Navnath Bhaktisar Adhyay 33 | PDF Download

By Rahul | Last updated on February 4, 2026

Navnath Bhaktisar Adhyay 33 is the thirty-third chapter of the book. The reader will never get tetanus. It will be cured if he already has it. The PDF download link is at the end of the article.

Navnath Bhaktisar Adhyay 33:

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी जगदुद्धारा ॥ कनकवर्णा नरहरि चतुरा ॥ ऐक्यत्वकारणें हरिहरां ॥ शक्य एक तुझेंचि ॥१॥तरी आतां कृपा करुनी ॥ ग्रंथ सुचवीं सुढाळ रत्नीं ॥ शुभ योगी श्राव्य भाषणीं ॥ स्वीकार करीं महाराजा ॥२॥ मागिले अध्यायीं मच्छिंद्रनंदन ॥ त्रिविकमदेहीं संचरुन ॥ गोरक्ष तीर्थस्नानाकारणें ॥ धाडिलसे मच्छिंद्रें ॥३॥ यापरी गोरक्षनाथ ॥ महीं भ्रमतां नानी तीर्थ ॥ तो गोदातटीं अकस्मात ॥ येऊनियां पोहोंचला ॥४॥ तों गोदातटीं भामानगर ॥ तया अरण्यांत गौरकुमर ॥ परम झाला क्षुधातुर ॥ जठरानलें करुनियां ॥५॥ ग्राम पाहतां तो अरण्यांत ॥ उदक एक योजन न मिळे तेथ ॥ तया स्थानी क्षुधाक्रांत ॥ अनल जैसा पेटला ॥६॥ मार्गी चालतां दिशा लक्षीत ॥ तों शेत देखिलें अकस्मात ॥ कृषिकर्म प्रांजळवंत ॥ पाहूनि सुमार धरियेला ॥७॥ तंव तो कृषीवल माणीकनामी ॥ वय दश वर्षे देहधर्मी ॥ मध्यान्हसमय साधूनी ॥ भोजनातें बैसला ॥८॥ पात्र घेतलें पुढें वाढून ॥ कवळ करावा जों मुखीं अर्पण ॥ तों अकस्मात गौरीनंदन ॥ आदेश शब्द गाजवी ॥९॥ तंव तो माणीक कृषि शेतीं ॥ ऐकूनि आदेश शब्दाप्रती ॥ योजिला कवळ ठेवूनि हातीं ॥ प्रेमें नमीत तयातें ॥१०॥ म्हणे महाराजा तुम्ही कोण ॥ किमर्थ घेतलें आडरान ॥ येरु म्हणे मी तपोधन ॥ क्षुधानळीं पेटलों ॥११॥ परम झालों तृषाकांत ॥ म्हणोनि होऊनि आलों अतिथ ॥ तरी सन्निध अन्न असेल तूतें ॥ भिक्षा आम्हां ओपावी ॥१२॥ ऐशी ऐकतां तयाची वाणी ॥ म्हणे महाराजा योगेंद्रमुनी ॥ निधान आहे मनोधर्मी ॥ पात्र वाढिलें भक्षावें ॥१३॥ मग तो उठोनि त्याचि वेळीं ॥ शीघ्र ओपी पत्रावळी ॥ आणि मृत्कुंभ भरोनि जवळी ॥ शीघ्र करी पुढारां ॥१४॥ मग तो गोरक्ष तपोधन ॥ हस्तपाद प्रक्षाळून ॥ अन्नपात्र पुढें घेऊन ॥ जठराहुती घेतसे ॥१५॥ पूर्ण झाल्या जठराहुती ॥ मग सहजचि तुष्ट झाला चित्तीं ॥ कीं रुखा होतां जलप्राप्ती ॥ लवणाकार पावतसे ॥१६॥कीं दरिद्याप्रती देतां धन ॥ मग कां न पावे तुष्ट मन ॥ कीं यथेच्छ मेळविता झाल्याकारण ॥ तोष शरीरीं मिरवेना ॥१७॥ तन्नाय कृषिनरेंद्रात्तमा ॥ घडूनि आलें तुष्टमहिमा ॥ मग प्रसन्न होऊनि चित्तद्रुमा ॥ वरदफळा दावी तो ॥१८॥ म्हणे कृषिका कवण काम ॥ मिरवला हो देहधर्मी ॥ येरु ऐकोनि म्हणे स्वामी ॥ आतां कासया पुसतां हो ॥१९॥ तरी महाराजा आटाआटी ॥ करावी प्रथम कार्यासाठी ॥ कार्य झालिया व्यर्थ चावटी ॥ अन्यासी कासया शिणवावें ॥२०॥ तरी आतां कार्य झालें ॥ पुढें योजीं शीघ्र पाउलें ॥ गोरक्ष म्हणे बोलशी बोल ॥ सत्य असती तुझे बा ॥२१॥परी तुवां मातें दिधलें अन्न ॥ तेणें मम चित्त झालें प्रसन्न ॥ तरी तव देहीं किंचित पण ॥ सत्य असेल वद मातें ॥२२॥ जे जे कामना असेल तूतें ॥ ती पूर्ण पावशी फळसहितें ॥ येरी ऐकूनि कृषी त्यातें ॥ ऐसें उत्तर देतसे ॥२३॥ म्हणे महाराजा महीपाठीं ॥ तुम्हीच हिंडतां भिकेसाठी ॥ ते तुम्ही मोह धरुनि पोटीं ॥ मातें काय द्याल जी ॥२४॥ भणंगापाशीं भणंग गेला ॥ तो काय देऊनि तृप्त झाला ॥ खडका उदकपान्हा बोला ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥ तुम्ही तेवी हिंडतां अन्नासाठी ॥ आम्हां काय देणार जेठी ॥ नाथ म्हणे इच्छातुष्टा ॥ आतां तुझी करीन बा ॥२६॥ येरी म्हणे पुरें बोलणें ॥ काय आहे तुम्हांस्वाधीन ॥ तरी आणिक तुजकारण ॥ लागत असेल तें माग ॥२७॥ नाथ म्हणे रे एक दान ॥ तुवां दिधल्या झालों प्रसन्न ॥ तरी कांहीतरी मजपासून ॥ मागूनि घेई कृषिराया ॥२८॥ येरु म्हणे उगला ऐस ॥ तुवां काय द्यावें आम्हांस ॥ तरी कांहीं न मागूं सुरस ॥ पंथ आपुला क्रमीं कां ॥२९॥ ऐसे बोलतां माणीकनामी ॥ गोरक्ष विचारी आपुलें मनीं ॥ आडबंग असती कृषिधर्मी ॥ सदा विपिनीं बैसूनियां ॥३०॥ तरी हा मातें म्हणतो माग ॥ परी त्याच्याचि हितार्थ करावा लाग ॥ ऐसें विचारोनि मनोवेगें ॥ तयालागीं बोलतसे ॥३१॥ म्हणे कृषिराया ऐक वचन ॥ तूं आम्हांसी म्हणशील देऊं देणें ॥ तरी मागें सरस वचन ॥ निश्चयें करुनियां बोलावें ॥३२॥ येरु म्हणे तापसा ऐक ॥ मातें दिससी महामूर्ख ॥ जो देणार आपुले आत्मसुख ॥ तो मागें सरणार नाहीं कीं ॥३३॥ अरे चंद्र असे शीतळपणीं ॥ तरी तो वर्षेल दाहकपणीं ॥ परी तो ढळणार नाहीं प्राणी ॥ मागें पाऊल कासया ॥३४॥ सविताराज तेजोदीप्ती ॥ तोही अंधकारीं करील वस्ती ॥ परी उदार तो औदार्याप्रती ॥ मागें पाऊल सारीना ॥३५॥ मही गेलिया रसातळीं ॥ परी औदार्यप्राप्ती महाबळी ॥ त्या कृपणत्व कदाकाळी ॥ अंगालागीं स्पर्शेना ॥३६॥ तरी कोणतें मागणें तूतें ॥ मागूनि घेईजे त्वरितें ॥ मी बोललों निश्चयातें ॥ निश्चय माझा पाहीं कां ॥३७॥ ऐशी बोलतां विपुल वार्ता ॥ गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता ॥ तरी मनाचे करणें मागूं आतां ॥ कैसा सांभाळील पाहू तो ॥३८॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ म्हणे मज दावीं कां विपिनपती ॥ जें जें आवडेल तुजे चित्तीं ॥ तें तूं न करीं महाराजा ॥३९॥ कांही एक इच्छील तुझें मन ॥ तें तूं न करणें हेंचि मागणें ॥ इतुकें देऊनि तुष्टपण ॥ बोळवीं कां कृषिराजा ॥४०॥ऐशीं वदतां तयाची वाणी ॥ अवश्य म्हणे कांषकर्मी ॥ हा धर्म आतां आपुले धर्मी ॥ अर्कअवधीं रक्षीन गा ॥४१॥ ऐशी तैशी देऊनि भाक ॥ तुष्ट केलें शरीरास ॥ असो गोरक्ष त्या विपिनास ॥ सांडूनियां चालिला ॥४२॥ माणिकनामी कृषी शेतांत ॥ मुक्त करिता झाला औत ॥ येठणें बांधूनि समस्त ॥ भार सकळ वाहातसे ॥४३॥ वृषभा मागें दिधलें लावून ॥ मौळीं घेत येठण उचलून ॥ मनांत म्हणे ग्रामासी जाऊन ॥ क्षुधाबल घालवावें ॥४४॥ इतुकी मनीं योजना होतां ॥ स्मरण झालें गोरक्षनाथा ॥ पुत्र कल्याण आणितां चित्ता ॥ मनाचें करणें उल्लंधावें ॥४५॥ मन इच्छीत असे घरीं जावया ॥ तरी आपण न जावें तया ठाया ॥ मग तेथेंचि उभा राहूनियां ॥ गाढ निद्रा करीतसे ॥४६॥ मौळीं येठणाचा भार ॥ घेऊनि उभा महीवर ॥ नेत्र झांकूनि चिंतापर ॥ हरिनामीं योजितसे ॥४७॥ मन इच्छी हालवूं अंग परी न हाले धडभाग ॥ स्थिर होऊनि संचरले ओघ ॥ वचनार्थ संपादी ॥४८॥ तरुपर्ण जे येती उडोन ॥ तेचि करीतसे भक्षण ॥ मनीं येतां सांठवण ॥ तेही त्याग पर्णीचे करीतसे ॥४९॥ मग सहजस्थितीं वायुलहर ॥ अकस्मात येतसे मुखावर ॥ तितकेचि प्राशन आहारपर ॥ अमल मन होतसे ॥५०॥ तेणें कृश झालें शरीर ॥ सकळ आटूनि गेलें रुधिर ॥ मांस म्हणाया तिळभर ॥ स्वप्नामाजी दिसेना ॥५१॥ त्वचा अस्थि झाल्या एक ॥ उभा राहिला कष्टदायक ॥ येरीकडे तपोबाळक ॥ बद्रिकाश्रमीं पातला ॥५२॥ बद्रिकेदारा नमूनि त्वरित ॥ पाहूं चालिला चौरंगानाथ ॥ तंव गुहागृहीं शरीरावरतीं ॥ वाळवीवारुळ विराजले ॥५३॥ मुखीं तितुकी नामावळी ॥ आणि नेत्रचंद्रीं असे शिळाभारीं ॥ असे स्थिर तया स्थळीं ॥ गोरक्षनाथ प्रगटला ॥५४॥ त्वरित द्वाराची शिळा काढून ॥ पाहे तयाचे शरीराकारणें ॥ तों वारुळ गेलें वेष्टून ॥ सर्व अंगीं तयाच्या ॥५५॥ शिळाचंद्री न हाले पाती ॥ रामशब्दें वलगे उक्ती ॥ तें पाहूनियां गोरक्ष जती ॥ परम चित्तीं हळहळला ॥५६॥ मग शरीराचे वारुळ काढून ॥ पाहे तयाचे शरीराकारण ॥ तों हस्तपाद लवेंकरुन ॥ तपोबळें आले ते ॥५७॥ मग सावध करुनि तयातें ॥ म्हणे पाहें मी आलों गोरक्षनाथ ॥ शीघ्र कवळूनि तयाचा हस्त ॥ बाह्यात्कारीं आणिले ॥५८॥ मग कृपें करितां अवलोकन ॥ शरीरशक्ति आली दारुण ॥ मग उठूनि वंदी गोरक्षचरण ॥ म्हणे सनाथ झालों असें मी ॥५९॥ यापरी तयासी आलिंगुनी नाथ ॥ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ ॥ येरी म्हणे मज माहीत ॥ नाही चामुंडे विचारी ॥६०॥ मग विचारुनि चामुंडेसी ॥ वृत्तांत पुसे चरितार्थासी ॥ येरु म्हणे आम्ही फळांसी ॥ देत होतों महाराजा ॥६१॥ परी चौरंगी न करुनि भक्षण ॥ बैसला होता शिळा लक्षून ॥ मग फळेंचि पर्वताप्रमाणें ॥ गोरक्षातें दाविलीं ॥६२॥ फळनगा पाहोनि तपोजठी ॥ विस्मय करी आपुल्या पोटीं ॥ म्हणें धन्य याची तपोराहाटी ॥ ब्रह्मादिकां अतर्क्य ॥६३॥ परम चित्तीं कृपा वेष्टुनी ॥ मौळीं ठेविला वरदपाणी ॥ अनुग्रहचोज पुन्हां दाउनी ॥ ब्रह्मसनातन केला असे ॥६४॥पुढें चौरंगीसी घेऊन ॥ बद्रिकेदारालया आणून ॥ जागृत करुनि उमारमण चौरंगीतें भेटविला ॥६५॥ मग तेथें राहूनि षण्मास ॥ सकळ करविला विद्याभ्यास ॥ अस्त्र शस्त्र बहुवस ॥ प्रवीण झाला महाराजा ॥६६॥ मग सकळ देवांतें पाचारुन ॥ तपोवळें केलें सधन ॥ मग सकळ दैवतें तुष्ट करुन ॥ वरदप्रज्ञा आराधिलें ॥६७॥ सकळ देव वर देऊन ॥ पहाते झाले आपुले स्थान ॥ येरीकडें बद्रिकेदार नमून ॥ चौरंगीसह निघाला ॥६८॥त्वरें येऊनि वैदर्भ देशांत ॥ चौरगींतें कौंडिण्यपुर दावीत ॥ म्हणे बा रे तव माता तात ॥ भेट घेई तयांची ॥६९॥ भेटशी तरी कैसा त्यातें ॥ जगीं जाऊनि अति ख्यात ॥ हस्तपदांचे मुंडणखंडणनिमित्त ॥ उत्तरा सड घेईजे ॥७०॥ राये छेदिलें तव हस्तपदासी ॥ परी धुसधुसी आहे मम मानसीं ॥ तरी आपुला प्रतापसंगम रायासी ॥ निजदृष्टीं दावीं कां ॥७१॥ अवश्य म्हणे चौरंगीनाथ ॥ भस्मचिमुटी कवळुनि हस्त ॥ रायाचें लक्षूनि बागाईत ॥ वातास्त्रासी सोडीतसे ॥७२॥ तंव तेथींचे वनकर ॥ सहा शत एक सहस्त्र ॥ वातचक्रें उडवूनि अंबर ॥ दाविता झाला तयांसी ॥७३॥ पुन्हां वातअस्त्र घेत काढून ॥ तंव ते उतरती महीकारण ॥ किती पडले मूर्च्छना वेष्टून ॥ कितीएक ग्रामीं पळाले ॥७४॥ तें येऊनि राजांगणी ॥ सांगते झाले विपरीत करणी ॥ कोणी केली न दिसे नयनीं ॥ आश्चर्य बहु होतसे ॥७५॥ मग भृत्यांतें पाचारुन ॥ पुसूनि त्यातें वर्तमान ॥ कोणी केलें आला कोण ॥ शोधालागी धाडीतसे ॥७६॥ तों येरीकडे चौरंगीसहित ॥ पाणवठी बैसला गोरक्षनाथ ॥ हेर पाहूनि त्वरित ॥ रायापाशीं पातले ॥७७॥ म्हणती महाराजा पाणवध्यासी ॥ बैसले आहेत दोन तापसी ॥ तीव्रतेजी कानफाटवेषी ॥ विद्यार्णव दिसताती ॥७८॥ ऐसें ऐकूनि राजेश्वर ॥ स्वननीं आपुला करी विचार ॥ आले असती गोरक्ष मच्छिंद्र ॥ पुत्रदुःखें द्वेषानें ॥७९॥ तरी आतां त्वरेकरुन ॥ तयांसी जावें शरण ॥ नातरी ग्रामासी पालथें करुन ॥ प्राणांप्रती हरतील ॥८०॥ ऐसा विचार करुनि मानसीं ॥ राव सामोरा ये समारंभेंसी ॥ गज वाजी शिबिका रथांसी ॥ कटकासह येतसे ॥८१॥ ग्रामाबाहेर कटक येतां ॥ गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा ॥ आपुला प्रताप आतां ॥ निजदृष्टीं दावीं कां ॥८२॥ ऐशीं ऐकतां गोरक्षगोष्टी ॥ पुन्हां कवळी भस्मचिमुटी ॥ वातास्त्र जल्पूनि पोटी ॥ चमूवरी प्रेरीतसे ॥८३॥ मग तंय वातास्त्र अति तीक्ष्ण ॥ चमूसह राया दाविलें गगन ॥ रथ गज वाजा शिबिकासन ॥ वातास्त्रें पाडिली ॥८४॥ तेणेंकरुनि चभू समस्त ॥ गगनपंथें आरंबळत ॥ म्हणती हे महाराजा नाथ ॥ शरणागता तारावें ॥८५॥ सकळ स्तविती दीनवाणीं ॥ ते शब्द ऐकोनि तपोज्ञानी ॥ चौरंगीसी म्हणे घे उतरोनी ॥ चमूसहित रायातें ॥८६॥ मग तो कुशल प्रज्ञावंत ॥ पर्वतास्त्र असे आड करीत ॥ मग सकळ आटूनि गेला वात ॥ चमू मिरवली नगमौळी ॥८७॥ मग उभा करोनि आपुला कर ॥ म्हणे उतरुनि यावें चमू समग्र ॥ मग रायासह कटकभार ॥ उतरले तळवटी ॥८८॥ मग समीप येतां शशांगर ॥ चौरंगीसी बोलिला गौरकुमर ॥ पितयासी करुनि नमस्कार ॥ तुष्ट चित्तीं मिरवीं कां ॥८९॥ ऐसें ऐकतां गुरुनंदन ॥ धावूनि धरिले तातचरण ॥ म्हणे महाराजा मी तव नंदन ॥ निजदृष्टीं देखें मज ॥९०॥ ऐसे बोलतां चौरंगनाथ ॥ रावें धांवूनि धरिले हदयांत ॥ मग परम प्रीतीं गोरक्षातें ॥ चरणीं भाळ अर्पीतसे ॥९१॥ मग गोरक्षही धरुनि हदयीं ॥ म्हणे राया याचा प्रताप पाहीं ॥ येरी म्हणे तुजसमान आई ॥ भेटल्या न्यून कायसें ॥९२॥ याउपरी तैसें चौरंगीनाथ ॥ वज्रास्त्र निर्माण करीत ॥ चूर्ण करुनि महापर्वत ॥ अदृश्यपंथीं मिरवतसे ॥९३॥ याउपरी शशांगर ॥ गोरक्षासी म्हणे चतुर ॥ आरोहण करुनि शिबिकेवर ॥ राजसदनीं चला जी ॥९४॥ याउपरी बोले चौरंगीनाथ ॥ आम्ही न येऊं तव गृहांत ॥ सापत्न मातुःश्रीचे कुडें मनांत ॥ हस्तपाद छेदिले ॥९५॥ मग मूळापासोनि सकळ वृत्तांत ॥ रायालागीं केला श्रुत ॥ राव कोपोदधींत ॥ उचंबळला आगळा ॥९६॥ सेवकालागीं आज्ञा करीत ॥ ताडीत आणा राणी येथ ॥ तें ऐकूनि चौरंगीनाथ ॥ काय परी वदतसे ॥९७॥ म्हणे ताता आपुलें वचन ॥ हेचि शिक्षा आली घडून ॥ यापरी ताता आपुले कीर्तीनें ॥ ब्रह्मांड भरेल महाराजा ॥९८॥ तरी ऐसें न करीं ताता ॥ सदनींच शिक्षा करावी प्रीता ॥ मग शिबिकासनी बैसवूनि तत्त्वतां ॥ राजसदना पातले ॥९९॥ राव जातां मंदिरांत ॥ पादत्राण घेऊनि हातांत ॥ ताडन करुनि पत्नीतें ॥ म्हणे जाई येथूनी ॥१००॥ द्वादश संवत्सरपर्यंत ॥ त्वां तप केलें शुचिष्मंत ॥ तयाचें फळ कुडें मत ॥ भ्रष्ट केलें राज्यासी

॥१॥ तें पाहूनि गोरक्षनाथें ॥ राया संबोधूनि केला शांत ॥ एक मास राहिला तेथ ॥ शशांगरभक्तीनें ॥२॥ यापरी गोरक्ष जातेसमयीं ॥ वंश वेष्टी मोहप्रवाहीं ॥ प्रसाद देऊनि राजदेही ॥ वीर्यवान पैं केला ॥३॥ म्हणे कामिनी करुनि दुसरी ॥ भोगीं वंशलतेची लहरी ॥ ऐसें सांगूनि शशांगरीं ॥ चौरंगीसह चालिला ॥४॥ मार्गी चालतां मुक्काम ॥ पाहते झाले प्रयागस्थान ॥ स्नान करुनि उत्तोमात्तम ॥ शिवालयीं पातलें ॥५॥ येतांचि करुनि शिवदर्शन ॥ मग शिवदारे बोलूनि वचन ॥ गुरुकलेवराचें वर्तमान ॥ तियेलागी पुसतसे ॥६॥ तंव ती होऊनि भयभीत ॥ बोलती झाली चाचरे घेत ॥ शरीरेंकरुनि थरथरां कोपित ॥ पायावरी लोटली ॥७॥ म्हणे महाराजा गुरुनाथा ॥ राजाभाजा रेवतीकांता ॥ तिनें मातें भ्रष्टवूनि चित्ता ॥ पुसूनि घेतलें होतें कीं ॥८॥ याउपरी दुसर्याालागुनी ॥ वदलें नाहीं कलेवर कहाणी ॥ परी नेणों भय वाटे मनीं ॥ कलेवर पहा निजदृष्टी ॥९॥ स्त्रीजाती बोलती एक ॥ परी करणी करिती आणिक ॥ मज वाटतसे ती चाळक ॥ समक्ष दृष्टीं पहावें ॥११०॥ ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥ परम घाबरला गोरक्षमुनी ॥ मग एकांत गुहासदनीं ॥ विदारुनि पाहतसे ॥११॥ तंव तें मोकळे गुहागार ॥ आंत नाहीं कलेवर ॥ मग नेत्रीं दाटूनि मोहाचा पूर ॥ शोकसिंधु उचंबळे ॥१२॥ तंव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता ॥ सोडूनि दिधली माजी ममता ॥ आतां येथें गुरुनाथा ॥ कवणे ठायीं पाहूं मी ॥१३॥ ऐसें म्हणूनि आरंबळत ॥ धरणीप्रती शरीर टाकीत ॥ तंव ती शैवदारा मोहस्थित ॥ होऊनि त्यातें बोलतसे ॥१४॥ म्हणे महाराजा धैर्य धरीं ॥ मीं राजांगने जाऊनि सत्वरीं ॥ पुसूनि येतें मच्छिंद्रशरीरीं ॥ वृत्तांत कैसा झाला तो ॥१५॥ ऐसें बोलूनि गोरक्षातें ॥ शैवदारा अंतःपुरांत ॥ शीघ्र जाऊनि रेवतीतें ॥ राजनेमानें नमियलें ॥१६॥ तंव ती पाहूनि शैवकामिनी ॥ म्हणे कां आलीस वो माय बहिणी ॥ येरी म्हणे अंतःकरणीं ॥ आठव मातें झालासे ॥१७॥ म्हणाला तरी आठव कोण ॥ तरी द्वादश वर्षे आलीं भरुन ॥ तुम्हांलागीं सांगितली खूण ॥ राजभागीं विचारा ॥१८॥ ऐसी ऐकतां तियेची वाणी ॥ एकांता ने ते राजपत्नीं ॥ म्हणे माय वो अंतःकरणीं ॥ चिंता सोडीं सकळ ती ॥१९॥ अगे तुजविरहित त्याचि दिवशीं ॥ कलेवर काढूनि शस्त्रउद्देशी ॥ वांटले गे रतिरती मांसीं ॥ सकळ विपिनामाझारी ॥१२०॥ त्यासही लोटले बहुत दिवस ॥ अस्थिमांसाचा झाला नाश ॥ जीवजंतू खाऊनि त्यास ॥ विष्ठा मृत्तिका झाली असे ॥२१॥ तरी या कार्याचा सकळ तरु ॥ समूळीं उपटिला बीजांकुरु ॥ आतां चिंतेचें फळ अपारु ॥ कोठूनि दृष्टी पडेल ॥२२॥ ऐसें बोलता राजांगना ॥ परम चितें व्यापिली मना ॥ म्हणें नेणों पुढिल्या कर्मा ॥ कैसें घडोनि येईल ॥२३॥ परी आतां असो कैसें श्रुत करावें गोरक्षास ॥ जें जें असेल प्रारब्धास ॥ भोग भोगणें लागेल ॥२४॥ ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ पुनश्व आली शिवालयाप्रती ॥ जे वदली रेवती युक्ती ॥ प्रांजळ तैसें सांगितले ॥२५॥ सांगतां ऐकिलें नाथें ॥ परम पेटला क्रोधानळातें ॥ म्हणे शिक्षा करावी राजभाजेतें ॥ दुःखार्णवीं बुडवूनियां नाथें लागतसे ॥२७॥ जरी अवज्ञा करुन ॥ जंतूंचे झालें भक्षण ॥ तरी आतां शोधार्थ मन ॥ मच्छिंद्रशरीरीं ठेवावें ॥२८॥ न द्यावें तिसी शिक्षेकारणें ॥ तें नाश न पावे निश्चय पूर्ण ॥ कोणे तरी ठाया लागून ॥ मच्छिंद्रदेह असेल ॥२९॥ मग बोलावूनि चौरंगीतें ॥ म्हणे बा रक्षीं शरीरातें ॥ मी देहासी सांडूनि त्रिभुवनातें ॥ कलेवर शोधार्थ जातों कीं ॥१३०॥ परी रेवती येथील राजकांता ॥ प्रवर्तली आहे मच्छिंद्रघाता ॥ तैशीच वहिवटेल माझिया अर्था ॥ म्हणूनि सावध असावें ॥३१॥ ऐसें सांगूनि चौरंगीतें ॥ प्रवेश करी गुहागृहातें ॥ प्राण सान शरीरातें ॥ भ्रमण करी दक्ष दिशा ॥३२॥ सकल शोधला जंबुद्वीप ॥ सरितार्णवीं सकल आप ॥ ग्राम कानन सप्तद्वीप ॥ रतीरती शोधिलें ॥३३॥परी जीवजंतूची देहस्थिती होऊन ॥ शोधितां गुरुचें कलेवर पूर्ण ॥ कोणेतरी ठायालागून ॥ मच्छिंद्रदेह असेल ॥३४॥ अतळ वितळ सुतळ पाताळ ॥ सप्तही पाताळस्थळ ॥ पिंडब्रह्मांड शोधूनि सकळ ॥ स्वर्गावरी चालिले ॥३५॥ सुवर्लोक भुवर्लोक तपोलोक ॥ अर्यमा यक्षादि सत्यलोक ॥ कुबेर तारागणादि अनेक ॥ शोधूनियां पाहिले ॥३६॥ एक मेरु स्वर्गपाठार ॥ गणगंधर्वादि अन्य सुरवर ॥ सकल शरीरा करुनि संचार ॥ गुरुशरीरे शोधिलें ॥३७॥ उपरी पाहूनि वैकुंठ समस्त ॥ त्वरें पातला कैलासाप्रत ॥ तों होतांचि प्रवेश शिवगणांत ॥ धुंडाळूनि पाहतसे ॥३८॥ तों शिवगणीं चामुंडासमुदायांत ॥ अस्थि त्वचा मांस देखे समस्त ॥ यापरी वीरभद्र सर्व गणांत ॥ गर्जोनियां सांगतसे ॥३९॥ म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेम ॥ मच्छिंद्रशवातें करा रक्षण ॥ तयाचा शिष्य गौरनंदन ॥ कोणे रुपें येईल कीं ॥१४०॥ ऐसी ऐकूनि तयाची वार्ता ॥ गोरक्ष तेथूनि झाला निघता ॥ तों येरीकडे चौरंगीनाथा ॥ काय सुचलें होतें कीं ॥४१॥ गोरक्षशवाजवळ बैसून ॥ आणीक सकळ अस्त्र व्यापून ॥ जेथें लाग न लागे देवांकारण ॥ ब्रह्मादिकांकरुनियां ॥४२॥ ऐसें अस्त्र व्याप्त ॥ तैशांतूनि निघूनि गौरसुत ॥ गुप्तवेषें शरीरांत ॥ येऊनियां प्रवेशला ॥४३॥ प्रवेशतांचि अकस्मात ॥ उठूनि बैसला गौरसुत ॥ मार्ग सोडूनि गुहागृहांत ॥ बाहेर आले उभयतां ॥४४॥ मग सिद्ध करुनि भस्मझोळी ॥ उभे राहिले दोन्ही बळी ॥ पर्वतास्त्र तेणें काळीं ॥ अर्कावरी सोडिलें ॥४५॥ गोरक्षमुखींचें पर्वतास्त्र ॥ प्रविष्ट होतां अति स्वतंत्र ॥ माथां उचलितां अंबरपात्र ॥ भरोनियां निघाले ॥४६॥ सवालक्ष योजनमिती ॥ स्वर्गी उंच झाले गभस्ती ॥ त्याहूनि माथा द्विगुण पर्वती ॥ अंबरातें मिरवला ॥४७॥ मित्रमार्गीचा धरुनि रोक ॥ आकाशस्तंभ झाला एक ॥ तेणेंकरुनि स्यंदनीं अर्क ॥ मार्गावरी अडखळला ॥४८॥ चक्रपदा चालावया वाट ॥ न मिळे पाहूनि सुभट ॥ मग सज्ज करुनि गांडीवचिमुटी ॥ योजिता झाला महाराजा ॥४९॥ तीव्रशरीरीं वज्रास्त्र ॥ योजूनि सोडी प्रविष्ट मित्र ॥ तेणेंकरुनि पर्वतास्त्र ॥ भंगिता झाला ते क्षणीं ॥१५०॥ परी पर्वतास्त्र भंगित होतां ॥ आदित्य विचारी आपुले चित्ता ॥ हें अस्त्र कोणाची प्रतापदुहिता ॥ आडमार्गी झालें असे ॥५१॥ ऐसें पाहतां अर्क अंतरी ॥ तो समजला नर गोरक्षकेसरी ॥ मग स्यंदनासह महीवरी ॥ येऊनियां प्रगटला ॥५२॥ येतां देखती अर्कराज ॥ काय करिती हो विजयध्वज ॥ चंद्रास्त्राचें पेरुनि बीज ॥ कोटी चंद्र निर्मिले ॥५३॥ तेणेंकरुनि शीतळ प्रवाहीं ॥ मिरवती झाली मही ॥ मग तो सकळ दाह स्वभावीं ॥ बाधूं न शके अर्काचा ॥५४॥ ऐसी समाधानस्थिती होतां ॥ परी समीप पावला प्रविष्ट सविता ॥ मग चौरंगी आणि गोरक्षनाथ ॥ अर्कचरणी लागती ॥५५॥ यापरी भाविकस्थिति सांगून ॥ बोलता झाला जगलोचन ॥ बा रे तुज सुखसंबंध कोण ॥ दर्शवीं कां वाचेशीं ॥५६॥ येरु म्हणती महाराजा ॥ आम्ही उदेलों एक काजा ॥ मच्छिंद्रदेह तेजःपुंजा ॥ शिवगणें हरियेला ॥५७॥ तरी आपण जाऊनि तेथें ॥ सुनीति सांगावी वीरभद्रातें ॥ की मच्छिंद्रदेह महीते ॥ पाठवूनि द्यावा कीं ॥५८॥ परी या कार्या बहुधा नीती ॥ सांगूनि जरी ना ऐकती ॥ मग मागूनि बोलावूनि घेऊं या क्षितीं ॥ युद्धालागीं मिसळाया ॥५९॥ ऐसें पर्वी महापर्वी ॥ आमुची जाऊनि करावी शिष्टाई ॥ इतुका उपकार मच्छिंद्रदेहीं ॥ आम्हांसी साह्य मिरवावें ॥१६०॥ ऐसें बोलतां गोरक्षनाथ ॥ आदित्य अवश्य त्यांतें म्हणत ॥ मग त्या क्षणीं कैलासा जात ॥ त्वरित जाऊनि पोंचला ॥६१॥ गणें पाहूनि अर्क येतां सहज ॥ पापांलागीं विजयध्वज ॥ म्हणती येणें महाराज ॥ कवण्या अर्था झाले असें ॥६२॥ आदित्य म्हणे ऐका वचन ॥ गोरक्षशिष्टाईसाधन ॥ करुं पातलों तुम्हांकारण ॥ मच्छिंद्रदेहाकारणें ॥६३॥ तरी मम बोलणें आतां ॥ चित्त द्यावें परम हिता ॥ महीसी पाठवा मच्छिंद्रदेह आतां ॥ तुष्ट करीं गोरक्षा ॥६४॥ तुम्हीं तुष्ट केलिया त्यास ॥ नाथपंथें वाढेल प्रीत ॥ ऐसें उत्तर बोलतां आदित्य ॥ वीरभद्र बोलतसे ॥६५॥ हे महाराजा ऐक वचन ॥ आम्हांसीं दुःख दिधलें मच्छिंद्रानें ॥ तरी आतां गेलिया प्राण ॥ मही न दाऊं शबातें ॥६६॥ जरी गोरक्ष झुंजेल आम्हांतें ॥ तरी सिद्ध होऊं युद्धातें ॥ गोरक्ष जिंकूनि समरंगणातें ॥ मच्छिंद्रासम करुनि ठेवूं ॥६७॥ उपरी बोले नारायण ॥ मच्छिंद्रें दुःख दिलें तुम्हांकारण ॥ तेव्हां तुमचा प्रताप पळून ॥ कवण ठाय गेलासे ॥६८॥ आतां अवचट घडलें ऐसें ॥ म्हणूनि प्रौढ झाला मानसें ॥ परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष ॥ प्रतापबळी असे कीं ॥६९॥ तेव्हां मच्छिंद्र होता एक ॥ आतां दोघे असती प्रतापअर्क ॥ ते कोपल्या सकळ धाक ॥ कृतांतासम योजिती ॥१७०॥ येरु म्हणती असो कैसे ॥ परी कदा न देऊं मच्छिंद्रास ॥ यापरी बोलतां राजस ॥ आवडेल तैसें करावें ॥७१॥ परी एक आणिक वचन ॥ तुम्ही उतरा महींकारण ॥ स्वर्गी करितां कंदन ॥ शिवलोकांत पावेल तें ॥७२॥ म्हणती कीं यासी काय कारण ॥ तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण ॥ कैलासगिरि पिष्ट होऊन ॥ खंड करितील क्षणाधें ॥७३॥ परी ते पाहूनी येथील वस्ती ॥ विनाश होईल स्वर्गाप्रती ॥ मग त्या कोपे पशुपती ॥ शासन करील तुम्हांतें ॥७४॥ भवभवानी अति प्रीती ॥ करिती गोरक्षमच्छिंद्रांप्रती ॥ पहा शरीरज सवें चामुंडांहातीं ॥ कैलासातें पाठविले ॥७५॥ तरी आतां शिवा न कळतां ॥ मानेल तैसे करावें चित्ता ॥ ऐशी गोष्ट आदित्य बोलतां ॥ सर्वां परी मानलें ॥७६॥ मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसी ॥ तुम्ही युद्धा जावें सर्व महीसी ॥ दुःख लागतां कांहीं रणासी ॥ मीही येतों मागून ॥७७॥ मग अष्टभैरवगण ॥ अवश्य म्हणूनि करिती गमन ॥ विमानें प्रत्यक्ष घेऊन ॥ शस्त्रअस्त्रादिकीं उतरले ॥७८॥ बहात्तर कोटी चौर्यानयशीं लक्ष ॥ येतांचि देखे नाथ गोरक्ष ॥ मग चौरंगीतें बोले प्रत्यक्ष ॥ सावध होई मम वत्सा ॥७९॥ असो शिवगण येतांचि महीं ॥ लोटते झाले शस्त्रप्रवाहीं ॥ तें गोरक्ष पाहूनि त्या समयीं ॥ वर्जास्त्र निर्मियेलें ॥१८०॥ वज्रास्त्र पातलें लव न लागतां ॥ सहस्त्र वेळां भवतें फिरतां ॥ तेणें शिवगणांचे शर समस्त ॥ अंगी लिप्त न होती ॥८१॥ तें पाहूनियां सकळ शिवगण ॥ योजिती अपार अस्त्रांकारण ॥ तितुक्याहीं अस्त्रां उभय जन ॥ लक्ष्य धरुनि उडविती ॥८२॥ अग्निअस्त्र धूमास्त्र ॥ तयावरी प्रेरिती वातास्त्र ॥ वातास्त्रावरी उरगास्त्र ॥ प्रेरिते झाले शिवगण ॥८३॥ काळास्त्र आणि वज्रास्त्र ॥ महाकठिण स्पर्शास्त्र ॥ तयामाजी दानवास्त्र ॥ प्रळय करीत आगळा ॥८४॥ तें पाहूनि गोरक्षनाथ ॥ प्रेरिता झाला जलदास्त्र ॥ तयामागें पर्वतास्त्र ॥ लागोपाठ करीतसे ॥८५॥ तयामागे खगेंद्रास्त्र ॥ तयामागें संजीवनी अस्त्र ॥ मग प्रेरी इंद्रास्त्र ॥ ते जाऊनिया झगटे ॥८६॥ विभक्तास्त्र देवास्त्र कठिण ॥ तींही झगटती त्वरेंकरुन ॥ ऐसें अस्त्र परिपूर्ण ॥ गण अस्त्र तें भंगिती ॥८७॥ त्यात काय करी चौरंगीनाथ ॥ हळूचि मोहनास्त्र प्रेरीत ॥ तें संचरुनि गणहदयांत ॥ मग पिसाटपणें मिरवत ॥८८॥ सर्वासी नाहीं देहभान ॥ तेणें न कळे आलों कोणकार्यालागून ॥ पिशाचवृत्तीं भ्रमत रानोरान ॥ व्यर्थ फिरते जाहले ॥८९॥ त्यांत आणिक चौरंगीनाथ ॥ प्रेरी प्रळयकाळींचा वात ॥ तेणें गण समस्त ॥ वायुचक्रीं पडियेले ॥९०॥ तों वीरभद्र मागूनि चामुंडेसहित ॥ युद्धालागीं आला त्वरित ॥ परी शिवगण पाहूनि अव्यवस्थित ॥ परम चित्ती क्षोभला ॥९१॥ मग गांडीवातें टणत्कारोनी ॥ बाण योजिले अपार गुणी ॥ कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तीन्ही ॥ विविध बाणीं पाडीतसे ॥९२॥ जैसा प्रळयकाळींचा वडवानळ ॥ तो यत्नें न पावे कदा शीतळ ॥ तन्न्यायें शिवबाळ ॥ कोपानळी वेष्टिला ॥९३॥ तें पाहूनि चौरंगीनाथ ॥ रतिअस्त्र प्रेरीत त्वरीत ॥ तेणें कामास्त्र त्वरें निश्चित ॥ मूर्च्छित होऊनि पडियेले ॥९४॥ यावरी दुसरें चौरंगीनाथ ॥ दशासुरी अस्त्र प्रेरीत ॥ तें पाहुनियां नाभीसुत ॥ झडझडोनि पळतसे ॥९५॥ चित्तीं म्हणे नोहे बरवें ॥ वेद हरतील आतां सर्व ॥ शंखासुर प्रतापार्णव ॥ पुनः उदय झाला असे ॥९६॥ऐसा विचार करुनि मनीं ॥ ब्रह्मास्त्र दडविलें अदृश्यपणीं ॥ पुढें कामिनीअस्त्र चौरंगीमुनी ॥ ग्रेरिता झाला लवलाहे ॥९७॥ तें पाहूनि कार्तिकास्त्र ॥ पळूनि लपवी मुखपात्र ॥ परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र ॥ प्रळयालागीं मिरवले ॥९८॥ तें पाहूनियां भद्रजाती ॥ मत्स्यास्त्र योजिलें परन निगुती ॥ तेणे करुनि तदस्त्र शांती ॥ अदृश्य तें मिरवलें ॥९९॥ परी परम कोपोनि तपोबळ ॥ तीव्रास्त्र योजिलें तत्काळ ॥ संजीवनी योजूनि सबळ ॥ सकळ दानवां उठलें ॥२००॥ ते दानव म्हणाल कोण कोण ॥ त्रिपुरसुंदराक्ष मलमृदु मान्य ॥ म्हैसासुर जालंधर प्राज्ञ ॥ काळयवन अघ बक

॥१॥ हिरण्याक्ष हिरण्यकश्यपसहित ॥ मुचकुंद बळी वक्रदंत ॥ रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांत ॥ सिंहनाद भरिताती ॥२॥ ऐसे सबळ राक्षस उठतां ॥ विमानयानीं सुरवर असतां ॥ अति भय मानूनि चित्ता ॥ विमानांतें पळविती ॥३॥ कैंचे युद्ध कैचें पाहणें ॥ पळती सुर भयभीत होऊन ॥ तेहतीस कोटी देवतांकारण ॥ चिंता अपार व्यापिली ॥४॥ म्हणे रावणें बंदीं घातलें ॥ दैवें दाशरथी रामें सोडिलें ॥ आतां दैन्य भोगूनि आलें ॥ दुःख अपार येधवां ॥५॥ ऐसे होऊनि भयभीत ॥ कंपे व्यापिले ते समस्त ॥ असो सुरवर जाऊनि वैकुंठात ॥ निवेदिती श्रीरंगा ॥६॥ मग तो दयाळ चक्रपाणी ॥ ऐसी ऐकूनि सुरवरवाणी ॥ म्हणे भोग आला परतुनी ॥ अवतारदीक्षेकारणें ॥७॥ मग तो परम दचकूनि चित्तीं ॥ शिव पाचारिला सुरवरांहाती ॥ बैसवूनि स्वसंगतीं ॥ विचित्र करनी निरोपिली ॥८॥ म्हणे गोरक्षें केलें अनुचित ॥ पुनः उठविले दानव समस्त ॥ आतां दानव तरी रसातळाप्रत ॥ मही सकळ नेतील कीं ॥९॥ एक एक दानवासाठीं ॥ आपण माराया झालों कष्टी ॥ कल्पावरी अवतार जेठी ॥ धरुनियां भीडलो ॥२१०॥ तरी आतां कैसें करावें ॥ निवटतील कैलासा सकळ दानव ॥ अहा मूर्ख तो वीरभद्रराव ॥ व्यर्थ द्वेषीं मिरवला ॥११॥ मग सोडूनि वैकुंठासी ॥ येते झाले गोरक्षापासी ॥ म्हणती बा विपरीत महीसी ॥ पुत्रा हें काय मांडिले ॥१२॥ अरे एकएका राक्षसालागीं ॥ आम्ही श्रमलों बहु प्रसंगीं ॥ अवतार घेऊनि नाना रंगीं ॥ हनन केलें तयांचे ॥१३॥ तरी आतां कृपा करुन ॥ अदृश्य करीं दानवांकारण ॥ येरी म्हणे गुरुशवा आणून ॥ द्यावें आधीं मजलागीं ॥१४॥ मग शिवें बोलावूनि चामुंडेसी ॥ मच्छिंद्रशवातें आणविलें महीसी ॥ म्हने बा घेई आणि राक्षसांसी ॥ शांतदृष्टी दावीं कां ॥१५॥ यापरी गोरक्ष म्हणे त्यांतें ॥ दानव नोहेत अस्त्रव्यक्त ॥ संजीवनी प्रयोग देहस्थित ॥ दानव उदया पावले ॥१६॥ तरी अवतार घेऊन ॥ पुनः योजा रणकंदन नातरी वीरभद्राची आस्था सोडून ॥ द्यावी लागेल तुम्हांते ॥१७॥ यावरी बोले भालदृष्टी ॥ येर पोर नाहीं म्हणे पोटीं ॥ परी नाथा राक्षस जेठी ॥ दुःख देतील आम्हांतें ॥१८॥ एक मधुदैत्य माजला ॥ तेणे पळविले रानोरानीं आम्हांला ॥ शेवटीं एकदशीनें त्याला ॥ मृत्युमुखी पाठविलें ॥१९॥ ऐसें दुःख सांगावें किती ॥ तरी आतां कृपामूर्ती ॥ वेगी निवटी राक्षसांप्रती ॥ पुत्रमोह साडिला ॥२२०॥ ऐसें शिव विष्णु बोलत ॥ येरीकडे राक्षस समस्त ॥ वीरभद्र पाहूनि झुंजत ॥ धनुष्यबाण कवळूनियां ॥२१॥ परी तो प्रतापी भद्रजाती ॥ एकटा झुंजतो सर्वाप्रती ॥ नानाशस्त्रअस्त्राकृती ॥ निवारींत बलिष्ठ ॥२२॥ तुष्ट होतां गोरक्ष जती ॥ वाताकर्षण अल्पयुक्तीं ॥ भस्मचिमुटी रणकंदनाप्रती ॥ फेंकूनियां देतसे ॥२३॥ ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण ॥ एकमेळीं माजले कंदन ॥ येरीकडे शिवविष्णूंनी ॥ स्तुतीं तुष्टविला गोरक्ष ॥२४॥ तेणें दानव वीरभद्रासहित ॥ महीं पाडिले निचेष्टित ॥ श्वासोच्छवास कोंडूनि समस्त ॥ प्राणरहित झाले ते ॥२५॥ सबळ अस्त्रेम वाताकर्षण ॥ ठाऊक नव्हतीं देवदानवांकारण ॥ परी नाथपंथीं तीं येऊन ॥ प्रसन्न झाला कृपेनें ॥२६॥ असो वीरभद्र आणि दानव समस्त ॥ रणीं निमाले प्रतापवंत ॥ त्यावरी गोरक्षें जल्पूनि अग्निअस्त्र ॥ सकल केले भस्म तेणें ॥२७॥ यावरी पुढें पंचानन ॥ वेष्टिले अति मोहानें ॥ तें पुढीले अध्यायीं सकळ कथन ॥ श्रोतियानी ऐकावें ॥२८॥ परम साधन योजूनि चित्तीं ॥ पाठ थापटूनि वक्त्याप्रती ॥ भला भला म्हणवूनि उक्ती ॥ श्रोते करिती तत्कृपें ॥२९॥ परम अवधाना योजूनि चित्त ॥ वक्ता जाहला धुंडीसुत ॥ नरहरि मालु नाम ज्यांत ॥ संतसेवे अनुसरला ॥२३०॥ स्वास्त श्रीग्रंथ भक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयस्त्रिंशति अध्याय गोड हा ॥२३१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३३॥ ओंव्या ॥२३१॥ ॥ नवनाथभक्तिसार त्रयस्त्रिंशतिअध्याय समाप्त ॥

Download Navnath Bhaktisar Adhyay 33 PDF:

Loading Viewer...

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.