५॥ सोडूनि गर्भाद्रिपर्वतातें ॥ न्यावें भेटीसी मच्छिंद्रातें ॥ घेऊनि जाता गोरक्षनाथ ॥ आले होते त्या ठायीं ॥८६॥ आले परी सहज चालीं ॥ नगरदीक्षेची कामना फिरली ॥ म्हणोनि पाहतां व्यवहारपाउली ॥ येवोनि तेथें धडकले ॥८७॥ धडकले परी अपार मेळ ॥ पाहूनि त्यांत संचरले गौरबाळ ॥ तों कृष्णागर होऊनि विकळ ॥ कनकचौरंगी पडियेला ॥८८॥ मग मच्छिंद्रातें पाचारुन ॥ दाविता झाला गौरनंदन ॥ जळचरसुतें पाहून ॥ परम चित्तीं द्रवलासे ॥८९॥ परी त्याचा अन्याय काय ॥ लोकांपाशी पुसों जाय ॥ क्षण स्थिर करुनि हदय ॥ करणी विलोकी बाळाची ॥९०॥ तों सहज अंतरीं दृष्टि करितां ॥ त्या समजली तयाची माता ॥ आणि कृष्णागरासी वरता ॥ अवतारदक्ष आढळला ॥९१॥ ऐसा शोध शोधिल्या चित्तीं ॥ मग क्रोधें दाटले तपोगभस्ती ॥ म्हणे अहो हे रांड शक्ती ॥ प्रविष्ट झाली लोकांत ॥९२॥ परी तो आहे मूर्ख राय ॥ चित्तीं योजितां न ये न्याय ॥ बाळावरी तिनें घाय ॥ कोपशस्त्रीं योजिला ॥९३॥ तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट ॥ विषयलोभी अति वरिष्ठ ॥ महीं नसावा महाभ्रष्ट ॥ महीमार आगळा ॥९४॥ लागूनि कांतेच्या बुद्धिसंगतीं ॥ बाळालागीं केली आर्ती ॥ तस्मात् राव विषयभक्ती ॥ ठेवूं नये महीसीं ॥९५॥ ऐसें चित्तीं धरुनि तेथून ॥ उभय निघाले मंडळांतून ॥ मग गोरक्षा सकळ खूण ॥ निवेदिली रायाची ॥९६॥ सकळ गोरक्षां निवेदन होता ॥ तोही आपुले हदयीं पाहतां ॥ पाहूनि म्हणे गुरुनाथा ॥ यांचे नांव रंगाते आणावें ॥९७॥ कृष्णागर तो चौरंगीं व्यक्त ॥ म्हणोनि चौरंगी बोलला नितांत ॥ कृष्णागर हें नाम महींत ॥ नाहीं म्हणोनि वदलासे ॥९८॥ आणि हस्तपादादि सकळ ॥ एका चौरंगी झाले सकळ ॥ म्हणोनि चौरंगी गौरबाळ ॥ सहजस्थितीं वदलासे ॥९९॥ असो गोरक्ष मच्छिंद्रातें ॥ म्हणे राजसदना जाऊं त्वरिते ॥ मागूनि घ्यावें चौरंगातें ॥ नाथपंथीं मिरवावया ॥१००॥ मच्छिंद्र म्हणे कर्मशासन ॥ रावराणीतें दुःख दावून ॥ मग न्यावा शिवनंदन ॥ नाथपंथीं मिरवावया ॥

१॥ गोरक्ष म्हणे हो नोहे ऐसें ॥ नऊं आधीं चौरंगास ॥ पूर्णपर्णी नाथपंथास ॥ विद्यार्णव करावा ॥२॥ मग तयाचेचि हातीं ॥ रायासी दावावी प्रतापशक्ती ॥ आणि त्या रांडे चामुंडेप्रती ॥ ओपणें तें ओपावें ॥३॥ तरी आतां सौम्य उपचार ॥ राया करुं वागुत्तर ॥ मागून घ्या स्नेहपरिवार ॥ चौरंगीतें महाराजा ॥४॥ ऐसी गोरक्ष बोलतां वाणी ॥ अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी ॥ मग उभयतां राजसदनीं ॥ प्रविष्ट जाहले महाराजा ॥५॥ पुढें धाडूनि द्वाररक्षक ॥ श्रुत करविलें नांव दोंदिक ॥ कीं मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक ॥ भेटीसी येती महाराजा ॥६॥ रायें ऐकोनि ऐसें नाम ॥ मनीं उचंबळे भावार्थ प्रेम ॥ मनांत म्हणे योगद्रुम ॥ वंद्य असती हरिहरा ॥७॥ परी मम दैवार्णवा सुफळबांध ॥ मच्छिंद्रकृपेचा वोळला मेध ॥ ऐसें म्हणूनि लागवेग ॥ कनकासन सांडिलें ॥८॥ सम्यक सामोरा होऊनि नृपति ॥ दृष्टीं देखतां मच्छिंद्रजती ॥ भाळ ठेवूनि चरणांवरती ॥ आलिंगीतसे प्रेमानें ॥९॥ म्हणे महाराजा अज्ञानभंगा ॥ अज्ञानपतिता बोधली गंगा ॥ वळूनि धीर पावल्या संगा ॥ कुशब्दपाप नाशील ॥११०॥ ऐसें म्हणोनि राव पुढती ॥ नमिता झाला गोरक्षाप्रती ॥ भाळ ठेवूनि चरणांवरती ॥ सभेस्थानीं आणिलें ॥११॥ बैसवूनि कनकासनीं ॥ षोडशोपचारें पूजिले मुनी ॥ उपरी उभय जोडूनि पाणी ॥ उभा राहिला सन्मुख ॥१२॥ म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ तुमचे चरणीं असे मम प्रेमा ॥ दर्शन दिधलें भक्तिउगमा ॥ मम अभक्ताकारणें ॥१३॥ तरी आतां कामशक्तीं ॥ वेध कोणता सांगा जती ॥ जेवीं ऋतुकाल द्रुमाप्रती ॥ फळे येतील तैशींच ॥१४॥ तरी चिच्छक्तिउल्हासपणें ॥ अर्थ दावा मजकारण ॥ ते त्यावरी कामना पावन ॥ तुष्ट होईल महाराजा ॥१५॥ ऐसें बोलतां नरेंद्रपाळ ॥ मच्छिंद्रचित्तद्रुमाचें फळ ॥ शब्दचातुर्यलापिका रसाळ ॥ चौरंगभावीं निघालें ॥१६॥ म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥ एक काम वेधला आम्हां ॥ आज तुमच्या कौंडण्यग्रामा ॥ शासनीं बाळ विलोकिला ॥१७॥ राया तिष्ठतां तव कोपाग्न ॥ तयाचे हस्तपाद केले भग्न ॥ तो जरी तुमचा अन्यायी उत्तम ॥ आम्हांलागीं ओपावा ॥१८॥ राव ऐशी ऐकूनि मात ॥ हदयीं गदगदोनि हांसत ॥ म्हणे महाराजा योगी समर्थ ॥ काय त्या कराल नेवोनि ॥१९॥ म्हणाल करील सेवाभक्ती ॥ तरी भग्न झाला पदहस्तीं ॥ तरी त्या पंथ गमाया शक्ती ॥ कांहीं एक दिसेना ॥१२०॥ तुम्हीच वाहोनियां आपुल्या स्कंधीं ॥ वागवाल कीं कृपानिधी ॥ तो स्वामी तुम्ही सेवकबुद्धी ॥ आचराल कीं महाराजा ॥२१॥ यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ तो सत्यपणें शक्त कीं अशक्त ॥ इतुके वद कीं आमुचे अर्थ ॥ कासया तूं पाहशी ॥२२॥ ऐसें बोलतां मच्छिंद्रजती ॥ अवश्य म्हणे शशांगरनृपती ॥ घेऊनि जावें आवडल्या चित्तीं ॥ सिद्धसंकल्प महाराजा ॥२३॥ ऐसें बोलतां धरापाळ ॥ उठोनि आले तत्काळ ॥ परोपकारी अति कनवाळ ॥ चौरंगापाशीं पातले ॥२४॥ कनकचौरंगी सधीर युक्त ॥ तैसाचि उचलिला महीभुवसुत ॥ नेऊनि आपुले शिबिरांत ॥ हस्तपाद तळविले ॥२५॥ येथें श्रोते कल्पना घेती ॥ निजीवास सजीव करितो जती ॥ तेणें चौरंगीहस्तपादांप्रती ॥ स्नेहकढयी कां तळविलें ॥२६॥ निर्जीव पुतळा नृत्य करीत ॥ तेथें मिरवले गहिनीनाथ ॥ मग हस्तपादनिमित्त ॥ काय अशक्य झालें तें ॥२७॥ तरी कवि म्हणे पुढील कारण ॥ होतें म्हणोनि मच्छिंद्रानें ॥ लोहढथीं द्विमूर्धानें ॥ स्नेहीं तळले पदहस्त ॥२८॥ तूतें करोनि दुःखाचें शमन ॥ पुढें पहा म्हणती नेमानेम ॥ समान उत्तमोत्तम ॥ फळा मिरवूं ययासी ॥२९॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ तळों लागले पदहस्ती ॥ मग तेथें राहोनि एक राती ॥ पुढें गमती महाराजा ॥१३०॥ चौरंगी स्कंधीं वाहून ॥ मार्ग गमीतसे गौरनंदन ॥ मग ग्राम पाहूनि निघून ॥ बद्रिकाश्रमीं पातले ॥३१॥ शीघ्र जावोनि शिवालयांत ॥ भावें वंदिला उमाकांत ॥ उपरी चौरंगी ठेवूनि तेथ ॥ काननांत संचरले ॥३२॥ काननीं हिंडतां तेथ पाहीं ॥ तों एक गव्हर देखिलें महीं ॥ देखतां विसरती तया ठायीं ॥ गुहागृहामाझारी ॥३३॥ तंव तें गव्हर परम गोमट ॥ पाहूं बोलती प्रताप सुभट ॥ म्हणती चौरंगीनिश्चयतुळवट ॥ येथें कसून पहावा ॥३४॥ पाहावें तरी कैसें रीतीं ॥ मग काय करिते झाले जती ॥ एक शिळा विस्तीर्ण शक्ति ॥ गोरक्षनाथें आणिली ॥३५॥ आणिली परी गुहागृहांत ॥ उचलूनि वरल्या जमिनीत ॥ शस्त्र अस्त्र जल्पूनि तेथें ॥ अंधारव्यक्त केलेंसे ॥३६॥ ऐसें कृत्य करुनि तेथें ॥ पुन्हां परतोनि आले नाथ ॥ स्कंधीं वाहूनि चौरंगीतें ॥ पुन्हां परतोनि गेले त्या ठायीं ॥३७॥ तेव्हां गृहद्वारासमीप ॥ तरु एक होत विशाळरुप ॥ तयाखालीं प्रतापदीप ॥ सावलींत बैसले ॥३८॥ बैसले परी गोरक्षासी ॥ मच्छिंद्र म्हणे भावउद्देशीं ॥ वा अनुग्रह चौरंगासी ॥ याच ठायीं ओपावा ॥३९॥ ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्ष वदतसे उत्तरातें ॥ मम अनुग्रह तपाश्रित ॥ लाभ होतसे महाराजा ॥१४०॥ तरी चौरंगीचें अनुष्ठान ॥ पूर्णस्वरुपीं मी पाहीन ॥ मग प्रसन्नचित्तें देईन ॥ अनुग्रह महाराजा ॥४१॥ ऐसें बोलतां वरदउक्ती ॥ मच्छिंद्र म्हणे बरवी नीती ॥ तरी याचि ठायीं चौरंगीप्रती ॥ तपालागीं स्थापावा ॥४२॥ ऐसें म्हणूनि गोरक्षासी ॥ पुसता झाला चौरंगासी ॥ हे बाळा तूं पूर्ण तपासी ॥ बसतोसी कीं या ठाया ॥४३॥ यावरी बोले चौरंगनाथ ॥ मी मान्य तुमचे कर्तव्यांत ॥ जेथें ठेवाल राहीन तेथ ॥ सांगाल करीन तैसेंचि ॥४४॥ परी एक मागणें आहे येथें ॥ तुम्ही जावें कोण्या देशातें ॥ परी प्रतिदिनीं माझा हेत ॥ कूर्मदृष्टीं रक्षावा ॥४५॥ इतकें मातें दिधल्यास दान ॥ सकळांत माझे कल्याण ॥ दिवसानुदिवस माझे स्मरण ॥ तव धवळारीं पाळावें ॥४६॥ तुम्हांस होतां माझें स्मरण ॥ त्या कृपें होईल माझें पोषण ॥ जैसें कूर्मदृष्टीकरुन ॥ बाळालागीं पोषीतसे ॥४७॥ ऐसें बोलतां चौरंगनाथ ॥ उमय झाले तोषवंत ॥ मग उचलोनि गुहागृहांत ॥ चौरंगीतें ठेविलें ॥४८॥ ठेविलें परी त्यास सांगती ॥ बा रे ऊर्ध्व करीं कां दृष्टीप्रती ॥ शिळा सुटक दिसे क्षितीं ॥ पडेल वरती तुज राया ॥४९॥ परी आपुले प्रसादेंकरुन ॥ तूतें देतों एक वरदान ॥ दृष्टी याजवरुन ॥ काढूं नको कदापि ॥१५०॥ जरी दृष्टी किंचित चुकुर ॥ होता पडेल अंगावर ॥ मग प्राण सोडूनि जाईल शरीर ॥ चूर्ण होशील रांगोळी ॥५१॥ मग पुढील कार्य साधेपर्यंत ॥ सकळ राहिले नरदेहांत ॥ तरी जतन करुनि शरीरांत ॥ हित आपुलें जोडी कां ॥५२॥ मग एक मंत्र सांगूनि कानीं ॥ म्हणे करी याची सदा घोकणी ॥ येणेंचि सर्व तपालागुनी ॥ प्राप्त होसील पाडसा ॥५३॥ मग गोरक्ष जाऊनि उत्तम फळातें ॥ तया सामोरें आणूनि ठेवीत ॥ म्हणे हें फळ भक्षूनि निश्वितें ॥ पूर्ण तपा आचरी कां ॥५४॥ परी आणिक राया तूतें ॥ दृष्टी रक्षावी जीवित्वनिमित्तें ॥ मंत्र जपावा तपोअर्थे ॥ फळे भक्षावीं क्षुधेसी ॥५५॥ ऐसी त्रिविधा गोष्टी तूतें ॥ सांगितली परी रक्षी जीवातें ॥ तों आम्ही लवकरी करुनि तीर्थातें ॥ तुजपासीं येऊं कीं ॥५६॥ ऐसें सांगूनि चौरंगासी ॥ बाहेर निघे गोरक्षेंसी ॥ शिळा आपुले गुहाद्वारासी ॥ बंधन केलें दृष्टोत्तर ॥५७॥ या उपरांतीं तपाचारशक्ती ॥ चामुंडा स्मरला लावोनि चित्तीं ॥ तंव त्या स्मरतां येऊनि क्षितीं ॥ गोरक्षातें भेटल्या ॥५८॥ म्हणती महाराजा योगोत्तमा ॥ कामना उदेली कोण तुम्हां ॥ तैसाचि अर्थ सांगूनि आम्हां ॥ स्वार्थालागीं मिरविजे ॥५९॥ येरी म्हणे हो शुभाननी ॥ मम प्राण आहे या स्थानीं ॥ तरी तयाच्या क्षुधेलागुनी ॥ नित्य फळें ओपावीं ॥१६०॥ आणावी परी गुप्तार्थ ॥ फळें ठेवावीं त्या नकळत ॥ शिळे उचलूनि जावें त्वरित ॥ नित्य फळें ओपावीं ॥६१॥ ऐसें सांगूनि चामुंडेसी ॥ चालते झाले तीर्थवासी ॥ सहज चालीं चालतां महीसीं ॥ गिरनारपर्वतीं पोंचले ॥६२॥ येरीकडे चामुंडा सकळ ॥ उत्तम आणूनि देती फळ ॥ शिळा उचलूनि उतावेळ ॥ काननांत सांडिती ॥६३॥ सांडिती परी कैसे रीतीं ॥ गुप्त सेवा करुनि जाती ॥ परी चौरंगी महाजती ॥ शिळाभयें दाटला ॥६४॥ मनांत म्हणे गुरुवचन ॥ कीं शिळा घेईल तुझा प्राण ॥ म्हणोनि दृष्टीं याकारण ॥ अखंडित रक्षावें ॥६५॥ ऐसी भावना आणूनि चित्तीं ॥ दृष्टी ठेवी शिळेप्रती ॥ मुखीं नाम मंत्रउक्ती ॥ आराधींत सर्वदा ॥६६॥ परी त्या शिळेच्या भयेंकरुन ॥ खाऊं विसरला फळाकारण ॥ किंचित वायूचें होतां गमन ॥ तोचि आहार करीतसे ॥६७॥ शिळेवरती सदा दृष्टी ॥ परी ऊर्ध्वभागीं ओपिली दृष्टी ॥ अंग हालवेना महीपाठीं ॥ अर्थ कांहीं चालेना ॥६८॥ जरी करावें चलनवलन ॥ नेणों दृष्टीसी चुकुरपण ॥ शिळा झालिया घेईल प्राण ॥ म्हणोनि न हाले ठायातें ॥६९॥ फळें जरी चांचपूनि घ्यावें हातीं ॥ नेणों तिकडे जाय अवचितीं ॥ चित्त गेलिया इंद्रियें समस्तीं ॥ तयामागें धांवती ॥१७०॥ मग चित्त बुद्धि अंतःकरण ॥ हें तों ऐक्य असती तिचे जण ॥ फळ स्पर्शितां भावनेकरुन ॥ भ्रष्ट होईल सर्वस्वें ॥७१॥ मग मंत्ररुपें स्मरणशक्ती ॥ आबुद्ध करील माझी मती ॥ म्हणोनि सांडिलें फळप्राप्ती ॥ योगाहूनि लक्षीतसे ॥७२॥ ऐसी उभयतां कांचणी करुन ॥ आटत चालिले रुधिर प्राण ॥ परी तें रुधिर मांस लक्षून ॥ आटत आहे तंव सत्य ॥७३॥ रुधिर मांसालागूनि भक्षीत ॥ भक्षूनि उदरकमय करीत ॥ शेवटीं चित्तासी हरीत ॥ भक्षण करीतसे नित्यशः ॥७४॥ चित्ता आटिलें सकळ रुधिर ॥ पैं शरीर उरलें अस्थिपंजर ॥ वरी उगवली त्वचा त्यावर ॥ गवसणीपरी विराजे ॥७५॥ जोंबरी शरीरीं असे प्राण ॥ तोंबरी अस्थि त्वचा घ्राण ॥ प्राण भंगल्या भंग जाण ॥ सर्वत्रासी माहिती ॥७६॥ नाडी त्वचा अस्थी ॥ चौरंगी उतरल्या देहाप्रती ॥ सूक्ष्म शरीरीं आपण भूतीं ॥ त्रासूनियां पळाले ॥७७॥ मग तो देह काष्ठासमान ॥ बोलारहित चलनवलनहीन ॥ ऐसें पाहूनि बाळ तान्हें ॥ वारुळ वरी रचियेलें ॥७८॥ मग तितुक्या दृष्टी हरल्याप्रती ॥ मुखीं ध्वनि मंत्रशक्ती ॥ तितुकें उरे मग निश्वितीं ॥ जिकडे तिकडे झालीसे ॥७९॥ ऐसेपरी चौरंगीतें ॥ झालें आहे निजदेहातें ॥ यावरी पुढील स्वार्थे ॥ पुढील अध्यायीं ऐका तें ॥१८०॥ तरी हा ग्रंथ नवरत्नहार ॥ आणि वैडूर्य स्वतेजापर ॥ तुम्हां श्रोतियां शृंगार ॥ धुंडीसुत अर्पीतसे ॥८१॥ नरहरिवंश मालूतें ॥ मालू नरहरीचा शरणागत ॥ तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ ॥ श्रोतियांतें संकल्पिला ॥८२॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥ एकत्रिंशाध्याय गोड हा ॥१८३॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३१॥ ओंव्या ॥१८३॥ शुभं भवतु ॥ ॥ नवनाथभक्तिसार एकत्रिंशाध्याय समाप्त ॥

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.